एक आकर्षण

स्वामी सुयग्ना : 1996 मधे ते घडले. मी माझ्या एका सहकार्यासोबत माझ्या ऑफिसच्या कॅंटीनमधे भोजन करत होतो. बोलताना मधेच केंव्हातरी त्याने विचारले, “अरे, कोणीतरी सद्गुरू जग्गी वासुदेव नावाच्या माणसाचा योग कार्यक्रम आपल्या गावात आहे. तुला यायचे आहे का?

ते सगळे योग कार्यक्रम गेले खड्ड्यात! मी असे खूप कार्यक्रम पाहिले आहेत!” मी म्हणालो. त्यापूर्वी मी विपश्यना, वेदतीर्थी कुंडलिनी, विवेकानंद योग आणि असे इतर काही योग अभ्यासवर्ग पूर्ण केले होते. आणि तोपर्यंत मला या सर्व आध्यात्मिक धाडसांचा कंटाळा आला होता. पण माझ्या सहकार्याने तिथे जायचे ठरवले आणि तो सद्गुरूंच्या 13 दिवसांच्या वर्गात तो सहभागी झाला.

पहिले 3-4 दिवस तो वर्गातील अनेक गोष्टींवर टीका करत असे आणि प्रत्येक दिवशी सकाळी तिथे जावं लागतयं म्हणून खूप कुरकुरत असे. पण जसे दिवस पुढे सरकले, तसा तो अधिकाधिक शांत होऊ लागला.“आता हा कुरकुर करत नाहीये,” असे मी एका आठवड्याने म्हणालो. खरे म्हणजे, त्या कार्यक्रमानंतर मला त्याच्यात खूपच बदल घडलेला जाणवला.

त्यानंतर तो मला म्हणू लागला, “तू हा योग कार्यक्रम करायलाच हवास.” खरं म्हणजे तो एक कट्टर टीकाकार होता आणि प्रत्येक गोष्टीवर टीका करत असे, आणि बहुदा म्हणूनच तो माझा मित्र होता. त्याने या कार्यक्रमाचे खूप कौतुक केल्यामुळे ईशा योगाविषयी माझ्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झाली. पण पुरेशी नाही! त्यानंतर मी वर्गात प्रवेश घेण्यासाठी त्याने आणखी एक मार्ग शोधून काढला.

मे महिन्याच्या सुरवातीला कधीतरी त्याने मला सांगितले,“ईशा हिमालय यात्रा आयोजित करत आहे, पण त्यासाठी फक्त ईशाचे ध्यानधारकच नोंदणी करू शकतात.” हिमालयाला भेट द्यायची उत्सुकता मला कायमच होती, आणि ही “ध्यान यात्रा” मला त्यासाठी एक योग्य कारण वाटली, म्हणून मग मी जुन 1996 मधे 13 दिवसांच्या योगाभ्यासाला प्रवेश घेतला. मला वर्ग आवडला, पण मी त्यावर फारसा विचार केला नाही. नंतर पुन्हा माझ्या मित्राने आग्रह केला म्हणून मी सप्टेंबर महिन्यात – आम्ही ध्यान यात्रेला निघण्यापूर्वी अगदी थोडे आधी भावस्पंदन कार्यक्रामासाठी आश्रमात आलो. मला जेवढे समजले आहे त्यापेक्षा माझ्या आयुष्यात अधिक काहीतरी असू शकेल याची जाणीव मला तेंव्हा पहिल्यांदा झाली.

एका झुडुपासोबत अनाकलनीय सामना

तो भाव स्पंदनाचा चौथा दिवस होता. गेले तीन दिवस जे घडत होते तेच त्या दिवशी सकाळी पण घडले – अनेकांच्या डोळ्यात अश्रु आले होते, आणि काही लोकं तर मोठ्यांदा रडत होती आणि एकमेकांना मिठया मारत होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच मी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याच्या भावनेने पहात होतो. “ही लोकं इथे नक्की काय बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत?” असे आश्चर्य मला काहीवेळा वाटत असे कारण त्यांच्यापैकी काही लोकं यापूर्वीसुद्धा रडत असलेली मी पहिली होती आणि मी त्यांची नक्कलसुद्धा केली होती. त्या दिवशी दुपारी, सद्गुरुंनी आम्हाला बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात जायला सांगितले. आम्ही सर्वजण बाहेर आलो, आणि एका लहानशा झुडपाच्या शेजारी जाऊन आता पुढे काय करायचे असा विचार करत बसलो. इकडे तिकडे इतर लोकांकडे पाहिल्यानंतर, मी सद्गुरूंनी सूचना दिल्याप्रमाणे त्या लहानशा झुडपाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.

