स्वतः पलीकडे जगणे
सद्गुरु या ठिकाणी त्या सर्वांना संबोधन करतात ज्यांनी "रॅली फाॅर रिव्हर्स"ला एक राष्ट्रीय चळवळ म्हणून पुढे चालवण्यासाठी योगदान दिले. ते म्हणतात हा केवळ एक पर्यावरणीय प्रयत्न राहणार नाही. जे आमच्या संपर्कात आले आहेत, अशा बऱ्याच जणांसाठी हे अध्यात्मिक प्रक्रियेमध्ये रूपांतरित होईल. पुढील चरणांची रूपरेषा सांगताना सद्गुरु विशेषतः तरुणांना, नद्यांचे प्रवाह पुनरुज्जीवित करण्यासाठीच्या पुढच्या टप्प्यात भाग घेण्यासाठी आवाहन करतात. "फक्त जेव्हा तुम्ही स्वतः पेक्षाही मोठे असे काहीतरी करता तेव्हा तुम्हाला परिपूर्णतेचे समाधान मिळते."
जरी नद्यांच्या प्रवाहासाठी 'रॅली फाॅर रिव्हर्स' माझ्या मनात काही काळापासून घोळत असली तरीही सुरुवातीच्या फक्त दोन महिन्यांपूर्वीच मी आमच्या सहकाऱ्यांशी बोललो. जेव्हा आम्ही अशक्यप्राय मुदत आणि प्राणघातक वेळापत्रक पुढे ठेवतो तेव्हाच आमचे संघ उत्कृष्टपणे कार्य करतात. हेच आम्हाला आमचे सर्वस्व देण्यास उद्युक्त करते. गेल्या 25 वर्षांपासून हे असेच आहे. जर पूर्वी कधीच केले गेले नाही असे काही तरी तुम्हाला तयार करायचे असेल आणि ते काही विशिष्ट प्रतीचे आणि विविध पैलूदार असेल तर प्रत्येकाची डोकेफोड झाली पाहिजे. कारण बहुतेक लोक आपल्या डोक्याचा वापर तोफगोळ्यासारखा करतात. त्याला कशानेतरी पेटविले पाहिजे नाहीतर तो कुठेही जाणार नाही. तसे ते पेटले आणि रॅलीला चालना मिळाली.
आपण जे साध्य केले ती अलीकडच्या काळातील या देशातील अविश्वसनीय घटना आहे. त्यामागील निखळ प्रयत्न आणि ऊर्जा- ही जाणिवेची शक्ती आहे. मी 'ईशा'मध्ये काही काळापूर्वी कोणालातरी सांगितले होते की, आम्ही एक मुर्खांची टोळी आहोत जी अविश्वसनीय कामे करते. त्यातले फारच थोडे जण थोडेफार शिकलेले आहेत. बाकी सर्व माझ्यासारखे आहेत. अद्भुत काहीतरी तयार करण्यासाठी कोणतीही मोठी बुद्धी किंवा पात्रता लागत नाही. आपल्याला जे काही करायचे आहे त्यावर निस्सीम भक्ती जरुरी आहे. जेव्हा तुमच्या ऊर्जा एकाच दिशेत एकवटतात, सर्वकाही तुमच्यासाठी कार्य करते. पारंपारिक योगविद्येमध्ये असे म्हटले जाते की ज्या क्षणी तुम्ही चित्ताच्या त्या परिमाणाला स्पर्श करता, जे स्मृती, समज, परिसीमा, शिक्षण अथवा ज्ञानाच्या पलिकडे आहे, तेव्हा देव तुमचा गुलाम होतो. ही रॅली म्हणजे त्याचे प्रात्यक्षिक आहे. तिने संपूर्ण देशाला हलविले आहे.
