मकर संक्रांत: वसंत ऋतुचा लाभ घेऊया!
आपण मकर संक्रांतीला पतंग का उडवतो याचा विचार तरी कधी केला होता का? सद्गुरु आपल्याला मकर संक्रांतीचे महत्व सांगत आहेत.
सद्गुरु: मकर संक्रांत हा भारतात एक अतिशय प्रमुख उत्सव म्हणून साजरा केला जातो. संक्रांत या शब्दाचा अर्थ आहे “हालचाल किंवा गतीशीलता.” आपण आयुष्य म्हणून ओळखत असलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे हालचाल आहे. सुदैवाने, आपल्या अगोदर आलेली लोकं पुढे निघून गेली, आणि आपल्यानंतर येणारी लोकं आपण पुढे निघून जाण्याची वाट पहात आहेत – याविषयी कोणतीही शंका बाळगू नका. हा ग्रह फिरत आहेत आणि म्हणूनच जीवसृष्टी निर्माण होते आहे. तो जर एका जागी स्थिर असता, तर तो जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी समर्थ ठरला नसता. त्यामुळे गतीशीलता ही अशी एक गोष्ट आहे ज्यात प्रत्येक प्राणिमात्र सहभागी आहे, पण कोणतीही हालचाल होण्यासाठी या हालचालीला एक शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त करून देणे आवश्यक आहे– ही हालचाल केवळ निश्चलतेच्या कुशीतच होऊ शकते. जी व्यक्ती तिच्या आयुष्याच्या निश्चलतेला स्पर्श करत नाही, जो स्वतःच्या अस्तित्वाच्या स्तब्धतेला स्पर्श करत नाही, ज्याला स्तब्धता माहिती नाही किंवा ज्याने आंतरिक किंवा बाह्य मौन अनुभवलेलं नाही, तो या गतीशिलतेत नक्कीच कायमचा हरवून जाईल.
हालचाल ही एका मर्यादेपर्यंतच आनंददायक ठरते. ही पृथ्वी इतक्या सुंदरपणे अतिशय हळुवारपणे फिरते आहे – ती फक्त ऋतु बदलत आहे. उद्या, समजा तिने वेग वाढवला, थोडी गती वाढवली, तर आपली तथाकथित संतुलित मने असंतुलित होऊन जातील, सारे काही नियंत्रणा बाहेर जाईल. म्हणून गतीशीलता ही एका मर्यादेपर्यंतच आनंददायक असते. एकदा तिने ती मर्यादा ओलांडली, की ही हालचाल म्हणजे छळ होतो.
मकर संक्रांतीचे महत्त्व
मकर संक्रांती उत्सवाचे महत्व हे आहे की या दिवशी राशींमधे महत्वाच्या हालचाली घडून येतात – पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्या भ्रमणाची व्यवस्था – आणि ही हालचाल आपण या पृथ्वीचा जो अनुभव घेतो त्यातच बदल घडवून आणते. संपूर्ण वर्षभरात अनेक संक्रांती असतात; त्यातील महत्वाच्या दोन संक्रांती म्हणजे मकर संक्रांत, आणि अगदी त्याच्या विरुद्ध उन्हाळ्यानंतर येणारी कर्क संक्रांत. या दोन्हींच्या मध्ये अनेक संक्राती येतात – प्रत्येक वेळी जेंव्हा राशीचे चिन्ह बदलते, तेंव्हा त्याला संक्रांत असे म्हणतात जी पृथ्वीची हालचाल सूचित करते, आणि या हालचालीमुळेच आपल्या जीवनाचे अस्तित्व टिकून आहे आणि त्याचे पोषण होत आहे हे समजावून घेणे अवश्यक आहे. जर ही हालचाल थांबली, तर आपल्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट थांबेल. 22 डिसेंबरला, संक्रांत झाली, याचा अर्थ सूर्याच्या संदर्भात, सूर्याभोवती पृथ्वीचे भ्रमण होत असताना पृथ्वीचा आस सर्वोच्च पातळीवर झुकलेला असतो. आणि या दिवसापासून पुढे, उत्तर दिशेची हालचाल जोरदार बनते. पृथ्वीवर खरोखरच अनेक गोष्टी बदलू लागतात. मकर संक्रांतीपासून पुढे, टप्प्याटप्प्याने हिवाळा कमी होण्यास सुरुवात होते.