त्याकडे फक्त पाच मिनिटे बघितल्यानंतर माझ्यात काहीतरी विलक्षण गोष्ट घडली. माझ्या डोळ्यातून हळूहळू अश्रु वाहू लागले. एक प्रौढ व्यक्ती म्हणून मी खूप स्थीर आणि समाधानी असा माणूस होतो. गेल्या 12 वर्षात मी एकदासुद्धा रडलो नव्हतो. “तर मग आता मी का रडतो आहे? मी कशासाठी रडतो आहे?” अश्रु ढळत असतानाच मी जाणीवपूर्वक स्वतःला विचारले. मला कोणतेही कारण सापडू शकले नाही. त्या क्षणी मला कोणत्याही अप्रिय अनुभवांची, किंवा वेदना, किंवा दुखाःची स्मृतीची आठवण येत नव्हती – माझ्या मनात कोणतीही नकारात्मकता नव्हती. पण मी मात्र रडतच होतो, आणि असे साधारण तीन तास चालले. आम्ही पुन्हा सभागृहात परत गेल्यानंतर, मी आत जाऊन सदगुरूंनासुद्धा मिठी मारली. तेंव्हा पहिल्यांदा माझे तर्कशास्त्र पुर्णपणे पराभूत झाले होते.

नमस्कार आणि भरपूर काही

पुढच्या दहा दिवसातच, आम्ही सद्गुरुंसोबत ध्यान यात्रेसाठी निघालो. आम्ही 216 जण कोइंबतुरपासून दिल्लीपर्यन्त रेल्वेच्या स्लीपर क्लासमधून प्रवास करत होतो. माझी आसनव्यवस्था सद्गुरु आणि विज्जी मा आणि इतर काही ब्रह्मचारी यांच्या डब्यात होती. सद्गुरु प्रत्येकाशी मित्रत्वाने बोलत होते, आणि वेळोवेळी ते प्रत्येक डब्यात जाऊन सर्व सहभागी लोकांना भेटण्यासाठी जात असत. त्यानंतर आम्ही बसने प्रवास करत असतानासुद्धा, ते दररोज वेगळ्या बसने वेगवेगळ्या लोकांसोबत प्रवास करत असत.

या रेल्वे प्रवासादरम्यान, मला एकदा सदगुरूंना पाणी देण्याची संधी मिळाली. माझ्या असे लक्षात आले की माझ्याकडून पाणी घेण्याआधी, आणि रिकामा पेला मला पुन्हा परत देत असतानादेखील, सदगुरूंनी अतिशय हळुवारपणे माला ‘नमस्कार’ केला. त्यांच्या या वर्तणूकीमुळे मला शरमिंदे वाटले. मी विचार केला “केवळ एक पेलाभर पाणी मिळाले म्हणून एखाद्या व्यक्तीने येवढी कृतज्ञता का दाखवावी? त्यांचे वर्तन मला मनापासून भावले.

एप्रिल फूल

ध्यान यात्रेहून परत आल्यानंतर माझे आयुष्य नेहेमीप्रमाणे सुरू राहिले. आश्रमात पूर्णवेळ येण्यासाठी अजिबात उत्सुकता नव्हती.

मी माझ्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने मी कायमस्वरूपी ईशात जाणार आहे हे त्यांना समजल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार मी करत होतो.

त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात, मी भारतीय हॉकी कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून काम करायला आश्रमात आलो, आणि तिथे तीन आठवडे राहिलो. कार्यक्रमादरम्यान आम्ही सद्गुरुंसोबत एका शक्तीशाली प्रक्रियेत सहभागी झालो. आणि खरं म्हणजे या कार्यक्रमानंतर मला हे समजून चुकले, की कोणत्याही कारणाशिवाय, मी अतिशय असहायपणे ईशा आणि सद्गुरूंकडे ओढला जात आहे.

माझ्यावर जे. कृष्णमूर्तींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता आणि मी गुरुच्या शोधार्थ बाहेर पडेन असा विचार मी कधीही केला नव्हता. पण अचानकपणे माझी विचारप्रक्रिया बदलली आहे असे मला वाटू लागले. मला पूर्णवेळ ईशामधे असावे आणि त्या वाटेने चालावे असे वाटू लागले. म्हणून मी सद्गुरूंना मी पूर्णवेळ आश्रमात येऊ शकतो का असे विचारले. “तुझ्या पालकांची परवानगी घेऊन ये, आणि त्यांना चालत असेल, तर एप्रिल महिन्यात इथे ये” असे सद्गुरु म्हणाले.