मूलतः हे सिद्ध होते की ही बाब सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी होती, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? असा कोणी मूर्खच असेल जो मांजराच्या गळ्यात घंटा बांधतो ज्याला हेही माहित नाही की ते घरगुती मांजर आहे की वाघ! असे बऱ्याच परिस्थितीत घडते. तुम्हाला वाटले की हे मांजर घरगुती आहे आणि अचानक पणे त्याने गर्जना केली आणि तुमचे डोके खाऊन टाकण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांनी मला इशारा दिला की मी माझी प्रतिष्ठा पणाला लावत आहे. मी म्हणालो, " मी माझी प्रतिष्ठा धोक्यात घालण्यास तयार आहे आणि माझा जीवही, कारण हे अत्यावश्यक आहे. आपल्या नद्या आपल्या भावी पिढ्यांसाठी वाहतील याची आपल्याला खातरजमा करून ठेवावी लागेल".
आम्ही तीस दिवस स्त्यावर होतो म्हणून काही सर्वच गोष्टी ठीक होतील असे नाही. असेही नाही, की उद्या सकाळी सर्व नद्या वाहू लागतील. आपणास अशी एक मोठ्या प्रमाणावरील चळवळ पाहिजे ज्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकणार नाही. हा केवळ एक पर्यावरणीय प्रयत्न राहणार नाही. आपल्या संपर्कात आलेल्या बर्याच जणांसाठी हे एका अध्यात्मिक प्रक्रियेत रूपांतरित होईल. ही प्रक्रिया मूलतः अध्यात्मिक आहे. सध्या हे ध्येय पर्यावरणीय आहे, कारण तुम्हाला माहित आहे? गौतम बुद्ध यांना एका झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले. मी मोठ्या प्रमाणात आत्मज्ञानप्राप्तीची योजना बनवीत आहे. जेव्हा तो दिवस उजाडेल तेव्हा तुम्हाला खाली बसण्यासाठी एक छानसे झाड असावे अशी माझी इच्छा आहे (हसतात).
मग रॅली कधीपर्यंत सुरू राहील? आम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत मिस्ड कॉल प्रयत्न चालू ठेवू. आम्ही बारा कोटींचे मिस्ड कॉल्स ओलांडले आहेत. हे फक्त मी पूर्वी म्हटल्यापैकी, म्हणजे तीस कोटीच्या 40 टक्के आहे आजकाल मी 60 कोटी म्हणत आहे. कारण संख्याप्रणालीचा शोध भारतीयांनी लावला होता, म्हणून आपल्याला ही हवी तशी वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. जर आपण आपली लोकसंख्या सत्तर वर्षात चार पट वाढवू शकतो तर मिस्ड कॉल काही पटीने का वाढवू शकत नाही? हे काही एखाद्या विशिष्ट आकड्याबद्दल नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकाने यात भाग घेतला पाहिजे, ते जीवनात इतर काय गोष्टी करतात याची पर्वा न करता. त्यापासूनच या चळवळीला बळ मिळते.
ही रॅली अतुलनीय आहे, फक्त भारतातच नव्हे. या संपूर्ण पृथ्वीग्रहावर इतर कोठेही अशी पर्यावरणीय चळवळ कधीही इतकी मोठी झाली नाही. सामान्यतः फक्त परिघीय गट काही पर्यावरणीय कारणांसाठी लढत असतात. हे आंदोलन नाही, हा निषेध नाही, हे कोणाच्याही विरोधात नाही, असे सांगून ही चळवळ आपण योग्य रीतीने सुरू केली त्यामुळे संपूर्ण देशाने प्रतिसाद दिला. माध्यमांनी आश्चर्यकारकरीत्या प्रतिसाद दिला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीच अशा तऱ्हेने कुठल्याही बातम्या दिल्या गेल्या नाहीत ज्या प्रकारे 'रॅली फाॅर रिव्हर्स' च्या बातम्या दिल्या गेल्या, तीस दिवसपर्यंत. चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंतांनी प्रतिसाद दिला. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेत खूप मोठा हातभार लावला. या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आमची इच्छा आहे.