या हालचालीमुळे आपण या पृथ्वीपासून काय फायदे करून घेतो यासाठी देखील यातला एक महत्वाचा पैलू आहे. एक काळ असा होता जेंव्हा पृथ्वी जे अन्न देऊ करेल तेच मनुष्यप्राणी खाऊ शकत होता. त्यानंतर आपण आपल्याला पाहिजे ते पृथ्वीपासून मिळवण्यास शिकलो; यालाच शेती असे म्हणतात. आपण जेंव्हा शिकार करत होतो आणि अन्न गोळा करत होतो, तेंव्हा जे असेल तेवढेच आपण गोळा करत होतो. हे म्हणजे तुम्ही जेंव्हा तान्हे बाळ होतात, तेंव्हा तुमची आई तुम्हाला जे देत होती तेवढेच तुम्ही खात होतात त्याप्रमाणे आहे. तुम्ही जेंव्हा मुल झालात, तेंव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते मागू लागलात. मग आपण थोडे मोठे झालो आणि आपल्याला काय हवे ते मागू लागलो आणि ते मिळवायला लागलो, पण तरीही तुम्हाला हवे ते तुम्ही पृथ्वीच्या इच्छेनुसार एका मर्यादेपर्यंतच मिळवू शकता. तुम्ही जर त्यापलीकडे ताणून धरले, तर ते तुम्हाला केवळ तेच मिळणार नाही असे नाही, तर तुम्हाला दुसरेच काहीतरी मिळेल; हेच औद्योगीकरण. तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी शेती पृथ्वीकडे प्रेमाने मागते. औद्योगिकारण पृथ्वीला ओरबाडून काढत आहे. मी कोणत्या गोष्टीविरुद्ध बोलत नाहीये. आपले मन कसे बदलत चालले आहे, मानवी कृत्ये एका पातळीवरून दुसर्या पातळीवर कशा प्रकारे पुढे सरकत आहेत हे तुम्ही समजावून घ्यावे असे मला वाटते.
तर या दिवशी आपण आपल्याला अशी आठवण करून देतो की आपण जे कोणी आहोत ते आपण या पृथ्वीपासूनच मिळवतो आहोत. मी जगात सर्वत्र पहातो आहे, की लोकं देण्याविषयी बोलू लागली आहेत. ते कुठून देतात ते मला माहिती नाही. तुम्ही फक्त घेऊ शकता – तुम्ही एखादी गोष्ट हळुवारपणे घेऊ शकता किंवा हिसकावुन घेऊ शकता. तुम्ही स्वतःची मालमत्ता कुठून घेऊन आला होतात का? देण्यासारखे काय आहे? तुम्ही फक्त घेऊ शकता. प्रत्येक गोष्ट देऊ केली जाते. ती तारतम्याने घ्या, येवढेच.
कापणीचा उत्सव
मकर संक्रांतीचा उत्सव हा कापणीचा उत्सव म्हणूनसुद्धा ओळखला जातो कारण या कालावधीत पिकांची कापणी पूर्ण झालेली असते आणि तेथे मोठे उत्सव साजरे केले जातात. या दिवशी आपली कापणी करण्यात ज्यांनी मदत केली त्यां सर्वांचे आपण आभार मानतो. कापणीमध्ये शेतीतील जनावरे महत्वाची भूमिका पार पाडतात, त्यामुळे दूसरा दिवस त्यांच्यासाठी असतो आणि त्याला माटू पोंगल असे म्हणतात. पहिला दिवस पृथ्वीसाठी असतो, दूसरा आपल्यासाठी असतो आणि तिसरा दिवस प्राणी आणि गुरंढोरं यांच्यासाठी असतो. असे लक्षात घ्या, की त्यांना आपल्यापेक्षा थोड्या उच्च स्तरावर ठेवले आहे कारण त्यांच्यामुळे आपण अस्तित्वात आहोत, ते आपल्यामुळे अस्तित्वात नाहीत. आपण इथे नसतो, तर ते सर्वजण मुक्त आणि आनंदी असते. पण जर ते इथे नसते, तर आपण जगू शकलो नसतो.
