महाभारत भाग १७: कर्ण - एक आजन्म दुर्दैवी माणूस
महाभारताच्या या भागात आपण कर्णाचा त्याच्या असाधारण जन्माची गोष्ट जाणून घेतो आणि पुढे आपण पाहतो की प्रतिष्ठेची तळमळ कशी त्याला मोठा कुशल योद्धा बनवते, पण दुर्देवाने तीच तळमळ त्याला दुहेरी शापाच्या सापळ्यात देखील अडकवते.
धृतराष्ट्राच्या राजवाड्यातील सारथी, अधिरथ, जो त्यादिवशी नदीकाठा जवळ होता, त्याने ही वाहत चाललेली रत्नजडित पेटी पाहिली; त्याने ती पकडली आणि उघडून पहिली. जेव्हा त्याने त्यातले लहान बाळ पाहिले तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्याला मुलंबाळ नव्हते आणि त्यामुळे त्याला ही पेटी देवाची देणगीच वाटली. त्याने बाळासह ती पेटी त्याची पत्नी राधाकडे नेली. दोघांनाही प्रचंड आनंद झाला. पेटीचे एकंदर स्वरूप पाहून त्यांना कळालं की हे बाळ सामान्य घरातील असूच शकत नाही, एखाद्या राणी किंवा राजानेच या बाळाला टाकून दिलेलं असावं. नक्की कोणी हे तर ते ओळखू शकत नव्हते पण त्यांच्या आयुष्यातली मूल-बाळाची कमी पूर्ण होत असलेली बघून त्यांना फार आनंद झाला.
त्या बाळाचं नाव कर्ण ठेवण्यात आलं, ते एक नियतीचं बाळ होतं आणि होतं देखील अतिशय विलक्षण! जन्मजातच त्याच्या दोन्ही कानात सोनेरी कुंडल आणि छातीवर एक प्रकारच नैसर्गिक कवच होतं. ते एक अभूतपूर्व असं सुंदर दिसणारं बाळ होतं. राधाने अगदी प्रेमाने त्याला लहानाचं मोठं केलं. सारथी असल्यामुळे अधिरथाला कर्णाला रथ कसा चालवायचा हे शिकवायचं होतं, पण कर्णाला मात्र मनापासून धनुर्धर व्हायचं होतं. त्या काळी युद्धकलेच आणि शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेण्याची परवानगी फक्त समाजातल्या लढाऊ वर्गाचे सदस्य असणार्या क्षत्रियांनाच होती. राजाच्या शक्तीचे रक्षण करण्याचा हा एक सोपा मार्ग होता. जर प्रत्येकजण शस्त्रं वापरायला शिकला तर त्यांच्या वापरावर कोणतेही नियंत्रण राहणार नाही. क्षत्रिय नसल्याने कर्णाला कोणत्याही शिक्षकांनी स्वीकारले नाही.
गुरु द्रोण यांचा नकार
परशुराम हे त्या काळाचे सर्वात प्रवीण योद्धा म्हणून प्रख्यात होते. ते द्रोणचे शिक्षकही होते. द्रोणाला आपली अस्त्रविद्या शिकवण्यापूवी परशुरामांनी अट घातली होती की या शक्तिशाली अस्त्रांबद्दल द्रोणाने कधीही क्षत्रियांना काहीही शिकवू नये. द्रोणाने त्यांना हे वचन तर दिले, पण तो तिथून थेट हस्तिनापुरला गेला आणि क्षत्रियांना ही शस्त्रे कशी वापरायची हे शिकवतो असे सांगून त्याने राजाकडे नोकरी मागितली. द्रोण हा असा होता - एक महत्वाकांक्षी, तत्ववादी पण बेईमान माणूस. त्याला सर्व धर्म, नीती, नियम आणि शास्त्र माहित होते, परंतु त्याच्यात कोणताही विधिनिषेध नव्हता. तो एक महान शिक्षक होताच, पण त्याबरोबर एक कुटील आणि लोभी माणूस सुद्धा होता.
द्रोण हस्तिनापुरात येण्यापूर्वी पांडव आणि कौरवा या दोघांना कृपाचार्यांनी युद्धकलेचे प्रशिक्षण दिले होते. एक दिवस, मुले चेंडू खेळत होती. त्या काळी, चेंडू काही रबर, चामडं किंवा प्लास्टिकपासून बनविलेले नसायचे - ते सहसा घट्ट गुंडाळलेल्या वेलींपासून बनवले जायचे. असाच खेळता-खेळता चेंडू चुकून विहिरीत पडला. मुलांना चेंडू विहिरीत तरंगताना तर दिसत होता पण तो काढायचा कसा याचा कोणालाही अंदाज येत नव्हता, कारण एकतर आधीच विहीर खोल होती आणि पायऱ्याही नव्हत्या.
