अध्यात्म मार्गावरील प्रगतीचे मूल्यमापन
अध्यात्मिक मार्ग हा गोंधळून टाकणारा प्रवास होऊ शकतो, आणि एखादा समोर जात आहे, मागे जात आहे, की एकदम भलत्याच दिशेला जात आहे, हे पूर्णपणे स्पष्ट असेलच असे नाही. यावर सद्गुरू पुढील लेखात प्रकाश टाकत आहेत.
प्रश्न : आपण किती अध्यात्मिक प्रगती अनुभवली आहे हे आपल्याला कसे कळेल? अध्यात्मिक मार्गावर पुढे जात आहोत की नाही हे आपल्याला कसे कळून येईल?
सद्गुरु : प्राथमिक अवस्थांमध्ये, तुम्ही पुढे जात आहात किंवा मागे जात आहात याची काळजी करू नका, कारण तुमची तार्किक सूज्ञता एकदम दिशाभूल करणारी असू शकते. सकाळी जेव्हा तुम्ही क्रियेसाठी बसता, तुमचे दुखणारे पाय तुम्हाला सांगतील की तुम्ही मागे-मागे जात आहात, आणि कदाचित तुमच्या कुटुंबातील लोकंसुद्धा हा मूर्खपणा बंद करायला सांगतील. त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये कशाचेही मूल्यमापन करू नका. काहीशा निश्चित काळासाठी बिनशर्त वचनबद्धता राखून अध्यात्मिक प्रवास सुरू केलेला नेहेमी उत्तम. तुम्हाला कासल्याही प्रकारच्या तथाकथित 'अध्यात्मिक प्रगती' किंवा फायदे होण्याची गरज नाहीये. फक्त वचनबद्धता राखून सहा महिने साधना करा. त्यानंतर तुमच्या आयुष्याचे मूल्यांकन करा आणि बघा किती शांतीपूर्ण, आनंदमय, स्थिर आहात तुम्ही. याने तुमच्यात कोणते बदल होत आहेत?
एखादी व्यक्ती जी तिच्या अंतरंगात अत्यंत उच्चतेला पोहोचली आहे, तीसुद्धा स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी काहीसा वेळ घेते, कदाचित नेहेमीच्या पद्धतीने नाही,पण ते वेगवेगळ्या मार्गांनी करते. गौतम बुद्धांच्या आयुष्यात एक घटना घडली. एक विशिष्ट दिवशी, प्रत्येकजण येऊन बुद्धांना नतमस्तक होत होते, पण एक माणूस आला आणि त्यांच्या चेहेऱ्यावर थुंकला. आनंदतीर्थ, बुद्धांचा निष्ठावान शिष्य, ज्याने बुद्धांची पूजा केली, आराधना केली, एकदम क्रोधीत झाला. तो म्हणाला, "मला परवानगी द्या, आणि मी ह्या माणसाला चांगला धडा शिकवतो. तो तुमच्या चेहऱ्यावर कसं काय थुंकू शकतो?" गौतम बुद्ध म्हणाले, "नाही", आणि त्या व्यक्तीचे आभार मानले. ते म्हणाले,"माझ्या चेहऱ्यावर थुंकल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद; कारण त्याने मला हे तपासण्यासाठी संधी दिली की माझ्यात अजूनही क्रोधीत होण्याची क्षमता आहे की नाही. मी अतिशय आनंदी आहे कारण मला हे कळले की जरी लोकांनी माझ्या चेहऱ्यावर थुंकले तरी मी क्रोधित होत नाही. हे अतिशय चांगलं आहे. तू मला माझे मूल्यांकन करायला मदत केलीस, आणि त्याचवेळेस तू आनंदलासुद्धा ती संधी दिलीस. त्यामुळे अनेक अनेक धन्यवाद. आपण दोघे या क्षणी कुठे आहोत याची जाणीव तू करवून दिलीस."
त्यामुळे काहीही झालं तरी कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वतःला प्रामाणिकपणे साधनेसाठी काही काळ तरी झोकून द्या. काही चमत्कार घडण्याची वाट बघू नका. या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे जीवन स्वतः. जीवनाची ही प्रक्रिया, तुमचं इथं बसून श्वास घेत असणं, हाच एक चमत्कार आहे. जर तुम्हाला या चमत्काराचे विशेष वाटत नसेल, आणि तुम्ही एखाद्या वेगळ्या प्रकारच्या चमत्काराची अपेक्षा करत असाल जिथे एखादी देवता तिचा हात आकाशातून खाली घेऊन तुमच्यासोबत काहीतरी करेल, तर तुम्ही आजूनही बालिश आहात. तुमच्यात अजून समज आलेली नाही आणि अजूनही परिकथांवरच विश्वास ठेवत आहात. त्यामुळे, तुमच्या अध्यात्मिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी घाई-गडबड करू नका; तिला फक्त आत रुजू द्या.
सामान्यतः, या परंपरेमध्ये, कोणतीही अध्यात्मिक प्रक्रिया सुरू करताना मागितली जाणारी एक साधी वचनबद्धता १२ वर्षांची होती. तुम्ही फक्त एक साधा मंत्र बारा वर्षं पठण करायचा आणि मग बघायचं तुमच्या आत काय होतंय. आजसुद्धा, बरेच अध्यात्मिक पंथ हा मार्ग अवलंबितात. एखादा गुरू तुम्हाला बारा वर्षं पठण करण्यासाठी एक मंत्र देतो, आणि मग तुम्ही तुमची प्रगती मोजण्यासाठी मागे वळून पाहता. पण आज, आयुष्यात लोकं कितीतरी जास्त उतावीळ झाले आहेत. आम्ही बारा दिवस जरी त्यांच्याकडून वचनबद्धता मागितली, तरी लोकांना कितीतरी अडचणी असतात. हे खूपच वेळखाऊ आहे, असं म्हणून लोकं तक्रार करतात.
गौतम बुद्धांच्या त्यांच्या स्वतःच्या काही पद्धती होत्या. जर कोणी त्यांच्याकडे आलं, तर तिथे काहीही शिकवलं जात नव्हतं, अध्यात्मिकही नाही किंवा अजूनही कसलं काही नाही, दोन वर्षांसाठी. तुम्ही मधल्यामध्ये लटकल्यासारखे राहणार. जर तुम्ही दोन वर्षं धीर धरू शकले, तर तुमच्या आत एक प्रकारची समज बहरते आणि तुमच्यासोबत काहीतरी घडण्यास सुरुवात होते. मग जेव्हा ते तुम्हाला दीक्षा देतात, तेव्हा ते तुमच्यामधे एका भव्य स्वरूपात घडून होते. पण आज, लोकं धीर धरण्यासाठी झगडत आहेत कारण आधुनिक मन इतकं चंचल होऊन गेलंय. कुठल्याही घाई-गडबडीत राहू नका. फक्त साधनेला चिटकून राहा, आणि मग कालांतराने स्वतःचे मूल्यांकन करा.