सर्वात महत्त्वाचे, आपण सर्व देशभरातील स्वयंसेवक, आपण सर्व खूप वेडे आहात. ही एक चांगली पात्रता आहे. जर तुमच्याकडे वेडे हृदय नसेल तर तुम्ही एक बद्धकोष्ठ जीवन जगून मराल. अगदी थोडेसेच घडते - हेच बद्धकोष्ठ जीवन आहे. खूप काही शक्य होते पण अगदी थोडेसेच तुमच्या जीवनात घडले तर ते बद्धकोष्ठित जीवन आहे. आयुष्य म्हणजे तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही याबद्दल नाही. तुम्ही काय गोळा करु शकलात आणि काय गोळा करू शकला नाहीत याबद्दलही ते नाही. तुम्ही काय परिधान केले, कोठे राहिलात, कोणती गाडी चालवली त्याबद्दलही नाही. ते तुमच्या अनुभवाच्या प्रगल्भतेबद्दल आहे. तुमच्या आयुष्यातील एकमेव संपत्ती म्हणजे तुमचे जीवन किती प्रगल्भ आहे. ज्या गोष्टी तुम्ही गोळा करता त्यांच्यासाठी तुम्ही जर याचा बळी दिलात- हे भरलेले कोठार अंततः तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात? जीवन आणि मृत्यू या दोन्हीतून वहन करता येणारी एकमेव खरी संपत्ती म्हणजे अनुभवाची प्रगल्भता.
तुमच्या जीवनात असणारी एकमेव गोष्ट म्हणजे जीवन हेच आहे. बाकी सर्व काही, अगदी सगळे जे काही तुमच्या विचारांमध्ये व भावनांमध्ये उगवते ते फक्त तुमची कल्पना आहे. अनुभवांची सखोलता कार्य करते आणि तुम्हाला एका संपूर्णपणे वेगळ्या स्तरावर आणून सोडते. तुम्ही एक विकसित जीवन बनता. देशभरातील अनेक स्वयंसेवकांसाठी हा एक महिना आतापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यातील सर्वांत गहन अनुभव होता. हे माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हजारो लोकांसाठी त्यांच्या आयुष्याचा अनुभव हा पूर्वी जेवढा होता त्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ बनला आहे. आणि ती प्रगल्भता घडली कारण जाणते-अजाणतेपणी काही काळासाठी "माझ्याबद्दल काय?", हे ते विसरले.
नाहीतर, ज्या लोकांना असे वाटते की ते काहीतरी महत्त्वपूर्ण करत आहेत ते पूर्णपणे बद्धकोष्ठित दिसतात. तुमच्या आयुष्यातील सर्वात गंभीर बाबींना आनंदाने कसे सोडवायचे हे माहीत नसले तर आयुष्य म्हणजे तुमच्या मनावर ओझे बनेल. ते इतके जड होईल की जेव्हा तुम्ही जिवंत असाल तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही आधीच गाडले गेलेले आहात. बरेच लोक स्वतःला असेच करून घेतात. म्हणून ते पब, बार किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसतात - आराम करण्यासाठी आणि थोडा श्वास घेण्यासाठी. इतर वेळी ते स्वतःला गाडून घेत असतात. मला तुम्हाला प्रत्येक क्षणी मोकळेपणाने श्वास घेण्याचा आनंद जाणवून द्यायचा आहे. तुम्हाला हा आनंद घ्यायचा असेल तर एवढेच फक्त करायचे: हा एक विचार सोडून द्यायचा, "माझ्याबद्दल काय?" मी तुम्हाला सांगेन तुमच्याबद्दल काय ते - आम्ही तुम्हाला एक दिवस जाळून टाकू किंवा दफन करू. प्रश्न त्याआधीचा आहे, तुमच्या जीवनाचा अनुभव किती गहन आहे? हे एवढेच आहे. आपण करत असलेल्या क्रियेमुळे प्रगल्भता घडत नाही. आपण जे निर्माण करतो ते आपल्यापेक्षा मोठे असले की प्रगल्भता घडते.
