रागावर नियंत्रण कसे ठेवावे?
आपल्याआयुष्यावर रागाचा एवढा का पगडा आहे या प्रश्नाचं उत्तर देत सदगुरू, या बद्दल आपण काय करू शकतो हे समजावत आहेत.
Read in Telugu: కోపాన్ని నియంత్రించడం ఎలా..?
प्रश्न: काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो, आणि नंतर आपल्या मूर्खपणाचा पश्चाताप होतो. पण तोवर वेळ निघून गेलेली असते. तर रागाचे नियंत्रण कसे करावे?
सदगुरु: रागाचे नियंत्रण करण्याची गरज नाही. या क्षणी तुम्ही रागावलेले आहात का? नाही. मग, जे अस्तित्वातच नाही त्याचं नियंत्रण का करावं? जे अस्तित्वातच नाही त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करणार? राग म्हणजे एक प्रकारची त्रासिक स्थिती. तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या सर्वांसाठी. बहुतेकदा ज्या व्यक्तीवर तुम्ही रागावता त्यापेक्षा तुम्हालाच याचा अधिक त्रास होतो. आणि जेव्हा तुम्ही रागावता, तेव्हा तुम्ही आयुष्यातल्या सर्वांत मूर्खपणाच्या गोष्टी करता. जगण्याचा हा नक्कीच शहाणपणाचा मार्ग नव्हे.
राग उदभवण्याचे कारण म्हणजे तुमच्या मनात घट्ट झालेल्या तुमच्या आवडी-नावडी. अगदी खोलवर रुजलेली तुमची विचारसरणी आणि भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीशी तुम्ही तुमची ओळख घट्ट बांधलेली आहे. मग जेव्हा कोणी या विचारसरणीच्या चौकटीत बसत नाही, तुम्ही त्यांच्यावर रागावता. याप्रकारे जसजसं तुमच्या आवडी-नावडी आणि तुम्ही निर्मिलेल्या अनेक “मी” पणाच्या ओळखी भक्कम होत जातात, तसतसं तुम्ही बाकीच्या सर्व सृष्टीलाच तुमच्यापासून वेगळं करत जाता. जेव्हा तुम्ही म्हणता, “हे मला फार आवडतं,” त्याच क्षणी तुम्ही बाकीचं सर्व अस्तित्व तुमच्यापासून वेगळं करता. जेवढ्या तुमच्या आवडी-निवडी अधिक तीव्र होत जातील, तेवढाच हा वेगळेपणाचा भाव अधिक प्रखर होत जाईल. तुमच्यातून राग बाहेर येतो कारण तुम्ही कुणालातरी किंवा कशालातरी स्वतःचा एक भाग म्हणून सामावून घ्यायला तयार नाही आहात. सामावून घेतल्यानं, तुम्ही मुक्त होता. ज्या दिवशी, सर्वकाही, संपूर्ण अस्तित्व तुम्हामध्ये सामावेल, तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल. वेगळेपणाचा भाव तुम्हाला बंधनात अडकवून ठेवतो, तुम्ही वेगळे बनून राहता.
राग ही तुमची निर्मिती आहे
तुमची रागावण्याची नक्कीच इच्छा नसते, पण तरीही राग येतो. कारण तुमच्या आत जे काही घडतंय, ते कुठल्यातरी बाहेरच्या गोष्टीमुळे होतंय असा तुमचा समज आहे – जे खरं नाही. जरा लक्ष देऊन बघा, हे सगळं तुम्ही स्वतःच निर्माण करत आहात. तुम्हाला स्वतःला नको तेच तुम्ही का निर्माण करत आहात? याचं एकच मुलभूत कारण म्हणजे – तुमचं स्वतःबद्दलचं अजाणतेपण.
तुमची शरीर यंत्रणा कशी काम करते, तिची व्यवस्था कशी राखावी याचं ज्ञान तुम्हाला जरअसतं, तर तुम्ही राग निर्माण केला असता का? राग, ना केवळ बाहेरील परिस्थिती बिघडवतो, तो तुमचं आंतरीक वातावरणसुद्धा मलीन करतो. लोक प्रचंड प्रमाणात राग निर्माण करत आहेत आणि परिणामस्वरूप अनेक प्रकारच्या व्याधीं शरीरात निर्माण करत आहेत. आणि याचे सभोवतालच्या परिस्थितींवर सुद्धा परिणाम होतात.