अशावेळी द्रोण तिथे आले आणि त्यांनी एकूण प्रकाराकडे पाहून विचारलं, “तुम्ही क्षत्रियच आहात ना?” मुलं म्हणाली, "हो, आम्ही क्षत्रियच आहोत." “मग तुमच्यापैकी कोणालाही तिरंदाजी माहित नाही?” अर्जुन लगेच म्हणाला, “हो मला येते आणि मला जगातील सर्वात मोठा धनुर्धर बनायचं आहे.” द्रोण त्याच्याकडे पाहून म्हणाले, "जर तू धनुर्धर असशील तर हा चेंडू का काढू शकत नाही?" त्यांनी विचारले, “धनुष्य बाणाने विहिरीतून चेंडू कसा बाहेर काढायचा?” अर्जुनाने विचारलं. द्रोण म्हणाले, “चला, मी तुम्हाला दाखवतो."
मग द्रोणांनी एक गवताचं टोकदार पातं घेतलं आणि बाणासारख त्या चेंडूला मारल. ते पातं चेंडुमध्ये खुपसून बसलं. मग त्यांनी एकामागोमाग एक असे भरपूर गवताचे बाण सोडले जेणेकरून एक प्रकारची लांब दोरखंड तयार झाला आणि मग त्यांनी तो चेंडू विहिरीतून बाहेर खेचून काढला. मुले त्यांच्या या कौशल्याकडे पाहून आश्चर्यचकित झाली - हे अगदी जादूसारखे होते. त्यांनी द्रोणांना ही कला शिकवण्याची विनंती केली.
द्रोण म्हणाले की, जोपर्यंत ते त्यांना आपला गुरू मानत नाहीत तोपर्यंत ते शिकवू शकणार नाहीत. मुले त्यांना ताबडतोप भीष्माकडे घेऊन गेली. भीष्मांनी लगेच द्रोणाला ओळखले - तो कोण होता हे त्यांना चांगले माहित होते आणि त्यांना त्याच्या कौशल्याचे कौतुकही होते. त्यांनी त्याला राजगुरु म्हणून नियुक्त केले आणि अशाप्रकारे द्रोण भावी राजांचे शिक्षक झाले.
द्रोणाचार्यांच्या देखरेखीखाली जसे प्रशिक्षण सुरू झाल्याबरोबरच पांडव आणि कौरव यांच्यातली जीवघेणी स्पर्धा पण सुरु झाली. काही वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ते सर्व कुशल योद्धे बनले. युधिष्टिर हा भाला चालवण्यात पटाईत झाला. भीम आणि दुर्योधन गदा वापरण्यात तोडीस तोड होते. हे दोघं भरपूर वेळ प्रयत्न करून सुद्धा एकमेकांना ना हरवता गदायुद्ध करू शकायचे. धनुर्विद्येचं बोलायचं झालं तर त्यात अर्जुन हा विलक्षण प्रवीण धनुर्धर होता. तलवारबाजी आणि घोडेस्वारीमध्ये नकुल आणि सहदेव वरचढ होते.
सूतपुत्राची लबाडी
मोठा धनुर्धारी होण्याच्या इच्छेने कर्ण द्रोणांकडे गेला, पण त्यांनी त्याला नाकारलं आणि त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं, ज्याचा शब्दशः अर्थ “सारथ्याचा मुलगा” असा होता आणि असे सूचित केले की तो खालच्या जातीचा आहे. हा अपमान कर्णाच्या मनाला फार लागला. सतत होणारा भेदभाव आणि अपमानामुळे एक अत्यंत प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचा कर्ण एक नीच माणूस बनत चालला होता. जेव्हाही कुणी त्याला सूतपुत्र म्हणून हाक मारी तेव्हा त्याच्या मनात हा सल अजून वाढे आणि त्याचबरोबर त्याचा नीचपणा पण वाढत होता जो खरतर त्याच्या स्वभावा विरुद्ध होता. द्रोणाने त्याला क्षत्रिय नसल्यामुळे नाकारलं म्हणून मग कर्णाने परशुरामांकडे जाण्याचा निर्णय घेतला जे युद्धकलेचे एक महान शिक्षक होते.