हे केवळ देशभरात मोठी रॅली घेऊनच घडू शकते असे नाही. हे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीबरोबर होऊ शकते. तुम्ही काय करता हे तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा आणि तुमच्या जगण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे- जर या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व गोष्टी हाताळाल तर आयुष्य अतिप्रगल्भ होऊन जाईल. जर ते इतके प्रगल्भ झाले तर तुम्ही एखाद्या अलौकिक माणसाप्रमाणे कार्य कराल. तुम्ही अतिमानवी झालात म्हणून नाही, तर तुमची बद्धकोष्ठता दूर झाली म्हणून. मी मुद्दाम एक ओंगळ उदाहरण देत आहे कारण लोक एखादे फूल किंवा चंद्र या सारखी सुंदर गोष्टही दुर्लक्षित करू शकतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडी जरी घाण असेल तर ते जागरूक होतात. म्हणून त्यांना जाणीव करून देण्यासाठी आपण त्यांच्यावर थोडी घाण टाकली पाहिजे. तुम्ही जर बद्धकोष्ठित असाल आणि अचानक तुम्हाला जुलाब झाले तुम्हाला विश्वास बसत नाही की तुमच्या शरीरात इतकी घाण साचली होती. तसेच, "माझ्याबद्दल काय?" या सततच्या विचाराने तुम्ही तुमचे जीवन बद्धकोष्ठित करून घेतले असेल आणि तो विचार तुम्ही काढून घेता, तेव्हा तुम्ही पहाल, अचानक ती मुक्तता किती मोठी असेल.
आज जी गोष्ट जगाचा नाश करत आहे ती म्हणजे कोणीतरी काहीतरी काम करतो आणि काहीतरी नष्ट होतं, आणि इतर सर्वांना वाटतं, " ते करत आहेत, मग काय अडचण आहे? मी पण करू शकतो. नकारात्मक गोष्टी करणारा मीच फक्त एकटा नाही." अशाच प्रकारे आपण नदीसारखे महाअफाट जीवन नष्ट केले आहे. मी कशाबद्दल बोलतोय हे आपल्याला माहीत नसेल, तर एक होडी घ्या कदाचित आलाहाबादहून काशीपर्यंत. फक्त नदी अनुभवण्यासाठी, ते काय सामर्थ्यवान जीवन आहे! हा तुमच्या आयुष्यातला एक मोठा अनुभव असेल. आणि अशा या सामर्थ्यवान जीवनाला आपण शरण आणले, "दुसरे असे करत आहेत तर मग मीही करू शकतो", असा विचार करून. प्रत्येक जण करत असलेल्या छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टी अखेरीस आपत्तीचे कारण ठरतात.
असा विचार करू नका, "प्रत्येक जण कॉल करतोय- माझा मिस्ड कॉल लक्षात येणार नाही." बऱ्याच माणसांमध्ये ही एक मोठी समस्या आहे- जर त्यांना काही मिळवायचे असेल तर ते मोठे बनतात; ते आपल्या हक्कांचा दावा करतात. त्यांना काही द्यावं लागत असेल तर ते इतके लहान आणि नम्र बनतात. "शेवटी मी काय करू शकतो?" जर तुम्ही हे समीकरण उलट केले तर जीवन नाट्यमयरित्या बदलून जाईल. नद्या प्रवाहित होईपर्यंत 'रॅली फाॅर रिव्हर्स' सुरू राहील. यासाठी समर्पित लोकांची आवश्यकता असेल.
रॅलीची पुढची पायरी म्हणजे देशातील सरकारांना कृती करायला लावणे. काल, आम्ही पंतप्रधान यांना भारतीय नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी धोरणातील शिफारसी मसुद्यात सादर केल्या. जगभरात नद्यांचे पुनरुज्जीवन कसे केले गेले, विविध प्रकारच्या मातीत, विविध प्रकारच्या हवामानात आणि ते भारतात कसे केले जाऊ शकते यावरील अनेक प्रकरणांच्या अभ्यासासह हे एक योजनाबद्ध आणि उत्कृष्ट दस्तऐवज आहे - याचे संपूर्ण शास्त्र. या कार्यासाठी अत्यंत श्रद्धा आणि उत्साह यांसह खूप चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु याला कृतीत उतरवण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल. आपण हे इंजिन चालू ठेवले नाही तर कारवाई पुढे ढकलली जाऊ शकते. त्यांच्या हाती दररोज काम करण्यासाठी हजारो मुद्दे आहेत.