माझ्या पालकांना तयार करण्यासाठी, मी माझ्या बहिणी आणि माझ्या पालकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाग पाडले. ते सर्व त्या कार्यक्रमामुळे भारावून गेले. मी माझ्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा असल्याने मी कायमस्वरूपी ईशात जाणार आहे हे त्यांना समजल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार मी करत होतो. पण माझे पालक अतिशय समजूतदार आहेत हा एक आशीर्वादच होता, आणि माझ्यासाठी या गोष्टी अतिशय सहजपणे घडल्या. जेंव्हा मी त्यांना माझ्या निर्णयाविषयी सांगितले, तेंव्हा माझ्या आईला तो मान्य होता. खरं म्हणजे, मी निघत असताना, तिने माला काही मिठाई दिली आणि आश्रमातील इतरांसोबत ती वाटून घ्यायला सांगितली. माझ्या वडिलांनी विषण्ण होऊन सांगितले, “ही आयुष्यात करण्याची सर्वात मोठी गोष्ट आहे असे माझी बुद्धी सांगते आहे, त्यामुळे जरी तुझ्या निर्णयाशी सहमत होण्यासाठी माझे मन तयार होत नसले तरी तुला थांबवण्यासाठी माझे मन धजावत नाही.” एप्रिल 1997 मधे मी पूर्णवेळ ईशामधे आलो.

त्यावर्षी मे महिन्यात मी प्रथमच सम्यमा कार्यक्रम पूर्ण केला, आणि तो एक अतिशय सुंदर अनुभव होता. डोळ्यातून अश्रु पाझरतच होते, आणि मी प्रत्येक गोष्टीसमोर नतमस्तक होत होतो – गवतापासून मुंगीपर्यन्त आणि माझ्यासमोर येणार्‍या कोणत्याही गोष्टीसमोर. माझ्या पहिल्या सम्यमा कार्यक्रमाच्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. फेब्रुवारी 1998 मधे मला ब्रह्मचर्येची दीक्षा देण्यात आली.

त्या वर्षांमध्ये सद्गुरुंच्या भोवताली अनेक शक्तीशाली गोष्टी घडल्या – विज्जी माच्या महासमाधीपासून ध्यानलिंगाच्या प्रतिष्ठापनेपर्यन्त. मी विजी मां कडे नेहेमीच काहीशी बालिश आणि अत्यंत भावनाशील व्यक्ती या नजरेने पहात होतो. त्या सतत सद्गुरुंच्या अवतीभोवती असत, आणि काहीवेळा मला आश्चर्य वाटत असे की सद्गुरुंची पत्नी अशी कशी असू शकते. ध्यानयात्रे दरम्यान, मला कधी ती लहान बालकाप्रमाणे, तर कधी अतिशय मनापासून भक्ती करणारी वाटत असे – अगदी वेगळ्या परिमाणात हरवून गेलेली. म्हणून तिची महासमाधीने, माझ्या आध्यात्मिक उत्क्रांतीविषयी असलेल्या सर्व कल्पनांचा घात केला.

त्यांनी त्यांच्या शरीराचा त्याग केल्यानंतर आम्ही सदगुरूंना संपूर्ण प्राणप्रतिष्ठापना प्रक्रियेत संघर्षरत असलेले पाहिले. मला आठवते एके दिवशी ते आम्हाला म्हणाले, “आपल्या हातात असणारे काम पाहिले, तर ते साध्य करण्यासाठी मला लिंगासोबत एकरूप होऊन जाण्याशिवाय इतर कोणताही मार्ग तर्कसंगत वाटत नाही, पण माझे हृदय सांगते आहे की मी एक वृद्ध मनुष्य म्हणून मरण पावणार आहे.” प्रतिष्ठापना प्रक्रियेनंतर जेंव्हा सद्गुरू अगदी माझ्यासमोर खाली पडले, तेंव्हा मला हृदयातल्या आवाजाची जाणीव झाली, आणि कसेतरी ते आमच्यासोबत खूप काळ असतील असे वाटले. आणि आमचे प्रचंड भाग्य म्हणून – ते आहेत.