त्या काळात युद्धकला म्हणजे फक्त हाताने युद्ध करणे नव्हते तर सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्र प्रशिक्षणांचा त्यात समावेश होता, आणि त्यामध्ये विशेष करून धनुर्विद्येवर भर होता. परशुराम केवळ ब्राह्मणांना शिष्य म्हणून स्वीकारतील हे कर्णाला माहित होतं. शिकण्याच्या उत्साहात त्याने बनावट जानवं घातलं आणी परशुरामांकडे जाऊन ब्राह्मण असल्याचं भासवलं. परशुरामांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं आणि त्यांना माहित असलेलं सर्व काही शिकवलं. कर्णाने अत्यंत वेगाने सर्व काही शिकून घेतलं. परशुरामांच्या इतर कोणत्याही शिष्यामध्ये अशा प्रकारचे नैसर्गिक कौशल्य आणि क्षमता नव्हती. त्यामुळे परशुराम त्याच्यावर खूप प्रसन्न झाले.
हे सर्व होत असताना परशुराम आधीच वयस्कर झाले होते. एके दिवशी जेव्हा ते जंगलात प्रशिक्षण असतांना त्यांना खूप थकल्यासारखं झालं आणि थोडा अशक्तपणा जाणवायला लागला. कर्णाला त्यांनी सांगितलं कि त्यांना थोडावेळ आडवं पडावसं वाटतंय. कर्ण खाली बसला जेणेकरून परशुराम कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू शकतील. मग परशुरामांना झोप लागली. तेव्हढ्यात कर्णाच्या मांडीवर रक्त पिणारा एक किडा चढला आणि त्याच्या मांडी पोखरू लागला. त्याला असह्य वेदना होत होत्या अन भरपूर रक्तस्त्रावही होत होता, परंतु थोड्याश्या हालचालीने देखील आपल्या गुरूंची झोप मोडेल म्हणून तो कीडा बाजूला करण्यासाठीसुद्धा तो यत्किंचितही हलला नाही. हळू हळू ते रक्त परशुरामच्या कानापर्यंत पोचलं आणि त्याने परशुरामांना जाग आली. त्यांनी आपले डोळे उघडले आणि पाहिलं की ते रक्ताने माखले होते. त्यांनी विचारलं कि हे कुणाचं रक्त आहे. तेव्हा कर्ण म्हणाला हे माझं रक्त आहे.
मग कर्णाच्या मांडीवर असलेल्या उघड्या जखमेकडे परशुरामांचं लक्ष गेलं. रक्त पिणारा किडा स्नायूच्या आत खोलवर अजूनही चावत होता, आणि तरीही कर्ण निश्चलपणे बसून होता. परशुरामांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “तू ब्राह्मण असूच शकत नाहीस - तू ब्राह्मण असतास तर तू कधीच किंचाळला असतास. अशा प्रकारच्या वेदना किंचितही हालचाल नं करता सहन करण्याची शक्ति तुझ्यामध्ये आहे म्हणजे नक्कीच तू क्षत्रिय असला पाहिजेस. ” कर्ण म्हणाला, “हे खरं आहे, मी ब्राह्मण नाही. कृपा करून माझ्यावर रागावू नका. ” परशुराम अत्यंत चिडले आणि रागाच्या भरात म्हणाले, “अरे मुर्खा, तुला काय वाटलं की आपण इथे येऊ, खोटं जानवं घालू आणि मला फसवून या सर्व गोष्टी माझ्यापासून शिकून निघून जाऊ? थांब तुला शापच देतो. ” कर्णाने खूप विनवण्या केल्या कि “मी ब्राह्मण नाही, पण मी क्षत्रियही नाही. मी एक सूतपुत्र आहे, म्हणजे मी फक्त अर्ध खोटं बोललो."
गौरवाची लालसा
परशुरामांनी त्याचं काही एक ऐकलं नाही. त्यांनी कर्णाला वेदना सहन करताना पाहताक्षणीच अगदी योग्य अनुमान लावलं की कर्ण एक क्षत्रिय आहे आणि ते पुढं म्हणाले, “तू मला फसवलंयस. मी तुला शिकवलेल्या विद्येचा तुला आनंद तर घेता येईल, पण जेव्हा ती अस्त्र खरोखर महत्वाची असतील, तेव्हा तुला आवश्यक असलेल्या मंत्रांचा विसर पडेल आणि त्यातच तुझा शेवट होईल. ” कर्ण त्यांच्या पाया पडून विनवणी करु लागला कि, “कृपया असं करू नका. मी क्षत्रिय नाही आणि तुम्हाला फसवण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. मला फक्त ज्ञान हवे होते आणि इतर कोणीही मला शिकवायला तयार नव्हतं. तुम्ही एकटेच असे गुरु होता जे गैर-क्षत्रियांना शिकण्याची परवानगी देतील.”
