एक सुखी आयुष्य

स्वामी  निराकार: माझे वडील संन्यासी आणि साधूंना नेहेमी घरी आमंत्रित करून, त्यांना भोजन देऊन, त्यांचा आदर सत्कार करत असत. मलासुद्धा त्यांनी त्यांचे पदस्पर्श करून त्यांच्यासोबत आदराने वागायला शिकवले होते. तर साधारण 1989 च्या सुमारास, माझा धाकटा भाऊ रामकृष्ण मठात सन्यासी होण्यासाठी घर सोडून बाहेर पडला, तेंव्हा मला ते विशेष काही वाटले नाही – त्यामुळे मी प्रेरितही झालो नाही, किंवा मला त्याचा त्रासदेखील झाला नाही. मी त्या गोष्टीकडे फक्त हा त्याचा मार्ग आहे या नजरेने पाहिले, पण एक दिवस मी देखील याच मार्गावर जाईन याची कल्पना मी कधीही केली नव्हती. हे कसे घडले? हे पूर्वनिर्धारित होते का? मी आज जेंव्हा यावर विचार करतो तेंव्हा आजही मला याचे आश्चर्य वाटते. 

मी माझ्या नमक्कल येथील घरापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या तिरुचेनगोडे इथे एका बँकेत काम करत होतो. ती एक चांगली, आरामशीर आणि सुरक्षित नोकरी होती, आणि मी आनंदी होतो. फावल्या वेळात मी अनेक सामाजिक कामे करत असे, आणि मी एका यूथ क्लबचा सदस्यही होतो. वेळोवेळी मी नमक्कल आणि तिरुचेनगोडे या ठिकाणी अनेक आध्यात्मिक संस्थांद्वारे योग आणि ध्यान शिबिरांचे आयोजन करत असे. माझ्या मते योग आणि ध्यान या गोष्टी आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी करतो. मला त्याविषयी येवढेच माहिती होते. या सर्व व्यवस्थेत मी येवढा समाधानी होतो की अगदी लग्न करायची कल्पनाही मला आकर्षित करू शकली नाही. 

कृपेचा स्पर्श

ही 1992 मधली गोष्ट आहे. एक दिवस माझ्या असे लक्षात आले की मी एका योगवर्गासाठी नोंदणी केली आहे आणि मला त्यामधे उपस्थित राहायलाच हवे. मी शहरात इतर एका संस्थेद्वारे आयोजित केलेल्या हटयोग वर्गातील काही लोकांची अशी विनंती होती. त्यांनी अत्यंत प्रेमाने मला हे आमंत्रण दिले होते त्यामुळे मी तिरुचेनगोडे इथे आयोजित केलेल्या अगदी पहिल्या ईशा योगवर्गाला उपस्थित राहिलो. यामुळे माझे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाणार आहे हे मात्र तेंव्हा मलाही माहिती नव्हते – अगदी पहिल्या वर्गाला उपस्थित राहिल्यानंतरही ईशा योगाशी माझी झालेली ही ओळख मला येवढ्या पुढे आणेल असे मला वाटले नव्हते. स्वामीनाथन अण्णा यांनी वर्गाचे नेतृत्व केले होते आणि दीक्षा दिनासाठी सद्गुरु उपस्थित होते. त्या दिवशी मी पहिल्यांदा सद्गुरूंना पाहिले. दिक्षेदरम्यान, सहभागी लोकं रडली, गडबडा लोळली, काय वाट्टेल ते केले. हे सर्वकाही माझ्यासाठी नवीनच होते, पण त्यामुळे मला कोणताही धक्का मात्र बसला नाही. त्यांना एखाद्या कृपेचा स्पर्श झाला आहे, आणि सद्गुरु हे केवळ एक योग शिक्षक नाहीत याची मात्र मला जाणीव झाली. त्यावेळी मला वैयक्तिकरित्या विशेष असे काही जाणवले नाही, पण मला देखील सद्गुरुंबद्दल आदर वाटला होता. 

1994 मधल्या पूर्णत्व कार्यक्रमाच्या वेळी, आम्हाला त्यांच्या दीर्घकालीन हेतुंविषयी, आणि ते कोण आहेत हे समजले, तेंव्हा ते बाह्य जगात काय करतात यावरून त्यांची परीक्षा करणे व्यर्थ आहे हे माझ्या लक्षात आले.