ध्यानलिंग लोकांसाठी खुले झाले तो दिवस मी कधीही विसरणार नाही. सदगुरूंचे स्वप्न पूर्ण होताना बघणे ही अतिशय आनंदाची भावना होती. संपूर्ण दिवस उत्सव सुरू होता. सकाळी सद्गुरुंच्या भाषणाने त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर संगीताचे कार्यक्रम, अन्नदान, वगैरे कार्यक्रम झाले. आमच्या आश्रमात मी यापूर्वी कधीही येवढी गर्दी झालेली पहिली नव्हती – त्यादिवशी 30,000 पेक्षा आधी लोकं ध्यानलिंगाला भेट द्यायला आले होते.

दिवसभर मी कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र होतो, त्यामुळे मी रात्री 9 च्या सुमारास मंदिराला भेट देऊ शकलो. मी जेंव्हा मंदिरात बसलो, तेंव्हा संपूर्ण वातावरण – लिंग, घुमट, अंतर्गत परिक्रमा – प्रत्येक गोष्ट त्यादिवशी मला स्वर्गासमान वाटली. कदाचित त्यावेळी मला पहिल्यांदा हे जाणवले की भिंती आणि खांबांवरचे कोरीवकाम किती सुंदर आहे. त्याच सुमारास, सद्गुरुसुद्धा आत चालत आले. सद्गुरूंनी अंतर्गत परिक्रमा मार्गात पाऊल ठेवल्यापासून ते घुमटात येईपर्यन्त त्यांना पाहणे अतिशय सुंदर होते, त्या थोड्या क्षणांसाठी, एक “दिव्य” शिडकावा त्यांचे स्वागत करण्यासाठी रिमझिमत खाली आला.

बासरीचे हुंकार

1996 मध्ये माझ्या पहिल्या ध्यान यात्रेदरम्यान आमच्या रेल्वेच्या परतीच्या प्रवासात, मी चेन्नई स्थानकावर उतरणार, तेवढ्यात अचानक सद्गुरु मला म्हणाले – “तुझा बासरीचा सराव योग्य प्रकारे सुरू ठेव! त्यांना त्यामधून काय सूचित करायचे होते असा प्रश्न मला तेंव्हा पडला होता, पण मी त्याविषयी काहीही केले नाही. मी जेंव्हा आश्रमात आलो, तेंव्हा माझ्या या लहानशा छंदाचा वापर त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतला. आमच्या बैठकीं दरम्यान ते मला नेहेमी बासरी वाजवायला सांगत.

पहिल्या सम्यमाआधी दोन दिवस स्पंदा सभागृहात सद्गुरु आमच्यापैकी काहीजणांना भेटले आणि संध्याकाळी सत्संगाच्या वेळी कोणते संगीत वाजवायचे याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्या बैठकीत त्यांनी मला बासरीवर एक विशिष्ट धून वाजवायला सांगितली. मी ती धून वाजवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या असे लक्षात आले की माझ्याजवळ असलेल्या लहान बासरीवर ती धून वाजवण्यासाठी मी असमर्थ आहे. त्यांनी मदत म्हणून मला सारख्याच चालीची एक कॅसेट दिली, पण तरीही मला वाटत होते की मी ते करू शकत नाही.

कसे तरी करून मी त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार मी सराव केला आणि सद्गुरूंच्या अपेक्षांच्या आपण अजिबात जवळ नाही अशी भावना मनात ठेऊन मी व्यासपीठावर बसलो. परंतु, माझे वादन सुरू झाल्यावर काही मिनिटांनी, सद्गुरु माझ्याकडे अंगठा उंचावल्याची खूण करून माझे कौतुक करत असल्याचे मी पाहिले. सत्र संपल्यावर ते निघत असताना, त्यांनी पुन्हा एकदा माझे वादन किती छान होते याचा उल्लेख केला. तो अभिप्राय ऐकून मी अतिशय आनंदी झालो – मला वाटले की जणूकाही मला ग्र्यामी पुरस्कारच मिळाला आहे! अखेर एकदा तरी, मी माझ्या गुरूंचे समाधान होईल असे वादन करू शकलो.

