साधना पुढच्या पातळीवर कशी न्यावी?
सद्गुरू अध्यात्माचे आंतरिक कार्य कसे चालते ते सांगतात. ते म्हणतात. योगसाधना म्हणजे गरजेनुसार एखाद्याच्या आध्यात्मिक विकासासाठी त्याच्या सांकेतिक ऊर्जेमध्ये केलेला बदल.
प्रश्न: सद्गुरू, तुम्ही एकदा असे म्हणाला होतात की आम्ही करत असलेली साधना अश्याप्रकारे आखण्यात आली आहे की एकदा का आम्ही ठराविक टप्प्यापर्यंत प्रगती केली ती साधनाच आम्हाला वरच्या पातळीवर घेवून जाईल. याचा अर्थ अजून समजावून सांगाल का?
सद्गुरू : उदाहरणच द्यायचे झाले तर ...तुम्ही वयाने मोठे असाल तर तुम्ही लोकांना सिगारेटच्या धुराची वलये सोडताना बघितले असेल. आता सध्या तसे कोणी करत नाही. कारण आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. मला एक विक्षिप्त लेखक माहीत आहे जो स्वतःचे कैलाशम् हे नाव कानडी भाषेत सिगारेटच्या धुरातून लिहित असे. तो धूर विरून जायच्या आत काही सेकंद तुम्हाला ते नाव बघता येत असे. आणि याकरता लोकं त्याचे कौतुक करायचे. आत्ता जसे एकपात्री विनोदाचे कार्यक्रम होतात तसं तो एकपात्री राजकीय विडंबन सादर करायचा आणि प्रयोगाच्या शेवटी स्वतःचे नाव धूरामध्ये लिहायचा. ही त्याची खास निशाणी त्यांच्या प्रयोगाच्या भित्तीपत्रकांवरही छापलेली असे.
तुम्ही तुमचे उघडलेले तोंड कितीतरी वेगवेगळ्या कारणांकरता वापरू शकता...तुम्ही बोलू शकता, शिट्टी वाजवू शकता, गाऊ शकता किंवा सिगारेटची धुम्रवलये काढू शकता. तोंडातून काय बाहेर येते, त्याने फरक पडतो. जर ती फक्त हवा असेल तर त्याची शिट्टी होईल. जर तो आवाज स्वर तंतुतून बाहेर आला तर त्याचे गाणे होईल.. जर तोंडातून धूर बाहेर आला तर तो वेगवेगळे आकार धारण करेल.
सांकेतिक ऊर्जा
योगसाधना म्हणजे सांकेतिक उर्जेची ठराविक पद्धतीने केलेली मांडणी. तुमच्या वर्तमान वृत्तीनुसार ती विकसित होत असते आणि व्यक्त होत असते. जसे तुम्ही एकाच साध्या, सोप्या साधनांचा वापर करून तुमच्या कौशल्यानुसार आणि तुमच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकता. त्याचप्रमाणे योगसाधना केल्यामुळे तुम्ही जसे आहात त्यानुसार उर्जेचा संकेत (Code) तुमच्या स्वभावानुसार आपली पुनर्चना करतो. सगळीच माणसे हाडामांसाची बनलेली आहेत, पण तरिही त्यांच्यात कितीतरी विविधता आहे. सुंदर आणि कुरूप अशी दोन्ही प्रकारची माणसे आढळून येतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमची अध्यात्मिक साधना चांगल्या अथवा वाईट अश्या कोणत्याही मार्गाने वापरू शकता.
मला शांभवी महामुद्रेतून गुढविद्या काढून टाकायला एकवीस वर्षे लागली. तुम्ही सरावाने यात प्राविण्य मिळवल्यानंतर तुम्हाला त्यातल्या वाईट गोष्टी वापरायचा मोह झाला असता, म्हणून त्या काढून टाकण्याकरता मी हे केले. दुसऱ्याचे मन वाचून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ शकता, किंवा एखाद्याचे भविष्य सांगून तुम्ही त्याला फसवू शकता. किंवा एखाद्याकडे नुसते बघून तुम्ही त्याचा विनाश करू शकता. जर तुमचा तुमच्या जीवन उर्जेवर ताबा असेल तर तुम्ही एखाद्याला आत्मसाक्षात्कार घडवून आणून शकाल किंवा त्याचा विनाश करू शकाल. दोन्ही शक्य आहे. तुम्ही कोण आहात, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या उर्जेचा वापर कराल आणि तिचे रुपांतर कराल.
म्हणून शांभवी सारखी साधना शिकवताना त्यातल्या नकारात्मक गोष्टी काढून टाकण्याची खबरदारी घ्यावी लागते. परंतु, त्याच्याही पलीकडे जावून, तुम्ही त्याला काय अर्थ देता ....तुम्ही स्वतःची पाठदुखी बरी करायला त्याचा उपयोग करता का स्वतःच्या अस्तित्वाच्या शिखरावर जाण्याकरता त्याचा उपयोग करता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. या साधनेचा उपयोग चांगल्या करता आहे तरीसुद्धा चांगलेपणाची तुमची व्याख्या काय आहे ते महत्वाचे. तुमच्या चांगलेपणाच्या व्याख्येत अधिक चांगली तब्येत आणि जे काही करत आहात त्यातले यश इतकेच असू शकते. म्हणूनच मी म्हणतो ...ध्येय आखू नका.ते आपोआप विकसित होवू द्या. ते अश्या प्रकारे विकसित होऊ द्या ज्याचा तुम्ही विचार देखील केलेला नसेल. जे तुम्हाला आधीपासून माहीत आहे तिथेच अडकून पडू नका. तुम्ही जसजसे विकसित व्हाल तसतशी तुमची साधनादेखील उच्च पातळीवर कार्य करेल.