तर वर्षभराच्या काळात, मी सद्गुरुंसोबत भाव स्पंदन (कार्यक्रम) आणि नंतर सम्यमा कार्यक्रम पूर्ण केला. सम्यमा कार्यक्रमादरम्यान, उच्च ऊर्जा स्थितीत पोहोचत असलेल्या सहभागी व्यक्तींना पाहून, सद्गुरु म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे याची मला जाणीव झाली. त्याठिकाणी जे काही शिकवले जात होते त्याची थोडीफार चव मलाही चाखायला मिळाली. एक दिवस असे झाले की विश्रांतीच्या काळात मी एक गोळी चघळत बसलो होतो. मला वाटते ती बहुदा विक्सची गोळी होती आणि माझा घसा दुखत होता म्हणून मी ती चघळत होतो. मी ती पुर्णपणे चघळून संपवण्याआधीच, विश्रांतीची वेळ संपली आणि आम्हाला पुन्हा एकदा सभागृहात नेण्यात आले. माझ्या तोंडात गोळी असतानाच, सद्गुरुसुद्धा आतमधे आले आणि त्यांनी सत्र सुरू केले. त्या गोळीचे काय करावे हे मला काही सुचेना. “मला ही गिळायची नाहीये आणि बाहेर थुंकूनही टाकायची नाहीये,” असा विचार मी माझ्या मनात केला आणि ती पुर्णपणे विरघळून जाईपर्यंत ती चघळत बसायचे ठरवले. त्याक्षणी, त्या गोळीची चव इतकी कडू लगायला लागली की पुढच्या क्षणालाच मला ती गालिच्यावर थुंकायला लागली.

त्या काळात, सम्यमा सभागृहात जे काही घडत असे ते सद्गुरु आयोजित करत असलेल्या हटयोग वर्गातही अनुभवता येत असे. मी हे तिरूचेनगोडे इथे हटयोग वर्गादरम्यान पाहिले – साधा सूर्यनमस्कार घालताना सुद्धा लोकं अत्यानंदाने रडत होती, गडाबडा लोळत होती. अगदी मासिक सत्संग काळातही, शिक्षकांना वर्गावर नियंत्रण ठेवणे अवघड होत असे कारण लोकं वेगवेगळ्या स्थितीत जात असत. ध्यानलिंगाच्या प्रतिष्ठापनेपूर्वी सद्गुरुंच्या भोवती अगदी पराकोटीची परिस्थिती निर्माण होत असे. 

तोंडी प्रसिद्धीपेक्षा अधिक काहीतरी

ईशा योग वर्ग नमक्कलमधेसुद्धा व्हावेत अशी माझी इच्छा होती. त्या काळी सद्गुरु स्वतः वर्गाचे वेळापत्रक तयार करत असल्याने, एक दिवस त्यांनी माझ्या गावातही वर्ग घ्यावा हे सांगण्यासाठी मी सिंगनल्लुरमधील नंबर 15, गोविंदास्वामी लेआऊट येथे त्यांच्या घरी गेलो. मी घरात प्रवेश केला तेंव्हा सद्गुरु आणि विज्जी मा यांनी माझे स्वागत केले, आणि सद्गुरूंनी मला माझ्या टोपणनावाने हाक मारली. मला आश्चर्य वाटले, “यांना माझे टोपण नाव कसे काय माहिती? कारण मी उपस्थित असलेल्या कोणत्याही कार्यक्रमांच्या नोंदणी फॉर्ममधे मी याचा उल्लेख कधीच केला नव्हता. पण तरीही मला याचे फारसे आश्चर्य वाटले नाही कारण सद्गुरुंभोवती घडणार्‍या अशा प्रकारच्या गोष्टींची मला सवय झाली होती. 