हे उत्सव म्हणजे आपण आपले वर्तमान आणि आपले भविष्य जाणीवपूर्वक तयार करायची आवश्यकता आहे याची आठवण करून देण्याचे एक साधन आहे. आज आपण गेल्या वर्षीच्या पिकाची कापणी केली आहे. पुढील वर्षाचे पिक कसे तयार करायचे याची योजना प्राण्यांनादेखील या प्रक्रियेत जाणीवपूर्वक समाविष्ट करून आखली जाते. दुर्गम खेड्यात हे कसे घडते हे तुम्ही पाहायला पाहिजे. आता अगदी कमी दुर्गम खेडी उरली आहेत कारण गेल्या काही वर्षात, प्रत्येकाकडे मोबाइल फोन आणि अगदी इंटरनेटसुद्धा आहे. पण भारतातील दुर्गम भागात असलेल्या खेड्यात, भविष्यातील पिकांची योजना कशी आखली जाते ते तुम्ही पहायलाच हवे. ते एक अतिशय आश्चर्यकारक आणि विलक्षण आहे. मला याचा भाग होण्याचे भाग्य लाभले आहे आणि या बैठका अशा पद्धतीने घेतल्या जातात की त्यांची जनावरेसुद्धा तिथे उपस्थित असतात. असे नाही की कोणीतरी त्यांनी काय करायचे आहे हे त्यांना सांगते, पण तरीसुद्धा ही जनावरे त्या बैठकीचा एक अविभाज्य भाग असतात. गावातील प्राणी कसे आहेत, त्यांचे वय काय आहे, ते किती बळकट आहेत, ते एखादी गोष्ट करू शकतील की नाही, याचे मूल्यांकन ते ज्या प्रकारे करतात ते पहाणे ही अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध प्रक्रिया आहे.
वैश्विक संबंध
तर मकर संक्राती हा कापणीचा उत्सव आहे. पण यात आकाशीय आणि आध्यात्मिक अर्थही आहेत. सामान्य लोकांनी त्यांना योग्य वाटले त्यानुसार अंगिकारलेल्या काही योगिक साधनांमधून याचा उगम झाला आहे. योगींसाठी हा काळ त्यांच्या आध्यात्मिक प्रक्रियेत नवीन प्रयत्न करून पहाण्यासाठी सर्वात महत्वाचा काळ आहे. त्यानुसार, ज्यांना कुटुंब आहे असे लोकही ते त्यांच्या आयुष्यात जे काही करत असतात त्यात एक नवीन प्रयत्न करून पहातात.
पृथ्वीच्या स्थीतीत प्रत्येक क्षणी, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवशी हळूहळूपणे होणार्या बदलांचा वापर करून घेण्यासाठी योग प्रणालीचे अनेक पैलू आकाशीय प्रणाली आणि मानवी प्रणाली यांच्यातील असलेल्या संबंधावर तयार झाले आणि विकसित होत गेले आहेत.
उदाहरणार्थ, 108 हा आकडा मानवी प्रणालीच्या आणि सौर प्रणालीच्या निर्मितीत अनेक मार्गांनी महत्वपूर्ण आहे. पारंपरिकरित्या, तुम्ही जर माळ परिधान करत असाल, तर त्यात 108 मणी असतात. तुम्ही जर एखाद्या मंत्राचा जप करत असाल किंवा एखाद्या ऊर्जा स्थानावर जात असाल, तर तो 108 वेळा करतात. याचे कारण हे आहे की एखाद्या व्यक्तीला जर मानवी यंत्रणेवर संपूर्ण प्रभुत्व प्राप्त करायचे असेल तर त्याने 108 गोष्टी करणे अवश्यक आहे. मानवी शरीरात 114 चक्रे किंवा बिंदू आहेत जिथे नाडी किंवा ऊर्जा वाहिन्या शरीरात एकत्र मिळतात. या 114 चक्रांपैकी, 2 चक्रे शारीरिक चौकटीच्या बाहेर आहेत. शारीरिक चौकटीत असलेल्या 112 चक्रांपैकी 108 चक्रांवर प्रत्यक्ष काम केले जाणे गरजेचे आहे. तुम्ही जर ही 108 चक्रे कार्यान्वित करू शकलात, तर उर्वरित 4 चक्रे आपोपाप उघडतील.
आपण ज्या ग्रहावर राहतो, त्या ग्रहाच्या प्रणालीतसुद्धा हे अतिशय सुंदर प्रकारे प्रकट झालेले दिसून येते. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या 108पट मोठा आहे. सूर्य आणि पृथ्वी दरम्यानचे अंतर सूर्याच्या व्यासाच्या 108पट येवढे आहे. चंद्र आणि पृथ्वीदरम्यानचे अंतर चंद्राच्या व्यासाच्या 108पट आहे. आणि एका चंद्रवर्षात 108 पद (पावले) आहेत. पृथ्वी ग्रह तिच्या कक्षेत सूर्याभोवती परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी 13 ½ चंद्र भ्रमणे किंवा एक सौर वर्ष घेते. या कक्षेत ती 27 नक्षत्रे किंवा 108 पदांमधून संक्रमण करते, अगदी माळेतील मण्यांप्रमाणे. मकर संक्रांतीच्या दिवशी आधीच्या चक्राचा अंत होतो आणि नवीन चक्राची सुरुवात होते.