तुम्ही सर्वांनी आपला आवाज ऐकवला पाहिजे. तुम्ही जे बोलता त्यातील दहा टक्के आणि तुम्ही दररोज पाठवित असलेल्या संदेशापैकी दहा टक्के संदेश नद्यांविषयी असले पाहिजेत. "परंतु सद्गुरु, माझे मित्र मला एक डोकेफिरू समजतील." तुम्ही ते केले नाही, तर तुम्ही एक डोकेफिरू आहात. जर तुम्हाला हे समजले नाही की नद्या आपल्यासाठी जीवनाचे स्रोत आहेत तर तुम्ही एक डोकेफिरू आहात. हे म्हणजे एका कल्पित कथेतील माणसाप्रमाणे आहे जो चुकीच्या टोकावर बसून झाडाच्या फांद्या तोडत होता. जर तो यशस्वी झाला तर तो आपटेल. आत्ता आपण तिथे आहोत. जर आपण आता कारवाई केली नाही, तर आपण तेव्हाच जगू शकू जेव्हा आपली अर्थव्यवस्था आणि आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट अपयशी ठरेल. हा पूर्णपणे वेडेपणाच नाही का?
आपण याप्रमाणेच जगभरात चालत आहोत, फक्त भारतातच नव्हे. परंतु, आपल्याकडील मर्यादित भूमीतील अतिलोकसंख्येच्या दबावामुळे भारताला या आपत्तीचा पहिला डोस मिळेल. जगालासुद्धा मिळेल, पण काहीजण सुनियोजित आहेत आणि त्यांनी भिंती बांधल्या आहेत (हसतात). म्हणून 'रॅली फाॅर रिव्हर्स' सुरू राहिली पाहिजे. मला असे वाटते की तुम्ही सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि रोज नाही तरी आठवड्यातून एकदा या रॅलीसाठी सोशल मीडियावर सक्रिय रहावे.
जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टी पाहता तेव्हा एक तर तुम्ही त्याचे भाग बनून जाता किंवा त्याच्या पलिकडे विस्तारू शकता. आयुष्यातील प्रत्येक क्षणी ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असलात तरीही तुमच्याकडे तीन पर्याय असतात. एक तर तुम्ही तुमच्या विस्तारासाठी तिचा उपयोग करून घेऊ शकता किंवा तुमच्या मध्ये काहीही बदल न करण्यासाठी उपयोग करू शकता किंवा तुम्ही स्वतःला सर्व गोष्टींपासून वगळण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु सहभागाशिवाय आयुष्याचा अनुभवही नाही. आयुष्य गहन होण्यासाठी सहभाग अगदी अनावर आणि सरसकट हवा. मोजून मापून केलेला सहभाग तुमच्या जगण्याची काळजी घेईल, पण तुम्ही कशासाठी जगत आहात? असेही तुम्ही मरणार आहात, मग जीवनात सामील होणे आणि जास्तीत जास्त सखोल अनुभव घेणेच अधिक चांगले नाही का?
तर या पुढील कारवाई हे सगळे धोरण निश्चित करण्यासाठी आहे. एक प्रचंड जमेची बाजू म्हणजे वेगवेगळे सर्व राजकीय पक्ष या रॅलीसाठी एकत्र आले आहेत. आम्ही हा एक अडथळा पार केला आहे. आता बाकीचे म्हणजे कायदे करण्याविषयी आव्हाने, कायदेशीर बाबी, तांत्रिक आव्हाने, प्रशासकीय आव्हाने आणि अंमलबजावणीत येणाऱ्या गुंतागुंती यांकडे तपशीलवार लक्ष दिले पाहिजे. आम्हाला आशा आहे की येत्या काही महिन्यात आम्ही यावर तोडगा काढू. पण याचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष काम करणारे लोक हवे आहेत. अनेक राज्यांनी आमच्याकडून नदीकाठाचे आर्थिक आराखडे उभारण्याची अपेक्षा केली आहेत, जेणेकरून आम्ही दाखवू शकू की वृक्ष-आधारित शेतीकडे वळणे हे शेतकऱ्यांना आता वापरात असलेल्या पद्धतीपेक्षा खूप जास्त फायदेशीर आहे.