सद्गुरुंनी माझी विनंती ऐकून घेतली आणि ते म्हणाले, “ठीक आहे, तू सकाळच्या वर्गासाठी 50 लोकं घेऊन ये.” 50 लोकांची नाव नोंदणी करायला माझी काही हरकत नव्हती, पण तिरुचेनगोडे येथील आमच्या सकाळच्या वर्गाच्या अनुभव लक्षात घेता, आम्हाला येवढ्या लोकांना सकाळी घेऊन येता येईल का याबद्दल मी साशंक होतो. म्हणून मी त्यांना हे समजावून सांगायला सुरुवात केली, पण त्यांनी मला कोणताही पर्याय दिला नाही. त्यांनी मला पटवून दिले की सकाळची वेळच योगा करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. 

तोपर्यंत, ईशा योग वर्गांची प्रसिद्धी फक्त तोंडी जाहिरातींनीच केली जात असे. पण मी माझ्या इतर काही सामाजिक उपक्रमांची प्रसिद्धी करत असे त्याप्रमाणे  काही पत्रके छापून घेतली आणि ती लोकांमध्ये वाटली. सद्गुरुंनी वर्ग घेतला आणि त्या वर्गासाठी 50 लोकं उपस्थित होते. हा मोठाच योगायोग होता. या 50 जणांपैकी दोघांनी नंतर ब्रह्मचर्य स्वीकारले. 

प्रत्येक दिवशी सकाळी वर्ग झाल्यानंतर, सद्गुरु दुपारच्या वर्गासाठी वेलयुंथमपलायम इथे आणि नंतर संध्याकाळच्या वर्गांसाठी करूर इथे प्रवास करत असत. एका संध्याकाळी मी पण संध्याकाळच्या वर्गांना स्वयंसेवक म्हणून वर्गात बसण्यासाठी करूरला गेलो. मी सभागृहात प्रवेश केला, तेंव्हा सद्गुरुंनी अगोदरच सत्र सुरू केले होते. पण मी वर्गात शिरताच सद्गुरुंनी माझे स्वागत केले, (ते प्रत्यक्षात माझ्याशी बोलले) आणि मला पुढे येऊन बसायला सांगितले. मी खाली बसल्यावर माझ्या असे लक्षात आले की सद्गुरु वर्गातील सहभागी लोकांशी बोलत असताना त्याचवेळी वर्गाचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घेऊन माझ्याशी बोलत होते. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे, आमच्यापैकी कोणाच्याही लक्षात न येता ते एकाच वेळी माझ्याशी आणि वर्गातील सहभागी लोकांशी दोन अगदी वेगळ्या गोष्टी बोलत होते. नंतर सद्गुरुंनी हे कबुल केले की प्रत्यक्षात खरोखरच तसे घडले होते. 

100 जणांचा पहिला वर्ग

दोन महीने झाल्यानंतर, मी सद्गुरूंना नमक्कल इथे आणखी एक वर्ग घेण्याविषयी विचारले. यावेळी त्यांना सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन्ही सत्रे घेण्याची इच्छा होती, आणि मी 100 लोकांना सहभागी करून घेऊ शकतो का असे त्यांनी मला विचारले. प्रत्येक सत्रात 100 व्यक्ती येतील असे गृहीत धरून मी नेहेमी छापतो त्या पत्रकांव्यतिरिक्त काही लहान पोस्टर्ससुद्धा छापून घेतली, आणि वर्गासाठी वैयक्तिकरित्या प्रचार केला. परिचय सत्राच्या वेळी कार्यक्रमाचे ठिकाण गर्दीने ओसंडून वाहात आहे हे पाहून मी अतिशय आनंदी झालो. परिचय सत्रानंतर, अनेकजण वर्गात नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे राहिले. सकाळच्या सत्रासाठी नोंदणीची संख्या 50 पेक्षा अधिक झाल्यावर सहशिक्षकांनी मला नोंदणी थांबवायला सांगितले. तेंव्हा माझ्या लक्षात आले की सद्गुरुंनी दोन्ही सत्रे मिळून एकंदर 100 लोकांची मागणी केली होती. पण मी नोंदणी थांबवायला नकार किला, आणि शेवटी आमच्याकडे सकाळच्या वर्गासाठी 100 जण आणि संध्याकाळच्या वर्गासाठी 50 जण सहभागी झाले. सहभागी झालेल्या व्यक्ती या राजकारणासहित समाजाच्या सर्व प्रभावशाली स्तरांमधील व्यक्ती होत्या आणि सर्वजण अतिशय उत्साही आणि जिज्ञासू होते. सद्गुरुंनी वर्गात खूप आनंद घेतला असे वाटले. मला वाटते की एकाच ईशा योग वर्गात 100जण सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती!