तुमच्या प्रत्येक कृतीचा एक निश्चित परिणाम असतो. तो तुम्हाला टाळता येणार नाही. जेव्हा परिणाम चुकवणं शक्य नाही तेव्हा तुमच्या कृतीवर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि कृती तेव्हाच नियंत्रित करता येते जेव्हा माणूस आतून नियंत्रित असेल. जेव्हा तो पूर्णतः संतुलित असेल तेव्हाच सुसंगत कृती घडू शकते. अशा कृतींनां सुद्धा परिणाम असतात, आणि ते नेहमीच असतील. जीवन प्रक्रियाच अशी काही आहे, की स्वाभाविकपणे तिचे पुष्कळ परिणाम आहेत. तुम्ही पुन्हा त्यात नव्यानं परिणामांची भर घालायची गरज नाही.
विशेषकरून, तुमच्या सभोतालची परिस्थिती जर अशांत, तणावपूर्ण असेल, तर तुम्ही स्वतःला शांत व आनंदी ठेवून, हा आनंद इतरांबरोबर कसा वाटता येईल हे बघणंअगदी महत्वाचं नाही का? जेव्हा तुमची कृती तुमच्या बुद्धीमत्तेतून उपजेल तेव्हा तुम्ही असेच वागाल. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती जर निराशजनक असतील तर तुम्ही स्वतःला शक्य तेवढे संतुलित, आनंदी ठेवणे हेअत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही जे आहात तेच तुम्ही तुमच्या सभोवताली निर्माण करूकराल. क्रोधीत असाल तर तुमच्या सभोवताली क्रोधच निर्माण कराल. आणि अधिक क्रोधाबरोबर तुमच्या सभोतलच्या परिस्थितींमध्ये आणखी अधिक कटूता येईल.
तीव्रतेच्या शोधात
क्रोध ही एक जबरदस्त तीव्र भावना आहे. प्रत्येक मनुष्य तीव्रतेच्या शोधात आहे. आज रोमांचक, धडाकेबाज चित्रपट आणि क्रीडा प्रकार इतके लोकप्रिय आहेत, याचं कारण, लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारची तीव्रता अनुभवण्याच्या शोधात आहेत. आणि ही तीव्रता ते एकतर शारीरक कृतीतून, राग किंवा वेदनेतून अनुभवतात. आज मादक पदार्थांचे सेवन आणि कामवासना इतके मोठे विषय होण्याचं मुख्य कारण, लोकांना काही क्षणांसाठी का होईना, थोडीफार तीव्रता अनुभवायची असते. तीव्रतेचा अनुभव, बऱ्याच गोष्टींपासून सुटका करतो. क्रोध सुद्धा तुमची बऱ्याच गोष्टींपासून सुटका करू शकतो पण क्रोधाची एक समस्या ही, कि ती एक शुद्ध तीव्रता नाही. ती तुम्हाला बाह्य परिस्थितीत अडकवून ठेवते.
हे जरुरी नाही की केवळ क्रोधानेच तुम्हाला कृती करण्यास प्रेरणा मिळावी. आयुष्यात तुमचा अत्यंत तीव्र अनुभव कदाचित क्रोधच असेल. म्हणूनच लोक क्रोधाला महत्व देतात, कारण तो तुम्हाला कृती करण्यास उत्तेजना देतो. पण दुर्दैवाने तुम्ही आनंद आणि प्रेमाची तीव्रता कधी अनुभवली नाही. प्रेम आणि करुणा सुद्धा – अगदी हळुवारपणे पण छान आणि प्रभावीपणे तुम्हाला कृती करण्यास प्रेरित करू शकतात.
घरी आणि ऑफिसमध्ये तुम्हाला रागीट लोकांबरोबर राहायचंय की शांत आणि आनंदी लोकांबरोबर? साहजिकच तुम्हाला शांत आणि आनंदी लोकांबरोबर रहायचंय. लक्षात ठेवा, तुमच्या सभोवतालच्या सर्वांची सुद्धा हीच अपेक्षा आहे. तुमच्या सभोवतालची प्रत्येक व्यक्ती नेहमी शांत आणि आनंदी लोकांबरोबर राहण्याची आणि काम करण्याची अपेक्षा करत असते.
Editor’s Note: Find more of Sadhguru’s insights on human emotion in the ebook “Emotion: The Juice of Life”, available at Isha Downloads.