महाभारत भाग १५: पांडव हस्तिनापूरमध्ये पोहोचले
महाभारत मालिकेमधील या भागात आपण पाहूया की पांडव बंधू हस्तिनापुरात दाखल झाले आणि त्यामुळे दुर्योधनाचा कसा विरस झाला. दरम्यान, आपण हे पण पाहू की शकुनीच्या मनात बदल्याची भावना कशी उत्पन्न झाली आणि जी पुढे जाऊन दोन फास्यांच्या (द्द्युताच्या) भयानक खेळासह पूर्ण झाली.
पांडव - जेव्हा जंगल हेच त्यांचे घर होते
सद्गुरू: पाच पांडव भाऊ जंगलातच लहानाचे मोठे झाले. योग्य मार्गदर्शनाखाली रानावनात राहून सर्वोत्तम मार्गदर्शन मिळू शकतं जे पांडवांना मिळालं. ऋषी मुनींनी तर त्यांना प्रशिक्षण दिलंच, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मोकळ्या निसर्गाने त्यांना विवेक आणि सामर्थ्य दिलं. ते बलवान, धैर्यवान, शहाणे आणि शस्त्रास्त्र कलेत पारंगत झाले.पांडू – ज्याच दुर्दैव वासनेपोटी पक्क झालं !
त्यांचे वडील पांडू याला शाप मिळाला होता की जर तो आपल्या पत्नीकडे कधीही संभोगाच्या वासनेने जाईल तर तो तत्काळ मरण पावेल. म्हणून त्याने आपल्या पत्नींना इतर मार्गांनी मुले होऊ देण्याची व्यवस्था केली होती. सोळा वर्षे तो आपल्या बायकांपासून दूर राहिला. त्यानी ऋषीमुनी आणि संतांबरोबर वेळ व्यतीत केला, ज्ञानाचा निदिध्यास घेतला, ब्रह्मचर्य साधना केली आणि एक शक्तिशाली मनुष्य बनला. पण एके दिवशी जेव्हा तो जंगलातल्या एका निर्जन ठिकाणी नदीकिनारी पोहोचला, तेव्हा त्याची दुसरी पत्नी माद्री ही स्नान करून नुकतीच पाण्यातून बाहेर आली होती. जेव्हा त्याने तिला अचानक नग्न पाहिले तेव्हा तो तिच्याकडे इतका आकर्षित झाला की इतक्या वर्षानंतर स्वतःवरचा ताबा गमावून तिच्याकडे खेचला गेला. पांडूच्या शापाबद्दल माहिती असलेल्या माद्रीने कडक प्रतिकार केला पण नियतीने त्याला तिच्याकडे ओढले आणि तिच्या मिठीतच पांडू मरण पावला. ती भीतीने जोरात किंचाळली - तीची भीती फक्त तीचा नवरा मरण पावला ही नव्हती तर तिच्या विषयीच्या असलेल्या पांडूच्या वासनेनेच त्याला मारले हीसुद्धा होती. कुंतीने किंचाळणे ऐकले ती धावत त्या ठिकाणी पोचली. समोरचं दृश्य पाहून तिच्या लक्षात आले कि काय घडले आहे आणि ते पाहून तो प्रचंड संतापली. इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेल्या दोघींच्या भावना अचानक उफाळून आल्या.
काही वेळानंतर, कुंती आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या विचाराने शांत झाली. अपराधीपणाच्या भावनेत आणि निराशेमुळे माद्रीने आपल्या पतीला सोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळासाठी कुंतीने तिला माद्रीच्या जागी सती जायचे आहे, असे नुसते भासवले, पण तिचा मनात काय करायचे आहे याचा निश्चय आधीच झालेला होता. राणी म्हणून आवश्यक असणारी सर्व कृत्य तिने निर्दयपणे पार पाडली. मग ऋषीं समवेत कुंती आणि पाच पांडव सोळा वर्षांच्या वनवासानंतर हस्तिनापूरकडे निघाले.