सद्गुरु आणि धार्मिक विधी?

मी एक तर्कसंगत प्रकारची व्यक्ती असल्याने, मी कोणतेही विधी करण्याच्या विरोधात होतो. माझा विश्वास होता की सद्गुरुही मी ज्या अनेक सिद्ध व्यक्तींविषयी वाचले होते त्यांच्यासारखेच विधी आणि मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत. मी सद्गुरूंकडे आकर्षित होण्यामागे हे सुद्धा एक कारण होते. 1993 मध्ये, आश्रमाच्या जमिनीच्या भूमी पूजनादरम्यान मी सद्गुरूंना एखाद्या विधीत सहभागी होताना पाहिले. एका पुजार्‍यांना पूजेसाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि पुजाविधीदरम्यान त्यांनी सद्गुरूंना अंगारा दिला आणि त्यांना विधीसाठी काहीतरी अर्पण करायला सांगितले. “एकतर पुजारी इथे आले आहेत, आणि आता सद्गुरुही हातात अंगारा घेऊन उभे आहे?” हे सर्व पाहून मी गोंधळात पडलो. त्या क्षणी सद्गुरु माझ्याकडे वळले आणि हसून जणूकाही मला म्हणाले, “इतरांसाठी मला काय करावे लागते आहे पहा!” त्यांना हसताना पाहून मलादेखील त्या परिस्थितीत हसायला आले. 1994 मधल्या व्होलनेस कार्यक्रमाच्या वेळी, आम्हाला त्यांच्या छुप्या हेतुंविषयी, आणि ते कोण आहेत हे समजले, तेंव्हा ते बाह्य जगात काय करतात यावरून त्यांची परीक्षा करणे व्यर्थ आहे हे माझ्या लक्षात आले. 

जाता जाता गोळा केलेले टाकणे

मी 1994 साली झालेल्या 90 दिवसांच्या व्होलनेस कार्यक्रमाच्या पहिल्या 30 दिवसात सहभागी झालो. पुढचे 60 दिवस प्रामुख्याने ईशा योग केंद्रात शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून काम करणार्‍या किंवा आश्रमात पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून जाणार्‍या लोकांसाठी असल्याने, मला त्यात विशेष स्वारस्थ्य नव्हते. आणि मला सुट्टीसुद्धा एक महिनाच होती. दुसर्‍या दिवशी लगेचच, 30 दिवस पूर्णत्व कार्यक्रमात सहभागी होऊन आश्रमातून बाहेर पडल्यावर, मी माझ्या दुसर्‍या गुरूंना भेटायला गेलो ज्यांनी मला काही वर्षांपूर्वी दीक्षा दिली होती. त्यादिवशी त्यांचा आश्रमातील एक नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी एक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात साधारण 3000 लोकं सहभागी झाली होती. मला तिथे पोहोचायला थोडासा उशीरच झाला, पण मी जेंव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी शिरलो आणि शेवटच्या रांगेत माझ्या जागेवर जायला लागलो, तेंव्हा मी पाहिले की व्यासपीठावर बसलेल्या गुरूंनी डोके वर करून स्वतःच्या डोळ्यांनी मला पाहिले आहे. मला असे जाणवत होते की त्यांना माझ्या आजूबाजूला एक विशिष्ट उपस्थिती जाणवली. त्या दिवशी माझी खात्री पटली की सद्गुरु हेच माझे एकमेव गुरु आहे – माझा एकमेव मार्ग. 