परशुरामांचा राग थोडा थंड झाला आणि ते म्हणाले, “पण तरीही तू खोटं बोललास. तू मला परिस्थिती समजावून सांगायला हवी होती. तू माझ्याशी चर्चा करायला हवी होतीस. पण तू माझ्याशी खोटं बोलायला नको होतं. मी एकदा दिलेला शाप परत तर घेऊ शकत नाही, पण मला लक्षात आलंय की तुला धनुर्विद्या शिकण्याची, राज्य मिळवण्याची किंवा सत्ता गाजवण्याची लालसा नाहीये - तुझी केवळ गौरवाची लालसा आहे आणि ती तुला मिळेल. लोक तुला नेहमीच एक गौरवशाली योद्धा म्हणून ओळखतील, परंतु तुझ्याकडे ना सामर्थ्य असेल ना राज्य, ना तुला महान धनुर्धारी म्हणून ओळखलं जाईल. पण तुझा गौरव सदैव जिवंत राहील आणि हीच तुझ्या मनात इच्छा आहे.”
त्यानंतर शापित कर्ण भटकत राहिला. त्याला हे प्रशिक्षण मिळाल्याचा आनंद तर झाला होता, पण ते कुठे व्यक्त करता येत नव्हता. त्याकाळी फक्त क्षत्रियांनाच युद्ध किंवा स्पर्धेत प्रवेश करण्याची परवानगी होती. डोळे झाकून लक्ष्यवेध करण्याचं कौशल्य कर्णाकडे होतं, पण तो त्याचं हे कौशल्य कुणाला दाखवू शकत नव्हता. त्याला ज्या गौरवाची आस लागून होती तो गौरव काही त्याला मिळत नव्हता. असा हताश कर्ण आग्नेय दिशेला गेला आणि सध्या ओडिसामधील कोणार्क जवळच्या अशा एका ठिकाणी बसला जिथे सूर्याची कृपा सर्वात प्रभावीपणे प्राप्त होऊ शकते.
दुहेरी शाप
त्याने उग्र तपस्या करण्यास सुरवात केली आणि तो दिवसेंदिवस ध्यानात घालवू लागला. तिथे त्याला खायलाप्यायला सुद्धा काही मिळत नव्हते तरी त्याने ध्यान करणे थांबविले नाही. जेव्हा त्याला खूप भूक लागली, तेव्हा त्याने काही खेकडे पकडून खाल्ले, ज्याने त्याला पोषण तर मिळाले पण आता त्याची भूक अजूनच वाढली. काही आठवड्यांच्या साधनेनंतर त्याची भूक त्याच्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी बनली होती. या अवस्थेत, त्याला झुडुपामध्ये एक प्राणी फिरताना दिसला. त्याला वाटलं की हे हरिण असेल, त्यानी धनुष्य आणि बाण घेतला, विचार नं करता त्याने बाण मारला आणि बाणाने लक्षभेद केलाच. तो मनात भूक भागल्याचे मनोरे रचत प्राण्यापाशी गेला अन पाहतो तर काय, तिथे हरीण नसून एक गाय मरून पडली होती.
गायीला मारणे हे आर्यांसाठी सर्वात वाईट कर्म मानले जात असे. त्याने घाबरुन गायीकडे पाहिले, आणि त्या गायीने डोळे कायमचे बंद करण्याआधी एकदा करूण नजरेने कर्णाकडे पहिले. तो मनातून विचलित झाला - काय करावे हेचं त्याला समजेना. तेवढ्यात तिथे एक ब्राह्मण आला, त्याने त्या मृत गायींकडे पहिले अन धाय मोकलून रडू लागला. तो म्हणाला, “तू माझी गाय मारलीस! तुला माझा शाप आहे. तू योद्धा दिसतोस, म्हणून मी तुला शाप देतो की जेव्हा तू युद्ध करत असशील आणि जेव्हा सर्वात महत्वाचा क्षण येईल तेव्हा तुझा रथाचं चाक जमिनीत इतकं खोलवर अडकून बसेल कि ते तुला काढता येणार नाही आणि जेव्हा तू असा असहाय असशील तेव्हाच तुझा मृत्यू ओढवेल जसं तू माझ्या असहाय गायीला मारलस.”
कर्ण त्याच्या पाया पडून विनवणी करु लागला, “कृपा करा - मला खूप भूक लागली होती. मला माहित नव्हते की ती गाय आहे. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला त्याऐवजी शंभर गायी देईन.” त्यावर ब्राह्मण म्हणाला, ‘ही गाय माझ्यासाठी केवळ जनावर नव्हती. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ती माझ्यासाठी प्रिय होती. हे असं परतफेडीचं बोलल्यामुळे मी तुला आणखी शाप देईन."
पुढे चालू