पांडव हस्तिनापुरला परतले
अनेक वर्ष दूर राहिलेले आणी सर्वांच्या विस्मृतीत गेलेले आपले चुलत भाऊ परत येत असल्याची बातमी कुरुंच्या राजधानी हस्तिनापुरला जेव्हा पोहोचली तेव्हा दुर्योधन ईर्ष्येने आणी द्वेषाने लाल झाला. आपणच भावी राजा आहोत या विश्वासातच तो लहानाचा मोठा झाला होता. आधीच त्याचे वडील दृष्टिहीन होते आणि त्यात त्याच्याबद्दल असलेल्या भावनिक आंधळेपणामुळे तो एक प्रकारे आधीपासूनच राजा होता आणि तसे सर्वकाही त्याच्या हिशोबाने होतदेखील असे. पण आता अचानक त्याच्यासमोर एक प्रतिस्पर्धी उभा होता जो इतरांच्या नजरेत सिंहासनाचा खरा वारस होता. त्याला काही हे सहन होणं शक्य नव्हतं. त्याने आपल्या भावांना भडकवायला सुरुवात केली. दुर्योधनाच्या तुलनेत त्याचे भाऊ तसे साधे होते आणि राष्ट्रावर राज्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाकांक्षेचा त्यांच्यात अभाव होता. दु:शासनामधे त्याला त्याचा सर्वात उपयुक्त सहभागी सापडला, जो त्याच्या शंभर भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.
पांडव हस्तिनापुरात यायच्या आधीपासूनच ते दोघेही पांडवांवर संतापलेले होते. जनतेचे प्रेम पांडूवर होते. जरी राजा म्हणून त्याचा अधिकृतपणे राज्याभिषेक झालेला नव्हता तरी सर्व व्यावहारिक दृष्टीने राजा तोच होता. पांडुच होता ज्याने राष्ट्राला संपत्ती मिळवून दिली होती, राष्ट्रासाठी जमीन जिंकून दिली होती आणि प्रशासनाची काळजी सुद्धा तोच घ्यायचा. सोळा वर्षं तो स्वेच्छेनं वनवास भोगत होता आणि आता तर तो मरणसुद्धा पावला होता. त्याची मुलं लोकांनी यापूर्वी कधीच पहिली नव्हती, अन ते आता परत आल्यामुळे जनमानसात एकच उत्साह होता.
कुतूहल आणि प्रेमापोटी शहरातले सर्व लोक जमा झाले. जेव्हा पांडव व त्यांची आई कुंती शहराजवळ आले तेव्हा लोकांनी एकच जल्लोष केला. पांडव मुले वनवासात मजबूत बांध्याची झाली होती. राजवाड्यात ते जेवढे वाढले असते त्यापेक्षा ते कितीतरी अधिक मजबूत ते वनवासात वाढले होते. शंभर कौरव हे धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, विदुर आणि इतर सर्व वडील मंडळी शहर दरवाज्यावर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. अंध असल्याने जगाकडे पाहण्यासाठी आणी इतर गोष्टींमध्ये मदत व्हावी म्हणून धृतराष्ट्र लहानपणापासूनच पांडुवर अवलंबून असे. पांडू धृतराष्ट्राचा लहान भाऊ असूनदेखील त्याच्याशी दयाळूपणे वागत असे. या धृतराष्ट्राच्या भावना याक्षणीतरी मिश्र अशा होत्या. त्याचा असा विश्वास होता की त्याचं त्याच्या भावावर प्रेम आहे. पण आपली मुले राजे होणार नाहीत हे लक्षात आल्यावर ज्या भावनांमधून तो जात होता त्या त्याला उमजत नव्हत्या.
दुर्योधन - द्वेषाचा उदय
पांडवांचे आणि कुंतीचे स्वागत झाले. पांडूसाठी अंत्यविधी करण्यात आले. आणि जसे पांडव राजवाड्यात राहायला आले त्या क्षणापासूनच भविष्य स्पष्ट दिसू लागले, विशेषत: भीम आणि दुर्योधन यांच्यात, कारण ही दोन्ही मुले सर्वात बलवान होती. भीम हा आडदांड बांध्याचा होता आणि दुर्योधन पण शारीरिक सामर्थ्यांत भीमाला तोडीस तोड होता. भीम आयुष्यात प्रथमच राजवाड्यात राहत होता आणी त्यामुळे भरपूर उत्साहात होता. सगळीकडे धुडगूस घालणारा साधा असा भीम सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवून सोडायचा, दुर्योधनासकट कौरव भावंडाना गमती गमती मध्ये बडवायचा आणि भरपूर खोड्या करायचा.