पण तरीही मी 1995 मधे दीक्षा प्राप्त केलेल्या ब्रह्मचार्यांच्या पहिल्या तुकडीत सहभागी झालो नाही. त्याचे एक कारण म्हणजे संन्यास हा माझ्या जीवनाचा मार्ग आहे किंवा ज्ञानप्राप्ती हे माझे ध्येय आहे याबद्दल मला खात्री नव्हती. माझ्यासाठी, जोपर्यंत माझ्या हातून लोकांची सेवा घडण्यासाठी मी सक्षम आहे, तेवढे पुरेसे होते. दुसरे कारण असे होते की माझ्या वडील बंधूंचे नुकतेच एका अपघातात निधन झाले होते आणि त्यांच्या मागे त्यांची तरुण पत्नी आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाची दोन मुले होती. त्यांच्या मृत्युच्या धक्क्यातून माझे पालक अजूनही सावरले नव्हते. काही वर्षांपूर्वी माझा धाकटा भाऊसुद्धा सन्यासी बनल्यामुळे सध्या दुखाःत असलेल्या माझ्या पालकांना सोडून जाण्यासाठी ही वेळ योग्य आहे का  याबद्दल माझ्या मनात खात्री नव्हती. पण मी स्वतःला फार काळ रोखून धरू शकलो नाही.

पुढच्या वर्षीसुद्धा, ब्रह्मचार्यासाठी अर्ज करण्याची संधी आली, तेंव्हा मी माझ्या मनाची तयारी करू शकलो नाही आणि माझी अर्ज करण्याची शेवटची तारीख हुकली. पण शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर लवकरच, माझ्या असे लक्षात आले की मी स्वतःला आता फार काळ रोखून ठेऊ शकत नाही. त्यावेळी मी एका कार्यक्रमासाठी आश्रमात होतो. म्हणून मग त्या दिवशी, जेंव्हा मी सद्गुरुंना कैवल्य कुटिराजवळून चालत जाताना पाहिले, तेंव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली. सद्गुरुंनी मला माझ्या पालकांची स्थिती लक्षात घेऊन पुन्हा एकदा विचार करायला सांगितले, आणि मला त्या परिस्थितीविषयी काय वाटते आहे हे मी त्यांना सांगितले. त्या संभाषणा दरम्यान मी त्यांच्याशी जे काही बोललो, ते सद्गुरुंनी 20 वर्षांनंतर एका सत्संगात पुन्हा बोलून दाखवलेले ऐकून मी आश्चर्यचकित झालो - जेंव्हा मी त्याबद्दल खरोखरच विसरून गेलो होतो. दोन दशकांपूर्वी आम्ही ज्या गोष्टींविषयी बोललो होतो ते शब्द जसेच्या तसे लक्षात घेऊन सद्गुरुंनी त्यांचा उच्चार करताना ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटले. पण हीच सद्गुरुंची खासियत आहे! (खाली दिलेली तळटीप (1) पहा).

मला सदगुरूंचा हा पैलू दिसला असा आणखी एक प्रसंग आठवतो. एका व्यक्तीने, ईशा योग वर्गात सहभागी झाल्यानंतर, स्वतःहून इतरांना खाजगीरित्या ईशा योग वर्गाचे धडे द्यायला सुरुवात केली. बहुदा वर्गाविषयी त्यांना असणार्‍या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांनी सत्संगाला उपस्थित राहायला सुरुवात केली. प्रत्येक सत्संगात ते सद्गुरूंना शंका विचारत असत. दोन सत्संग झाल्यानंतर, जेंव्हा ते आणखी एक प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले, तेंव्हा सद्गुरू त्यांना म्हणाले, “तुम्ही इतरांसाठी वर्ग घेत आहात हे मला माहिती आहे,” आणि त्यांनी पूर्वीच्या सत्संगात त्यांनी विचारलेले सर्व प्रश्न पुन्हा एकदा म्हणून दाखवले. हे ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला, आणि त्यानंतर त्यांना आम्ही पुन्हा कधी ईशामधे बघितले नाही.

लकी डिप्स

1996 साली माझ्या ब्रम्हचार्येच्या दीक्षेनंतर, माझ्यावर ध्यानलिंगाच्या बांधकामासाठी निधी उभारण्यासाठी संपूर्ण तमिळनाडूमधे सत्संग आणि “लकी डिप्स”चे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. लकी डिप्स ही “पॉट लक”या खेळाची सुधारित आवृत्ती होती. लोकांना एक चिठ्ठी उचलायला लागत असे आणि त्यावर जी काही रक्कम लिहिली आहे तेवढी रक्कम त्यांना द्यावी लागत असे. या चिटठ्यांवर 1 रुपयापासून 2,500 रुपयांपर्यन्त रक्कम लिहिलेली असे. तर मी संपूर्ण राज्यभर फिरलो आणि आम्ही बरीच रक्कम जमा केली.