ईशा येथे निर्वाण शटकमचा जन्म

2004 किंवा 2005 मधे, एका ब्रम्हचारी बैठकीपूर्वी, सद्गुरूंनी मला एक कॅसेट देऊन सर्व ब्रह्मचारींना बैठकीच्या वेगवेगळ्या दिवसात त्यातील काही सोपे मंत्र शिकवायला सांगितले. म्हणून मी काही मंत्र निवडले आणि त्यांना ते शिकवले. सारे काही सुरळीतपणे पार पडले, आणि दोनच दिवसात बहुतांश ब्रह्मचारी ते मंत्रोच्चार करायला शिकले. तिसर्‍या आणि चौथ्या दिवसा दरम्यान, मला त्या कॅसेटमधे आणखी काही सोपे मंत्र सापडले नाहीत. आता काय करावे याचा विचार करत असतानाच यापूर्वी मी ऐकलेल्या निर्वाण शटकमचे एक कडवे शिकवायचे ठरवले. पण मी ऐकलेली चाल खूपच नाजुक आणि अवघड होती, म्हणून मी त्याला एक सोपी चाल लावली, आणि ब्रह्मचार्यांना “न पुण्यम, न पापं...” हे कडवे शिकवले. आम्ही सराव करत असताना, सद्गुरु आत आले, आणि त्यांना शब्द आणि चाल दोन्ही आवडले आहे असे वाटले. “हे कोणी लिहिले आहे?” त्यांनी विचारले.

“आदि शंकराचार्य” मी उत्तरलो. मग त्यांनी मला सर्व कडवी गायला सांगितली. सर्व सहा कडवी ऐकल्यानंतर, आदि शंकराचार्यांनी हे लिहिल्यामुळे ते अतिशय प्रभावित झालेले दिसले आणि त्यांनी मला सर्व ब्रम्हचार्यांना सगळी कडवी शिकवायला सांगितले. आता हे पाहून खूप आश्चर्य वाटते की हा मंत्र जणूकाही ईशाचे “राष्टगीत” बनले आहे.

ईशा योग शिकवण्याचा आनंद आणि विस्तार

isha-blog-article-on-the-path-of-the-divine-swami-suyagna-with-ashram-inmates

मे 1997 मधे मी शिक्षक प्रशिक्षण वर्गात सहभागी झालो. इतर सर्व ईशा शिक्षकांप्रमाणे, मला देखील, केवळ तेरा दिवसांत माझ्यासमोरच अनेक लोकांमध्ये आमुलाग्र बदल होत आहे हे पाहण्याचे भाग्य मला लाभले. मला अजूनही आठवते, 2000 च्या सुरूवातीला, ईरोड येथील एका वर्गात माझ्या वर्गात एक तरुण विधवा होती, तिने केवळ आठवडाभर आधीच आपला पती गमावला होता. ती अतिशय उदास दिसत होती आणि ती स्वतःला इतरांपासून अलिप्त ठेवत होती. 3-4 दिवसात, मी तिला हळूहळू मोकळे होताना पहिले, आणि तेरावा दिवस उजाडला, तेंव्हा ती अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत होती. मी अगदी अट्टल गुंड असलेल्या कैद्यांमध्ये पण या प्रकारचे परिवर्तन घडताना पाहिले आहे. खरं म्हणजे, सुरुवातीच्या काळात कैद्यांच्या योगवर्गांना खूप विरोध असे, पण एकदा ते त्यात सहभागी झाले, की त्यांच्यात घडून येणारे परिवर्तनही स्पष्टपणे दिसून येत असे.

माझे “मीपण” सुटे करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण ही एक शक्तीशाली प्रक्रिया होती.

कामकाजाच्या बाबतीत, तेरा दिवसांच्या वर्गात शिकवणे हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ होता. शिकवण्याच्या त्या दहा वर्षांच्या काळात, मी एकदाही आजारी असल्याने किंवा इतर कोणत्या कारणाने माझे वेळापत्रक बदलले नाही. त्या वर्षात मी प्रचंड आनंद, समाधान अनुभवले.

13 दिवसांचे वर्ग आम्हा सर्वांसाठी इतका गहन अनुभव होता की जेंव्हा सद्गुरुंनी जाहीर केले की वर्गाची रचना आता 7 दिवसांमध्ये करण्यात येणार आहे, तेंव्हा आमच्यापैकी अनेकांनी या बदलाला विरोध केला. आम्हाला वर्गात आलेले अनेक अद्भुत अनुभव सांगून आम्ही अतिशय आवेशाने त्याविरुद्ध युक्तिवाद केला. त्यांनी अतिशय संयमाने आणि सहानभूतीपूर्वक सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, आणि त्यांच्या निर्णयात आम्हाला सामील करून घेतले. जेंव्हा आमच्या लक्षात आले की सात दिवसांचे वर्गसुद्धा 13 दिवसांच्या वर्गाइतकेच परिणामकारक आणि उत्साहात सुरू आहेत, तेंव्हा आम्हाला त्यांच्या निर्णयाचे सामर्थ्य लक्षात आले.

