21 योगासनांचाच संच का?
ईशा हठ योग कार्यक्रमात 21 आसनांचा संच का वापरतात ? सद्गुरू सांगतात की शारीरिक उर्जा मोठ्या प्रमाणात वाढवण्यापूर्वी त्यासाठी शरीरप्रणाली सक्षम व तयार असणे फार आवश्यक आहे.
प्रश्न: इशा हठ योगाच्या प्राथमिक योगासने कार्यक्रमात शिकवण्यासाठी आपण एकंदर 84 शास्रीय आसनांमधून 21 आसने निवडली आहेत. हीच आसने का निवडावीशी वाटली?
सद्गुरू: अगदी सुरवातीलाच चौर्याऐंशी आसनांचा संच म्हणजे जरा जास्तच होईल. या आसनातील काही आसने ही प्रारंभिक किंवा पुढच्या तयारीसाठी असतात. म्हणजेच ती साधनापदाचा एकभाग असतात. आणि इतर काही अशी आसने आहेत जी परिवर्तनाची साधने आहेत आणि ती कैवल्यपदा चा भाग असतात. ही दोनपदे वर्षातील ठराविक कालावधीसाठी अनुरूप असतात. पहिली एक चतुर्थांश आसने ही शरीरप्रणाली सज्ज व तयार करण्यासाठी असतात. समजा आपल्याला अंगात प्रचंड उर्जा भरायची आहे, तर आपली शरीरप्रणाली त्यासाठी तयार व सक्षम हवी.
उर्जा शरीरास चालना
याकडे एका सोप्या पद्धतीने पहायचे झाल्यास – भौतिक शरीर असते, कार्मिक किंवा मानसिक शरीर आणि उर्जा शरीर असते. जरी परिपूर्ण नसले तरी सादृश्य उदाहरण द्यायचे झाल्यास, आपण असे समजूया की ही तीन शरीरे म्हणजे एकात एक असलेल्या तीन कुप्या आहेत. आता समजा उर्जा शरीरात मोठ्या प्रमाणावर वाढ करायची आहे. सर ते शेवटी आपल्याला तेच साध्य करायचे आहे – पण बाकीच्या दोन शरीरांनी जागाच दिली नाही तर, नक्कीच काही तरी मोडतोड होईल. म्हणून पहिली पायरी आहे ती म्हणजे शरीर त्यासाठी अनुकूल बनवणे. त्यासाठी बरेच मार्ग आहेत. त्यातला एक सोपा मार्ग आहे भूत शुद्धीचा. पंच तत्त्वांचा व्यवहार शरीराच्या आत बाहेर चालूच असतो आणि किमान आपल्या श्वसना द्वारे तो आपल्याला जाणवत असतो.
ही देवाण-घेवाण सतत या सर्व स्तरांवर चालूच असतात. तुम्हाला हे सुद्धा जाणवेल की कस बाहेरील तापमान हे तुमच्या शरीराच्या तापमानात बदल आणतो. याचा अर्थ हे आग तत्वाच्या देवाण-घेवाणामुळे झालायं. अन्न आणि पाण्याचा संबंध पृथ्वी आणि जल तत्त्वांशी येतो. ही देवाण-घेवाण फक्त तुम्हाला, लक्षात येईल या स्तरावर मर्यादित असते असा नाही तर अतिशय मुलभूत देखील आहे. महाभूतांचे परिमाण तुम्ही कोण आहात हे जरी ठरवत असले तरी तुम्ही आखलेल्या सीमा ती जुमानत नाहीत.
तुमच्या "स्व" ठरवणाऱ्या सीमा या पूर्णतः शारीरिक आणि मानसिक स्वरूपाच्या असतात. महाभूतांच्या स्तरावर अशा कुठल्याच सीमा नसतात. योग म्हणजे या वैयक्तिक सीमा पुसून टाकणे. ऐक्य ही जीवनाची पद्धत आहे आणि आपल्याला जीवन जसे आहे तसे समजले पाहिजे. तू आणि मी ही विभागणीच काल्पनिक आहे. जशी हवा ही सर्वत्र फिरत असते, तसच बाकी सर्व काही वेगवेगळ्या पद्धतीने फिरत असते. तुमच्यातील महाभूतांचे प्रमाण हे रोज वेगळे असते. त्यांच्यातील व्यवहार मात्र सदैव चालूच असतो.
चौर्याऐंशी आसनांपैकी बहुतेकांचे प्रयोजन हे तुमची उर्जा वाढवण्याचे असते. उर्जेची वृद्धी मोठ्याप्रमाणावर करतांना आपलं शरीर आणि मन ती स्वीकारेल का हे पहिले पाहिजे. त्यासाठी काही पूर्व तयारी, विस्तार आणि पारदर्शकता अत्यावशक असते. नाहीतर ते फुग्यात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त हवा भरण्यासारखे होईल. ही पहिली मालिका तुमच्या शारीरिक आणि मानसिक सीमा अस्पष्ट करतील जेणे करून तुम्हाला सदैव जाणीव राहील की "हा मी आहे – तो तू आहेस" ही संकल्पना फक्त व्यवहारीच असते. आणखी मुलभूत स्तरावर सांगायचे झाले तर, "हे" आणि "ते" यात स्पष्ट सीमारेषा अशी नसतेच.