फुकट दारू!
एक दिवस काय झाले, एक माणूस बारमध्ये आला आणि म्हणाला “आज सगळ्यांना माझ्यातर्फे फुकट दारू!” त्याने तिथल्या वेटरला म्हटले... “अगदी तुला सुद्धा”. हा माणूस, तो वेटर आणि इतर सगळेजण मनसोक्त प्यायले. जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा समजले की त्या माणसाच्या खिशात दमडीदेखील नव्हती. त्या वेटरने त्या माणसाच्या तोंडावर एक ठोसा लगावला आणि त्याला बारच्या बाहेर हाकलून दिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो माणूस परत आला आणि म्हणाला “सगळ्यांना फुकट दारू”. आणि त्या वेटरकडे पाहून म्हणाला “तू सोडून”. तो वेटर रागाने त्याच्या पुढ्यात जावून उभा राहिला आणि म्हणाला “ मला कळू शकेल का, मला का नाही ते?” त्यावर तो माणूस उत्तरला.... “कारण तू प्यायलास की हिंसक होतोस”.
आत्ता तुम्ही जसे आहात, त्यानुसार तुम्हाला उपयोगी ठरण्याकरता साधनेत काही बदल केले गेले आहेत. जर मी शांभवी महामुद्रेची दीक्षा द्यायला सुरुवात केली, तर ती संपल्यावर तुमच्यापैकी ८० ते ९० % लोक उठू देखील शकणार नाहीत. ज्यांनी ध्यानलिंग प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी शून्या योगक्रियेमध्ये भाग घेतला आहे त्यांनाही हाच अनुभव आला असेल. तेव्हा ७० ते ८०% लोकं त्या ध्यानाच्या खोलीबाहेर चालत जावू शकले नव्हते. त्यामुळे आम्हाला तिथे जितकी सहभागी लोकं होती, तितक्याच स्वयंसेवकांचीही गरज असायची. कारण बऱ्याच जणांना उचलून न्यावे लागे, आधार द्यावा लागे किंवा निदान दिशा दाखवावी लागे. ते पूर्णपणे धुंद होत असत. पूर्वी आम्ही लोकांना या प्रकारे दीक्षा देत असू, कारण तेव्हा आम्ही अश्या लोकांना शोधत होतो, जे या प्रक्रियेत तग धरू शकतील. आम्ही करत असलेल्या प्राणप्रतीष्ठापनेकरता ते आवश्यक होते आणि ते करणे तातडीचे होते. https://www.youtube.com/watch?v=gh0X5xs9SZE&t=1s
उन्नतीसाठी रचनात्मक बदल:
ध्यानलिंग प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मला एक प्रकल्प पूर्ण करायचा होता. तो प्रकल्प ‘मी’ ठरवलेला नव्हता माझ्या गुरुनी मला करायला सांगितला होता. लोकांना प्रगती करायची असेल तर आम्ही त्यांना साधने पुरवतो. त्यांना ती साधने नको असतील, तर काही हरकत नाही. तुम्ही मला ध्यानलिंग प्राणप्रतिष्ठापने पूर्वी पाहिले असेल, तर तेव्हा मी पूर्णपणे वेगळा माणूस होतो. प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाल्यावर मी जाणीवपूर्वक सर्व काही बदलले–माझे चालणे, बोलणे, माझे कपडे इथपासून ते अगदी मी कसा जेवतो इथपर्यंत. जे लोकं मला पूर्वी ओळखत होते, ते आता जेव्हा मला पाहतात तेव्हा त्यांना वाटते की माझ्यापाशी जे होतं ते मी हरवलं आहे, कारण आता मी तितकासा उग्र राहिलो नाही.
आता जसं आहे ते चांगले आहे. आज बरेच जण दीक्षा घेताना शांत बसतात आणि नंतर कोणताही त्रास न होता आनंदाने घरी जातात. कारण आता दीक्षा सगळ्यांना झेपेल अश्या प्रकारे सौम्य करण्यात आली आहे. त्यांना जशी हवी होती तशी. कोठेही कमी नाही की जास्त नाही. तुम्ही जसेजसे प्रगती कराल तसतशी ती बदलत जाईल, अश्या प्रकारे रचली आहे. तुम्ही ज्याअवस्थेला अजून तयार झाला नाहीत अश्या अवस्थेत आम्ही तुम्हाला जबरदस्तीने घालू इच्छित नाही. जर ती तुम्हाला पुढे घेऊन गेली तर उत्तमच, पण मग बाह्य परिस्थिती हाताळणे तुम्हाला थोडे जड जाईल. आम्हाला ती अजून सोपी करायची नाही, नाहीतर मग ती अर्थशून्य होईल. तरीसुद्धा ती तुम्हाला तुमच्या आत्ताच्या अवस्थेच्या पलीकडच्या शक्यता आणि परिमाणे दाखवून देईन. तुम्हाला त्या दिशेने जायचे असेल तर थोडी तयारी करावी लागेल आणि ती आपली आपण विकसित होत जाईल.