सद्गुरुंच्या एका गोष्टीबद्दल माझ्या मनात कायमच उत्सुकता होती ती म्हणजे सद्गुरुंनी ईशा योग कार्यक्रमाची केलेली रचना – ती अतिशय अप्रतिम आहे. त्याकाळी प्रशिक्षण सत्रादरम्यान सद्गुरू बहुतेक वेळ आमच्यासोबत असत हे आमचे भाग्यच होते. त्यांची सराव सत्रे आमच्यापैकी कोणी कधीही विसरू शकत नाही. सद्गुरुंनी आम्हाला गुंतागुंतीच्या पण अतिशय सोप्या मार्गांनी खोचक प्रश्न आणि प्रतिप्रश्न करून आम्हाला वर्ग घेण्यासाठी तयार केले ते आमच्या समजापेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा चांगले होते. माझे “मीपण” सुटे करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण ही एक शक्तीशाली प्रक्रिया होती.

सद्गुरूंसोबत सह शिक्षक म्हणून काम करणे नेहेमीच आव्हानात्मक असे. सुरुवातीच्या काही शांभवी कार्यक्रमांपैकी एका कार्यक्रमात मला ते माझ्या शेजारी बसलेले असताना नाडी विभाजन आणि सूर्य नमस्कार शिकवावे लागले. सहभागी व्यक्तींना सूचना देताना मी बावचाळून जातो आहे हे त्यांच्या लक्षात येत होते. काही वेळानंतर, माझी ओढाताण पाहून, सहानभूतीपूर्वक ते वर्गाच्या बाहेर निघून गेले. मी सुटकेचा निश्वास टाकला, आणि माझ्या तोंडातून शब्दांचा ओघ आपोपाप सुरू झाला. 

अशोकाच्या शोधात

2000 साली, आमच्या एका शिक्षकांच्या सभेत, मी सदगुरूंना एक प्रश्न विचारला, “आपण आणि गौतम बुद्ध यांच्यात काय फरक आहे?”

ते म्हणाले, “आमच्यात अनेक गोष्टी समान आहेत, पण त्यांच्यात आणि माझ्यात एक मोठा फरक आहे.”

“तो कोणता, सद्गुरू?” मी पुढे विचारले.

“अशोक!” ते म्हणाले. “त्यांच्याकडे अशोक होता, आणि माझ्याकडे फक्त...” माझ्या लक्षात आले, सद्गुरु त्या एका मोठ्या शक्तीचा संदर्भ देत आहेत ज्यामुळे कोट्यवधी लोकांना सद्गुरु कोण आहेत हे समजण्याची संधी प्राप्त होईल.

सद्गुरूंचे हे एक कठोर विधान होते, आणि त्यामुळे त्यांचे कार्य प्रत्येकापर्यन्त पोहोचवण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. त्या बैठकीनंतर, मी विचार करायला बसलो – आजच्या जगात “अशोक” कोण आहे? माझ्या असे लक्षात आले की आज जगभरात संदेश देण्याची शक्ती सोशल मीडियामधे आहे. म्हणून मी त्यावर काम करायला सुरुवात केली. अनेक मार्गांनी, त्यांचे हे विधान त्याकाळी तामिळनाडुमधील माध्यमापर्यंत आणि प्रभावी व्यक्तींपर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रयत्नामागचे एक प्रमुख कारण होते.

सद्गुरूंचे अवघे जीवनच एक शिक्षण आहे

isha-blog-article-on-the-path-of-the-divine-swami-suyagna-with-sadhguru

सद्गुरु ज्या तळमळीने काम करतात ते अविश्वसनीय आहे: कोणत्याही बैठकीला ते कधीही उशीर करत नाहीत, आणि त्यांनी त्यांची तब्येत किंवा इतर वैयक्तिक अडचणींमुळे त्यांची नियुक्त भेट कधीही रद्द केलेली नाही. एकदा मी त्यांच्यासोबत गोव्यातल्या एका परिषदेसाठी चाललो होतो, आणि मला माहिती होते की आदल्या दिवशी त्यांनी काहीही खाल्लेले नाही. म्हणून आम्ही जेंव्हा कार्यक्रमस्थळी पोचलो, तेंव्हा त्यांनी प्रथम खाऊन घ्यावे असे मला वाटत होते कारण तोपर्यंत त्यांच्या सत्राची घोषणा करण्यात आली नव्हती. माझ्या आग्रहाखातर ते खायला बसले, पण दहा मिनिटातच त्यांनी त्यांच्या सत्राची घोषणा केली आणि त्यांनी त्वरित मंचावर उपस्थित राहावे अशी त्यांची अपेक्षा होती. हे ऐकताच, सद्गुरु ताबडतोब उठून उभे राहिले, त्यांनी त्यांचे हात धुतले आणि ते अजिबात वेळ वाया न घालवता पळतपळतच कार्यक्रमाच्या सभागृहात गेले.