मकर संक्रांत – हालचालींचा उत्सव
म्हणून मकर संक्रांत हा हालचालींची नोंद घेण्याचा, हालचाली म्हणजेच उत्सव, हालचाली म्हणजेच जीवन, हालचाली म्हणजेच जीवनाची प्रक्रिया आणि जीवनाची सुरुवात आणि शेवट हे ओळखण्याचा उत्सव आहे. त्याच वेळी, ‘शंकर’ हा शब्द आपल्याला याची आठवण करून देण्यासाठी वापरला जातो की या सर्वाच्या पाठीमागे असलेला शिव, म्हणजे स्थिर; हाच या हालचालींचा आधार आहे. जरी इतर सर्व ग्रह हालचाल करत असले, तरीही सर्वात महत्वाचा असणारा हालचाल करत नाही. जर सूर्यानेही हालचाल करायला सुरुवात केली, तर आपण संकटात येऊ. तो तिथेच स्थिर उभा आहे. आणि म्हणूनच इतर सर्वांच्या हालचाली योग्य आहेत. पण त्याची स्थिरता सापेक्ष आहे कारण कदाचित संपूर्ण सौर प्रणाली हालचाल करत असेल. त्यामुळे त्याच्या पलीकडे, हे सर्व पकडून ठेवणारे अवकाश म्हणजे निरंतर निश्चलता आहे.
जेंव्हा मनुष्य आपल्यातील निश्चलतेला स्पर्श करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करतो, तेंव्हाच त्याला हालचालींमधला आनंद समजतो. अन्यथा लोकं जीवनातील हालचालींमुळे चकित झालेले दिसून येतात. त्यांच्या आयुष्यात होणार्या प्रत्येक बदलामुळे त्यांना यातना भोगाव्या लागतात. हल्ली तथाकथित आधुनिक जीवन असे झाले आहे – कोणताही बदल म्हणजे तुम्हाला यातना सहन करायलाच लागतात. बालपण तणावग्रस्त आहे, तारुण्य हे एक मोठे दुखः आहे, प्रौढत्व असह्य आहे, वृद्धावस्था म्हणजे तिरस्कार आणि भय आहे आणि मृत्यू म्हणजे उत्सव आहे– नाही ते शुद्ध भय आहे. आयुष्यातला प्रत्येक टप्पा म्हणजे एक समस्या आहे कारण लोकांना हालचाली म्हणजेच एक समस्या वाटते, पण त्यांना हे समजत नाही की हालचाली हेच आयुष्याचे मूळ स्वरूप आहे. तुमचा एक पाय स्थिर असेल, तरच तुम्ही हालचालींचा उत्सव साजरा करू शकता. स्थैर्य काय आहे याची जर तुम्हाला कल्पना असेल तर हालचाली म्हणजे आनंद असेल. तुम्हाला जर स्थिरता म्हणजे काय हे माहिती नसेल, तुमचा जर स्थिरतेशी काही संपर्क नसेल तर हालचाली भयचकीत करून सोडतात.
लोकं हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात. तार्यांकडे पाहून, त्यांच्या हातावरच्या रेषांकडे पाहून आणि अगदी चहाच्या पानांसकट इतर सर्व प्रकारच्या हालचालींकडे पाहून. लोकांना कसेही करून त्यांच्या जीवनांच्या हालचालींचा अंदाज घ्यायचा असतो. हालचालींसोबतचा हा संघर्ष, हालचालींविषयीची ही भीती निश्चलतेची जाणीव नसल्याने घडत असते. तुम्हाला जर निश्चलतेची कल्पना असेल, तर ही हालचाल तुम्हाला विचलित करणार नाही. ही एक अशी गोष्ट आहे जी एक विशिष्ट ताल निश्चित करते. प्रत्येक तालाला एक सुरुवात आणि एक शेवट आहे; प्रत्येक हालचालीला एक सुरुवात आणि एक शेवट आहे. हालचाल म्हणजे जी संक्रमणात आहे ती. निश्चलता म्हणजे जी कायम आहे ती. हालचाल म्हणजे अनिवार्यता, निश्चलता म्हणजे चैतन्य.
मकर संक्रांतीचे महत्व हे आहे की निश्चलतेची चव चाखल्याखेरीज हालचालींचा उत्सव साजरा करणे शक्य नाही याची आठवण आपल्याला करून देण्याचा हा काळ आहे.