एका विशिष्ठ गावात, मी जेंव्हा सत्संग किंवा लकी डिप्ससाठी जात असे, तेंव्हा तेथील समन्वयक माझे जेवण इत्यादि गोष्टींची काळजी घ्यायला विसरत असे. सद्गुरूंना कसेतरी याबद्दल समजले. एके दिवशी जेंव्हा मी त्या गावात पुन्हा जाणे अपेक्षित होते, तेंव्हा सद्गुरू आश्रमातून सिंगनल्लुर कार्यालयात आले आणि त्या समन्वयकाला फोन करून दुपारी त्यांना तिथे भेटायला बोलावले. त्या बैठकीत त्यांचे काय बोलणे झाले याची मला कल्पना नाही, पण त्यानंतर माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली गेली. मला यात योगायोगापेक्षा अधिक काहीतरी असावे असे वाटते. माझे वेळापत्रक मी स्वतःच निश्चित करायचो आणि त्या दिवशी संध्याकाळी मी त्या गावात जाणार आहे हे कोणाशीही बोललो नव्हतो. 

स्वयंपाकाचा आनंद

सुरुवातीच्या वर्षात, मी ब्रम्हचारी बनलो, तेंव्हा मी सिंगनल्लुर कार्यालयात रहात असे. मला स्वयंपाकाची अजिबातच माहिती नव्हती, आणि आमच्या स्वयंपाकाची काळजी इतर कोणीतरी घेत असे. जेंव्हा खाण्यासाठी काहीही नसे, तेंव्हा मी फक्त भात शिजवून तो ताक किंवा चटणीसोबत खात असे. एक दिवस मी जरा अधिकच उत्साह दाखवला आणि एकाकडून डोशाचं पीठ तयार करायला शिकलो आणि मिक्सरमधे ते बनवले. त्या रात्री सद्गुरु राधेसोबत कार्यालयात आले आणि त्यांनी आम्हाला काही खायला आहे का असे विचारले. मी मोठ्या आनंदाने त्यांना डोसा आणि चटणी वाढली. केंव्हातरी दुसर्‍यांदा पण, मी पाककला पुस्तकातून पाककृती वाचून पहिल्यांदाच रास्सम बनवले, तेंव्हा सद्गुरु विज्जी मां सोबत आले आणि पुन्हा एकदा काही खायला आहे का असे विचारले. त्यांनी फक्त रस्सम भातच खाल्ला असे नाही, तर त्यांनी त्याचे कौतुकही केले, ज्यामुळे मला अतिशय आनंद झाला. 

हिमालयासोबत एक धोकादायक सामना

सद्गुरूंनी अमरनाथ यात्रेसाठी सात स्वामींची दुसरी तुकडी पाठविली तेव्हा अमरनाथ येथे हिंसाचाराच्या काही बातम्या आल्यामुळे आम्हाला अर्ध्या वाटेतुनच परत फिरावे लागले. 

त्याऐवजी सद्गुरूंनी आम्हाला हिमालयात जाण्याचे निर्देश दिले. या दौर्‍यात एक दिवस सद्गुरूंच्या सूचनेनुसार आम्ही वेगवेगळ्या दिशेने भिक्षा फेरीसाठी निघालो. संध्याकाळी आम्ही जेव्हा एकत्र जमलो, तेव्हा आमच्यातील प्रत्येकाला भिक्षा म्हणून वेगवेगळ्या वस्तू मिळाल्या होत्या - एकाला फळं मिळाली, दुसर्‍याला चॉकलेट वगैरे. आम्हाला प्रत्येकाला ज्या प्रकारची वस्तू दिली गेली होती, त्यावरून असे वाटले की आपल्याला ज्या गोष्टी मिळाव्यात अशी इच्छा होती, किंवा आम्हाला काय आवडते, किंवा आमचा स्वभाव जसा होता,त्याचप्रमाणेगोष्टी मिळाल्या आहेत. मला गव्हाचे कच्चे पीठ मिळाले. होय, आपले अन्न स्वत:च शिजविणे हा माझा स्वभाव होता आणि मला तशी आवड होती. तर अशा अनेक मार्गांनी सद्गुरूंनी आमचे गुण काय आहेत हे आम्हाला दाखवून दिले. 

