या नवरात्रीत १७ ऑक्टोबर, २२ ऑक्टोबर आणि २४ ऑक्टोबर २०२० रोजी, आम्ही लिंग भैरवी फेसबुक आणि लिंग भैरवी यु-ट्यूब चॅनलवर नवरात्री पूजेचं सायं: 5:40 वाजता थेट प्रक्षेपण करणार आहोत. ह्या दैवी उत्सवात अवश्य सहभागी व्हा आणि देवी अनुभवा!

सद्गुरू: प्राचीन काळापासूनच या ग्रहावर स्त्रीतत्वाची पूजा केली जाते. केवळ भारतातच नाही तर युरोप, अरेबिया आणि आफ्रिकेच्या बहुतांश भागात सुद्धा केलं जायचं पण दुर्दैवाने, पश्चिमेत, तथाकथित अनेकेश्वरवाद आणि मूर्तिपूजेचा नायनाट करण्यासाठी देवी मंदिरे नष्ट करण्यात आली. जगाच्या इतर भागातही तेच घडले.

पण भारत ही एक अशी संस्कृती आहे, ज्यामध्ये स्त्रीतत्वाची आराधना अजूनही टिकून राहिली आहे. आणि ही अशी संस्कृती आहे, जी आपल्याला आपल्या गरजेनुसार देवी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य देते. प्राणप्रतिष्ठेच्या विज्ञानाने प्रत्येक गावाला त्यांच्या स्थानिक गरजांनुसार स्वतःचं ग्रामदेवी मंदिर बनवण्यासाठी सक्षम केले. दक्षिण भारताच्या प्रत्येक खेड्यात आजही तुम्हाला अम्मन किंवा देवीचे मंदिर मिळेल.

स्त्रीतत्व नाहीसं होण्याची शोकांतिका

आपण आपल्या जीवनात जगण्याच्या धडपडीला सर्वाधिक महत्व दिल्यामुळेच आज समाजात पुरुषतत्वाला महत्व आलं आहे. सौंदर्यशास्त्र, किंवा नृत्य, किंवा संगीत, किंवा प्रेम, किंवा देवत्व किंवा ध्यान याऐवजी अर्थशास्त्रालाच चालना मिळाली आहे. जेव्हा अर्थशास्त्र राज्य करतं, जेव्हा जीवनातील सूक्ष्म, मृदू आणि कोमल बाबींकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा निसर्गतःच पुरुषतत्वाचे वर्चस्व असते. अशा जगात स्त्रीत्वाचा पराभव अपरिहार्य आहे. त्याहूनही मोठी शोकांतिका म्हणजे बर्याच स्त्रियांना वाटते की त्यांनी पुरुषांसारखेच बनले पाहिजे, कारण त्यांचा असा समज आहे की पुरुषत्व म्हणजे सामर्थ्य. जर स्त्रीत्व गमावले तर जे काही सुंदर आहे, कोमल आहे, जे काही स्पर्धात्मक नाही आणि जीवनातील पोषण करणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होईल. जीवनाची ज्वाला कायमचीच नष्ट होईल. हे भयंकर नुकसान आहे ते पूर्ववत करणे अवघड आहे.

आधुनिक शिक्षणाचा एक दुर्दैवी परिणाम म्हणजे आपल्याला अशी कोणतीही गोष्ट नष्ट करायची आहे जी आपल्या तर्कशक्ती किंवा बुद्धीला योग्य वाटत नाही. आपण प्रचंड पुरुषप्रधान झालो आहोत, म्हणून या देशातही मोठ्या प्रमाणात देवीची उपासना गुप्तपणे केली जाते. बहुतेक देवीच्या मंदिरांमध्ये, लोकांच्या एका छोट्या गटाद्वारेच मुख्य पूजा केली जाते. परंतु त्याचे मूळ खूप खोलवर रुजलेले असल्यामुळे ते पूर्णपणे मिटवता येणार नाही.

नवरात्रोत्सव

भारतातला नवरात्रीचा उत्सव दैवी स्त्रीतत्वाला समर्पित आहे. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती हे स्त्रीत्वाचे तीन आयाम आहेत. ते अनुक्रमे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र किंवा तमस (जडत्व), रजस (क्रियाशीलता, आवेश) आणि सत्त्व (भौतिकतेच्या पलीकडे जाणे, परमोच्च ज्ञान, शुद्धता) यांचे प्रतीक आहेत. जे लोक शक्ती किंवा सामर्थ्याची आस धरतात, ते स्त्रीत्वाच्या पृथ्वी किंवा दुर्गा किंवा कालीसारख्या रूपांची पूजा करतात. जे लोक संपत्ती, तीव्र इच्छा किंवा भौतिक गोष्टी मिळवण्याची आस धरतात ते लक्ष्मी किंवा सूर्याची पूजा करतात. जे ज्ञान प्राप्त करण्याची, विलीन होण्याची किंवा नश्वर देहाची मर्यादा ओलांडण्याची आस धरतात ते सरस्वती किंवा चंद्राची पूजा करतात.

जीवन एक रहस्य आहे, आणि ते नेहमीच एक रहस्य राहील. नवरात्रीचा उत्सव याच मूलभूत बोधावर आधारित आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांचं या मूलभूत गुणांनुसार वर्गीकरणं केलं जातं. पहिले तीन दिवस दुर्गाला, पुढचे तीन लक्ष्मीला आणि शेवटचे तीन दिवस सरस्वतीला समर्पित असतात. दहावा दिवस, विजयादशमी, जीवनाच्या या तिन्ही पैलूंवर विजय दर्शवतो.

हे केवळ प्रतीकात्मक नाहीये तर उर्जेच्या पातळीवर देखील सत्य आहे. माणूस म्हणून आपण पृथ्वीतून अवतरतो आणि सक्रिय असतो. काही काळाने, आपण पुन्हा एकदा पृथ्वीच्या जडत्वात जातो. हे केवळ आपण व्यक्ती आहोत म्हणून आपल्यासोबत घडत नाही, तर आकाशगंगा आणि संपूर्ण विश्वामध्ये देखील असंच घडतं. ब्रह्मांड जडत्वातून उद्भवतं, गतिमान होतं आणि पुन्हा एकदा जडत्वात विलीन होतं. मात्र हे चक्र मोडण्याची क्षमता आपल्याकडे आहे. मानवी अस्तित्व आणि कल्याणासाठी देवीचे पहिले दोन आयाम आवश्यक आहेत. तिसरं म्हणजे भौतिकतेच्यापलीकडे जाण्याची आकांक्षा. सरस्वतीला खाली खेचून आणायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अन्यथा, तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

नवरात्री साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग – त्यात उत्सवाच्या उत्स्फुर्थतेने सहभागी होणे. हे नेहमीच जीवनाचे रहस्य राहिले आहे: गंभीर न होणं पण पूर्णपणे गुंतलेलं असणं. परंपरेने देवीची उपासना करणार्या संस्कृतींना हे माहित होतं की अस्तित्वात असं बरंच काही आहे जे कधीही समजलं जाऊ शकत नाही. तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता, त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता पण ते कधीही समजू शकत नाही. जीवन एक रहस्य आहे, आणि ते नेहमीच एक रहस्य राहील. नवरात्रीचा उत्सव याच मूलभूत बोधावर आधारित आहे.