पुढील काही वर्षात आम्हाला 16 राज्यांमध्ये कमीत कमी बाराशे लोकांची गरज आहे जे पूर्णवेळ समक्ष उभे राहतील व गोष्टी घडवून आणतील. त्वरित किमान काही शेकडा लोकांची आम्हाला गरज आहे जे प्रत्यक्ष कृती करण्यास प्रतिबद्ध आहेत. काही राज्यांमध्ये धोरण संमत केल्याशिवाय हे सहज होईल. काही राज्यांमध्ये हे संघर्षमय होईल. काही राज्यांमध्ये हे एक दुष्कर काम असेल परंतु पुढील पाच वर्षांच्या काळात आपण जर यशस्वी आणि पुरेसे मोठे आराखडे सुनिश्चित केले तर आपले काम झाले. त्यानंतर ते देश आणि लोकांवर अवलंबून आहे की ते हे कितपत पुढे नेतात.
यासाठी तरुणांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. जर या एका विचारावर पाणी सोडले, "माझ्याबद्दल काय?" जीवन जबरदस्त प्रवाहीपणे घडेल, ओघळणार नाही. फक्त जर तुम्ही स्वतः पेक्षा मोठे काहीतरी केले तर तुम्हाला कायमचे समाधान वाटेल. तुम्ही स्वतः पेक्षा छोट्या गोष्टी करता तेव्हा जीवन हे रसायनांशिवाय घडत नाही. तुम्ही जोपर्यंत मद्यधुंद होत नाही किंवा इतर काही करत नाही तोपर्यंत तुम्ही हसू शकत नाही, गाऊ शकत नाही, नाचू शकत नाही. संपूर्ण जग या दिशेने वाटचाल करत आहे. ही रॅली घडवून आणण्यासाठी कितीतरी लोकांनी प्रयत्न केले आहेत - चित्रपट, क्रीडा व इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, राजकीय नेते, स्वयंसेवक, आश्रमवासी आणि ब्रह्मचारी. बरेच जण अशा प्रकारे काम करत आहेत जणू काही हा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. हाच जगण्याचा मार्ग आहे. तुमच्या स्वतःच्या जीवनाची वृद्धी करण्यासाठी या रॅलीचा तुम्ही वापर करावा अशी माझी इच्छा आहे. नद्यांच्या प्रवाहाबरोबर तुमचे जीवनही प्रवाहित व्हावे. परंतु तुम्ही एक विचार वजा करून आले पाहिजे, "माझ्याबद्दल काय?"
बरेच लोक अशी कामे करतात जी त्यांना करायला आवडत नाहीत कारण त्यांना वाटतं की ते त्यांचे कर्तव्य आहे, आणि आयुष्यभर यातना भोगतात. हुशार लोक त्यांना प्रिय असलेली कामे करतात आणि काही प्रमाणात जीवनाचा आनंद घेतात. पण अलौकिक बुद्धिमत्ता असलेला माणूस जे जरुरी आहे ते आनंदाने करावयास शिकतो. आपली अलौकिक बुद्धिमत्ता तेव्हाच फुलते. जेव्हा त्यात तुमचा स्वार्थ नसतो तेव्हा जीवनाकडे पाहण्याचे अमर्याद मार्ग असतात. मला या रॅलीच्या अनेक पैलूंबद्दल किंवा आणखी काही गोष्टींबद्दल काही सांगावेही लागत नाही- त्या आपोआप घडतात. मी माझ्या इच्छा जगावर लादतो म्हणून नाही तर मी अस्तित्वाची इच्छा पूर्ण केल्यामुळे. हे करणे आवश्यक आहे आणि आपले सर्वस्व पणाला लावून जे हे करतात त्यांना परिपूर्ती लाभते. मी तुमच्या बरोबर आहे.