त्यांच्यात पहिला खटका उडाला तो कुस्तीच्या आखाड्यात. दुर्योधनाचा ठाम विश्वास होता की कोणीही त्याला कुस्तीत हरवू शकत नाही. त्याच्या शंभर भावांमध्ये तो सर्वात बलवान होता आणि कुस्तीच्या आखाड्यात त्याच्या वयाचं कोणीही त्याला टक्कर देऊ शकत नव्हतं. जेव्हा भीम कुस्तीचे सामन्यामागे सामने जिंकत चालला होता आणि त्यामुळे लोकप्रिय होत चालला होता तेव्हा दुर्योधनाने ठरवले की संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत त्याला राजवाड्यात कुस्ती सामन्यासाठी आव्हान द्यावे जेणेकरून सर्वांसमोर भीमाला त्याची जागा दाखवता येईल. इतरांसाठी जरी ही मैत्रीपूर्ण लढत असली तरी त्या दोघांसाठी ही मरेपर्यन्तची झुंज होती. पण भीमाने दुर्योधनाला अगदी सहज चित केलं. दुर्योधन यामुळे आतून पार खचून गेला. या लाजिरवाण्या पराभवामुळे त्याचा राग आणि द्वेष एवढा वाढला की तो यापुढे या रागावर ताबाही ठेऊ शकत नव्हता अन लपवू ही शकत नव्हता.
दुर्योधनने भीमाला जीवे मारण्याचा कट रचण्यास सुरवात केली. याचवेळी दुर्त्योधनाचा मामा शकुनी यांनी सल्लागार म्हणून कुरुंच्या राजवाड्यात काम सांभाळण्यास सुरुवात केली. भारतात शकुनी हे नाव छळ-कपट याचे समानार्थी आहे. शकुनी हा गांधारीचा भाऊ होता. गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्या लग्नानंतर भीष्मांना समजले की गांधारी तांत्रिकदृष्ट्या विधवा आहे आणि लोकांमध्ये याविषयी चर्चा होऊ लागली. लग्नाच्या तीन महिन्यांतच तिचा पहिला नवरा मरण पावेल असा तीला मिळालेला शाप टाळण्यासाठी तिचे लग्न आधी एका बकरीबरोबर लावण्यात आले होते. कुरु कुळाची अशी फसवणूक झाल्याने भीष्मांना इतका राग आला की त्यांनी गांधारीचे वडील आणि तिचे सर्व भाऊ यांना राजवाड्यात नजरकैदेत ठेवले. त्यांना मुद्दामून भरपूर पाहुणचाराची वागणूक दिली गेली. त्या काळातला धर्म-शिष्टाचार असा होता की वधूचे कुटुंबीय जेव्हा मुलीच्या सासरी पहिल्यांदा जातात, तेव्हा ते तोवर परत जाऊ शकत नाहीत जोवर त्यांचं आदरातिथ्य केलं जातंय.