मी कधीही त्यांना महत्वाच्या व्यक्तीसारखे वागताना पाहिलेले नाही. मी ही एक घटना विसरुच शकत नाही, कदाचित 1998 साली, सद्गुरु जेंव्हा ट्रायंगल ब्लॉकमध्ये आमच्यासोबत रात्रीचे भोजन घेत होते. त्यांचे भोजन संपवल्यानंतर, ते त्यांचे ताट धुवायला सिंकपाशी गेले. सिंक पाण्याने पूर्ण भरलेले होते, कारण वाया गेलेले अन्न अडकून सिंकमधे पाणी तुंबले होते. मी पुढे पाहिले, सद्गुरुंनी त्यांचे हात त्या पाण्यात घातले, आणि अडकलेले अन्न बाहेर काढले, तुंबलेले पाणी पुढे वाहू दिले आणि शांतपणे ते निघून गेले. गुरुने अशा क्षुल्लक गोष्टी कराव्या हे माझ्या कल्पनेपलीकडचे होते. ते नेहेमीच खाली झुकतात आणि स्वतःच्या उदाहरणाने नेतृत्व करतात. जेंव्हा पाहुणे त्यांना भेटायला येतात, तेंव्हा ते आम्हाला नेहेमी त्यांचे चालक जेवले आहेत की नाही याची खात्री करून घ्यायला सांगतात. मी अनेकदा हे पाहिले आहे की आश्रमात चालत असताना त्यांना वाळलेली रोपे दिसली की ते त्यांना पाणी घालायला थांबतात. तपशीलाकडे असलेले त्यांचे लक्ष, त्यांची करुणा आणि समावेशकता अतुलनीय आहे.

प्रशासकीय कामामधील चांगले आणि वाईट क्षण

2007 साली, सद्गुरुंनी मला आश्रमात परत येऊन आश्रमाचे प्रशासन सांभाळायला सांगितले. जेंव्हा लोकांना अधिकार देण्याचा प्रश्न येतो, तेंव्हा सदगुरूंची बरोबरी करेल असे कोणीही नाही – ते आम्हाला ज्या प्रकारे अधिकार प्रदान करतात ते अभूतपूर्व आहे. पुढच्या चार वर्षात माझ्याकडे पुष्कळ अधिकार आले. त्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडून आल्या, पण काहीवेळा मी काही चुकासुद्धा केल्या.

वास्तविकतः,मी शिकवत असताना जेवढा मनापासून सहभागी होतो तेवढा प्रशासकीय कामात सहभागी नव्हतो. त्यामुळे त्या कामात 100% सहभागी होण्यास अयशस्वी ठरल्यामुळे, प्रत्येक गोष्ट आव्हानात्मक बनली. जरी मी सतत सर्वोत्तम प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केला, तरी माझ्या कामात मी यशस्वी झालो नाही. या संपूर्ण प्रक्रियेत माझी एक सर्वात मोठी खंत म्हणजे मी सद्गुरूंना मान खाली घालायला लावली.

मला आठवते, सद्गुरुंनी जेंव्हा ईशा संस्कृती शाळा सुरू केली, तेंव्हा मी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते – त्याची संपूर्ण संकल्पना. बारा वर्षांच्या शिक्षणानंतर या मुलांचे काय होईल?” माझ्या मनात हा प्रश्न अनेकदा डोकावत असे. आता या मुलांचे अतिशय उज्वल भविष्य, त्यांची बुद्दिमत्ता आणि क्षमता पाहून सद्गुरुंसारख्या एखाद्या व्यक्तीच्या शहाणपणावर शंका घ्यायची नाही हे माझ्या लक्षात आले. त्यांना माहितीच असते.