दुसर्‍यावेळी एकदा, या सहलीदरम्यान, आम्ही भोजवसाच्या दिशेने वर जात असताना, मी एका तात्पुरत्या उभारलेल्या लाकडी पूलावरून घसरलो आणि खालती वेगाने वाहात असलेल्या गंगेत पडलो. काही ब्रम्हचार्यांना व्यवस्थित पोहोता येत नसतानासुद्धा मला वाचवण्यासाठी खाली उडी मारण्याची इच्छा होती पण स्वामी निसर्गांनी त्यांना शहाणपणा दाखवून रोखले. गाईडसुद्धा काही करू शकला नाही. माझ्या हातापायांनी लाकडाच्या ओंडक्याला धरून ठेऊन मी काही वेळ तग धरला, पण माझ्या पाठीवरची पिशवी मला खाली खेचत होती. थोड्या वेळाने, मी तो ओंडका पकडून ठेऊ शकलो नाही, आणि मी नदीत खाली पडलो. परंतु मला जे काही थोडेफार पोहायला येत होते, त्यामुळे मी कसाबसा किनार्‍यावर पोहोचलो. अगदी गाईडच्याही हे लक्षात आले की त्या दिवशी एखाद्याच्या कृपेनेच मला वाचवले आहे. 

मॅरथॉन शर्यती धावणे

सिंगनल्लूरमध्ये वर्षभर राहिल्यानंतर मी आश्रमात राहायला गेलो आणि ऑफिसच्या स्वागतकक्षात काम केले. मी बांधकामाच्या रोख पैश्यांचे व्यवस्थापन- व्हाउचर तयार करणे  आणि मान्यता घेणे, पुरवठा करणारे आणि सेवादारांना पैसे वाटप करणे, पैसे सुरक्षित ठेवणे - हे सर्व काही केले. हा नंतर ईशाचा कॅश पॉईंट बनला. जवळपास 10 वर्षांपूर्वी, अशी एक परिस्थिती आली जेव्हा मला तमिळ प्रकाशनांच्या कामातलक्ष घालावे लागले आणि तेव्हापासून मी तामिळ प्रकाशन विभागाचा एक भाग आहे. 

आश्रमात आल्यानंतर केंव्हातरी, आसपासच्या निसर्गाने प्रेरित झाल्यामुळे, मी हळूहळू धावायला सुरुवात केली - मी यापूर्वी कधीही खेळाडू नव्हतो किंवा कोणताही खेळ खेळलो नव्हतो. एकदा सद्गुरूंनी मला धावताना पाहिले आणि मला ते सुरू ठेवायला सांगितले. त्यावेळी माझे वय 40 वर्षांपेक्षा ज्यास्त होते. परंतु सद्गुरुंच्या प्रोत्साहनानंतर, हा माझा दैनंदिन नित्यक्रम बनला. नंतर त्यांनी मला मॅरेथॉनमध्येही भाग घेण्यास परवानगी दिली. या मॅरेथॉनमध्ये आता आश्रमातील अनेकजण भाग घेत आहेत हे पाहून मला खूप आनंद होतो.

भाग्य

swami-nirakara-isha-blog-on-the-path-of-the-divine

मी असे सांगू इच्छितो की माझे भाग्य आहे की मी ध्यानालिंगाच्या अभिषेकाच्या वेळी येथे होतो आणि त्याच काळात सद्गुरुंसोबत वास्तव्य तिथे केले. मला खात्री आहे की ध्यानलिंग म्हणजे सद्गुरुच आहेत, आणखी कोणी नाही. ध्यानलिंगाचा दगड आयुडियार इथे हलविला गेला त्याच्या आदल्या दिवशी सद्गुरूंनी त्यासाठी एक प्रक्रिया केली. प्रक्रियेदरम्यान, फक्त ध्यानालिंगाभोवती थोडासा हलका पाऊस पडला आहे हे पाहून मला खरोखरच आश्चर्य वाटले –जणू काही देवच ध्यानलिंगाला आशीर्वाद देत होते. ते एखाद्या काल्पनिक दृश्यासारखे होते. 