शकुनी - फक्त बदला घेण्यासाठी जगताना
मग त्यांनी आपापसात असा निश्चय केला की एकाला सोडून बाकीच्या सर्वानी आमरण उपास करायचा. त्यांनी त्यांचे सर्व भोजन शकुनीला दिले, जो त्या सर्वांमध्ये सर्वात हुशार होता, जेणेकरून तो जिवंत राहू शकेल आणि या लोकांचा सूड घेईल. असे म्हणतात की त्याच्या भावांचा एक एकेक करून मृत्यू होत गेला, आणि त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या मृत भावांचे अवयव खाण्यास प्रोत्साहित केले, जेणेकरून तो ताकदवान बनू शकेल आणि त्यांचा सूड घेण्यास सक्षम होईल. जेव्हा त्याचे वडील मरतील तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्या जन्मभूमीवर अंतिम कर्म करावी लागतील अन या कारणांसाठी तो राजवाडा सोडू शकेल. म्हणून शकुनीने तिथे बसून आपल्या भावांचे मृतदेह फाडून आणि त्यांचे यकृत, मूत्रपिंड आणि हृदय कापून खाल्ले. एके दिवशी त्यांच्या मृत्यूशय्येवरून त्याच्या वडिलांनी त्याच्या शेजारी पडलेली चालण्याची काठी उचलली आणि शकुनीच्या घोट्याला इतक्या जोरात मारली कि त्याचा घोटा कायमचा फुटला. शकुनी वेदनेने किंचाळला आणि त्याने विचारले, "असं का केलंत ?" त्याचे वडील म्हणाले, “मी तुझा घोटा मोडला ज्यामुळे तू कायम लंगडा राहशील आणि तुझ्या भावाचे खाल्लेले अवयव तू विसरणार नाहीस. तुला पावला पावलावर जाणीव होत राहील कि तुझं जीवन हे केवळ सूड घेण्यासाठीच आहे. मग वडिलांच्या मृत्यूनंतर, कुरुवंश नष्ट करणे या एकाच हेतूने शकुनीने हस्तिनापूर सोडलं. तो कूरुंचा सल्लागार म्हणून परत आला आणि शकुनी हुशार आहे असे समजणार्या दुर्योधनाशी त्याची जवळीक झाली.
मरण्यापूर्वी वडिलांनी शकुनीला सांगितले होते की, “जेव्हा मी मरेन तेव्हा माझी बोटं कापून घे आणि त्यापासून द्यूताचे फासे तयार कर. हे फासे नेहमी तुला हवे तसेच पडतील आणि हे सुनिश्चित करण्यासाठी मी गूढविद्या वापरीन. या फास्यांमुळे तू द्युतात तुला कुणीच हरवू शकणार नाही, एक दिवस तुझ्या हे नक्कीच उपयोगाला येतील. तर मग शकुनीने त्याच्या वडिलांची बोटे कापली आणि त्यातून फासे बनवले. त्याच्याकडे योध्याचं शरीर नव्हतं पण या फास्यांच्या जोरावर त्याला जग जिंकू शेकण्याचा आत्मविश्वास होता.
शकुनी आणि दुर्योधन यांनी कट रचला
द्वेष आणि मत्सर यांनी आधीच भरलेल्या दुर्योधनला शकुनी भेटला आणि शकुनीने सतत प्रयत्नपूर्वक या द्वेषाचे पोषण केले. दुर्योधन स्वत: फार फसव्या स्वभावाचा नव्हता पण फार रागीट होता. तो बरेचदा त्याच्या मनातलं बोलून टाकायचा विशेषत: त्याच्या वडिलांसमोर.
जेव्हा शकुनीने हे पाहिले, तेव्हा तो त्याला म्हणाला, “दुर्योधना, देवाने माणसाला जीभ दिली आहे ती स्वत:ला अभिव्यक्त करण्यासाठी नव्हे, तर आपल्या मनातील गोष्टी लपविण्यासाठी.” शकुनीची मानसिकता ही अशी होती. शकुनीने दुर्योधनाच्या अंत:करणात सतत वीष ओतले आणि ते त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ते पसरले याची खात्री घेतली. मग त्याने दुर्योधनला सांगितले, “जर कुणी तुझा शत्रू असेल तर त्याचा चिंता घेणे, त्याला शिवीगाळ करणे किंवा त्याच्यावर थुंकणे यात काही अर्थ नाही - ते उलट त्याला ताकदवान बनवेल. फक्त एक मूर्ख माणूसच असं करू शकतो. ज्या क्षणी आपण एखाद्याला आपला शत्रू मानतो त्या क्षणाला त्याचा वध केला पाहिजे.” तेव्हा दुर्योधनने त्याला विचारले, “मी माझ्या चुलतभावाला राजवाड्यात कसे मारू?” मग शकुनीने विविध योजना सांगायला सुरुवात केली.
उर्वरित पुढील भागात...