प्रशासनाच्या कामातील एक चांगली गोष्ट म्हणजे मला सद्गुरुंसोबत अतिशय जवळून काम करता आले आणि मला त्यांच्यामधील बहूआयामी व्यक्तिमत्व पाहायला मिळाले. त्यांची तळमळ, त्यांचे अविचलीत होणारे लक्ष, त्यांचे अथक प्रयत्न, आणि अनेक परिस्थितींकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहण्याच्या क्षमतेमुळे मी अचंबित झालो.

पण मला असे वाटते की या चार वर्षांच्या काळात, मी त्यांच्या व्यक्तीमत्वाने येवढा प्रभावित झालो, की मी त्यांच्यात असलेला गुरू पाहणे कदाचित विसरून गेलो. पण आमच्यामधील गुरू शिष्याचे नाते बळकट करणारी संधी लवकरच चालून आली.

मौन

ईशामधे घालवलेल्या येवढ्या वर्षात, मी कधीही माझ्यात स्वतःबद्दल किंवा माझ्या साधनेबद्दल काय घडते आहे याची काळजी केली नाही – माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची होती आणि ती म्हणजे ईशाचे कामकाज सुरळीतपणे कसे पार पडेल हे बघणे. तर 2011 साली, सदगुरूंनी जेंव्हा मला दीड वर्षांसाठी कामकाजातून लक्ष काढून घ्यायला सांगितले, तेंव्हा त्यांचे शब्द म्हणजे खरोखरच आशीर्वादासारखे भासले. त्यामुळे मला माझ्या अंतर्मनात डोकावुन पाहता आले आणि मी इथे का आलो आहे याविषयी माझ्या मनात स्पष्टता आली. माझ्या लक्षात आले की काहीवेळा मी अतिशय मूर्खासारखा वागत होतो. हा साक्षात्कार आणि आत्मपरीक्षण यामुळे मला बरीच वर्षे माझ्या मनात सुरू असलेले द्वंद्व आणि गोंधळ यामधून बाहेर पडता आले.

हळूहळू, सद्गुरुंनी आम्हाला काय दिले आहे ते मी कृतज्ञपणे स्वीकारायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, सद्गुरू पुन्हा पुन्हा सांगत असलेली एक सोपी गोष्ट – तुम्ही आनंदी नाही कारण आयुष्य तुमच्या मनासारखे घडत नाही.” हे वाक्य माझ्या मनात घर करून बसले. थोडा वेळ मौन बाळगल्यानंतर, मला आराम मिळाला आणि मला माझ्या स्वतःत एका नवीन स्तरावरचे स्वातंत्र्य सापडले. या साधनेमुळे मला आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोण मिळाला आणि माझ्या मार्गावरचे माझे लक्ष अधिक तीव्रतेने केन्द्रित झाले. “...आणि आता, योगा” – पतंजलि योग सूत्रामधील पहिली ओळ – माझ्यासाठी एक जीवंत वास्तविकता बनली.

तो दिवस – तो क्षण

नुकतेच माझ्या असे लक्षात आले की काही महिन्यांपूर्वी मी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे – पण मी म्हातारा झालो आहे असे मला वाटत नाही. खरं म्हणजे, मला मी महाविद्यालयात होतो त्याहीपेक्षा अधिक उत्साही वाटते. माझा ईशा आणि सद्गुरुंसोबतचा प्रवास इतका समृद्ध आणि परिपूर्ण झाला आहे की सदगुरूंनी आम्हाला साधना आणि ब्रह्मचर्याच्या स्वरुपात जे काही दिलेले आहे त्याची आदलाबदल आम्ही जगातील कोणत्याही गोष्टीबरोबर कधीही करणार नाही.

शेवटी, मी इथे पूर्णवेळ आलो तेंव्हा सद्गुरुंनी मला सांगितलेली पहिली गोष्ट मला नेहेमी आठवते: “तू एखाद्या दगडासारखा असावास; आम्ही तुला आम्हाला वाटेल तिथे फेकून देऊ. तुला हे मान्य आहे का?” ही सर्व वर्षे माझ्यासाठी ही एक मार्गदर्शक शक्ती राहिली आहे – कोठेही, कधीही फेकले जाण्यासाठी तयार असणे आणि त्यात संपूर्णपणे सहभागी होणे.

माझी एकमेव आकांक्षा म्हणजे – मी त्या दिवसाची आणि त्या क्षणाची वाट पहातो आहे जेंव्हा मला कोणत्याही कृतीची गरज उरणार नाही, मी फक्त मुक्त असेन. तोपर्यंत, कोणीतरी मला कोठेही, कधीही, आणि कितीही आयुष्ये फेकून देण्यासाठी मी तयार आहे ...