इथपर्यंतची सर्व वर्षे मी एक तार्किक प्रकारची व्यक्ती होतो. मला प्रत्येक गोष्टीमागचे कारण सापडल्याने क्वचितच एखादी गोष्ट मला त्रास देते. एका मोठ्या अपघातात माझा मोठा भाऊ मरण पावला, तरीही मी ते धीराने घेतले, मी विचार केला “ठीक आहे, झाले ते झाले” आणि अश्रू वाहिले नाहीत.पण अलीकडेच मी गुरुपूजन करीत असताना, माझ्या गालावर अश्रू वाहू लागले. आणि हल्ली मी जेव्हा आमच्या स्वयंसेवकांना इतक्या तन्मयतेने, इतके नि:स्वार्थीपणे काम करीत असल्याचे पाहतो तेव्हा मी आतून हालुनजातो. व्होलनेस कार्यक्रम होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी सद्गुरुंनी एकदा मला सांगितले होते की भविष्यात लाखो लोक ईशा चळवळीत सहभागी होतील आणि त्यांना त्यांची सर्वोच्च क्षमता लक्षात येईल. ते आता खरे होत आहे हे पाहून माझे मन विरघळून जाते. 

सद्गुरूंच्या कुवतीचा एक जीवंत गुरू लाभण्याचे भाग्य केवळ काही पिढ्यांनाच लाभते. सद्गुरु रस्त्यावरच्या भिकार्‍यासह - सर्वांचे उत्थान कसे करावे याबद्दल सतत विचार करत असतात. जेव्हा सद्गुरू ग्रामीण भागातील गरीब लोकांमधे अगदी मनापासून एकत्र मिसळताना मला दिसतात तेव्हा मी नम्र होतो. सद्गुरू हे महासागरांइतकेच अफाट आहेत, परंतु त्यांच्या मनात असणार्‍या  असीम अनुकंपेमुळेच ते आपल्यामध्ये रहात आहेत आणि कार्य करीत आहेत आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काम करत आहेत. ज्यांनी असे चमत्कार केले होते त्या कणप्पा नयनार आणि अलवारांबद्दल मी फक्त पुस्तकांतच वाचले होते, परंतु येथे माझ्या डोळ्यांसमोर एक व्यक्ती प्रत्यक्ष आहे जी मी वाचलेल्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. 

त्यांनी मला दिलेल्या काही संधी मी गमावल्या आहेत असे जरी मला वाटत असले, तरी मी त्यांच्या शिष्यांपैकी एक होण्यासाठी सक्षम आहे हे माझ्यासाठी पुरेसे आहे. माझा मोक्ष? ही त्यांची समस्या आहे. खरोखरच, मी याचा विचारही करत नाही. मी जे स्वीकारण्यासाठी सक्षम आहे ते  काय, कधी आणि कसे द्यावे हे त्यांना माहित आहे. कारण मी स्वतःला ओळखतो त्यापेक्षा ते मला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात.

 

टीप : सद्गुरूंनी स्वामीविषयीच्या सत्संगात असे सांगितले: “स्वामींनी अचानक घोषणा केली,‘ सद्गुरु, मला ब्रह्मचर्य स्वीकारायचे आहे आणि तुमच्याबरोबर यायचे आहे. मी म्हणालो, ‘तुम्हाला खात्री आहे? तुमच्याकडे एक नोकरी आहे, तुमचे पालक वृद्ध आहेत. बरं, तुमचं लग्न झालं नाही, पण तुमच्यावर इतर जबाबदार्‍या आहेत ना? 'तो म्हणाला,' एल्ला नादूळे वंधधु धने, सद्गुरु, 'म्हणजे,‘या सर्व गोष्टी मी फक्त वाटेत चालता चालता गोळा केल्या आहेत, नाही का? ते? 'तर त्याचा अर्थ असा आहे,' वाटेत कुठेतरी मला त्या सोडाव्या लागतील. ही माझी वेळ आहे.