कबीर – आत्मज्ञानी विणकर
आध्यात्मिक कवी कबीर याच्याकडे साधकांनी अनेक शतके प्रेरणास्थान म्हणून पाहीले आहे. सद्गुरू सांगतात की आपण जेव्हा त्याच्या धर्माबद्दलच्या चर्चेत अडकतो, तेव्हा त्यांने जे सांगितलेले ज्ञान आहे, त्याला आपण मुकतो.
"माटी कहे कुम्हार को – कबिराची एक कविता"
माटी कहे कुम्हार को, तू क्या रोंधे मोय
एक दिन ऐसा आयेगा, मै रौंधुंगी तोय
आये है सो जायेंगे, राजा रंक फ़क़ीर
एक सिंघासन चढ़ चले, एक बंधे जंजीर
कबीरांनी उलगडलेल्या सत्याप्रती कानाडोळा
सद्गुरू: आज कबीर जयंती आहे. कबीर हा विणकर होता – एक विलक्षण गूढवादी, आध्यात्मिक कवी. तो त्याच्या वेगवेगळ्या कवितां मधून (दोह्यांतून) अजूनही आपल्यात वास करतो. त्याने जे काव्य लिहिले, किंवा गायले, ते त्याच्या आयुष्याचा एक छोटासा भाग होय. बहुतेक वेळ तो विणकाम करत असे. आता फक्त काव्यच उपलब्ध असल्यामुळे लोकांना असे वाटते की त्याने फक्त तेच केले. पण नाही, तो आयुष्यभर विणकाम करण्यात व्यस्त होता, काव्यात नाही. त्यांनी विणलेले कापड आज राहिलेले नाही पण कुठे न कुठे त्यांचे एखादे काव्य, एखादे पद अजून ही जिवंत आहे. किती हरवून गेले आहे, मला माहित नाही, पण जे शिल्लक आहे ते ही खूपच आश्चर्यकारक आहे.इतका विलक्षण माणूस असूनही आपल्याला काव्या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. निश्चितच तो एक आगाध अनुभव असलेला माणूस होता, यात काही शंका नाही. परंतु त्याच्या संपूर्ण आयुष्यभर, आणि त्याही पलीकडे, त्याचे आध्यात्म, त्याचे ज्ञान, तो जी नवीन दूरदृष्टी देऊ इच्छित होता ती, हे सर्व, लोकांना महत्त्वाचे वाटत नव्हते. तो हिंदू आहे की मुसलमान, याचाच खुलासा या वादविवादात लोक अडकून राहिले. त्यांच्या मते, हा मुख्य प्रश्न होता. जर तुम्हाला माहिती नसेल, तर मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती देतो; कोणीही हिंदू अथवा मुसलमान किंवा असंच काही निरर्थक बिरूद घेऊन, जन्माला येत नाही. कोणी हिंदू, अथवा मुसलमान किंवा आणि कुठल्या धर्माचा म्हणून मरतही नाही. पण जेव्हा आपण इथे असतो, तेव्हा ते एक मोठ्ठे सामाजिक नाटक चालू असते.
तुम्ही कोण आहात या बद्दलची तुमची कल्पना, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, तुमच्या मालकीचे काय आहे आणि काय नाही – ह्या सर्वांशी बांधलेल्या तुमच्या साऱ्या ओळखी हे असत्य आहे. सत्य हे सहज स्थित आहे; तुम्हाला काहीच करायची गरज नसते. सत्याच्या कुशीतच आपण सगळे जगतो आणि अस्तित्वात आहोत. सत्य म्हणजे तुम्ही वाचेने जे उच्चारता ते नव्हे; सत्य म्हणजे ब्रम्हांडाचे मूलभूत नियम, ज्यांच्यामुळे हे जीवन आणि सर्व काही शक्य होते आणि घडून येते. तुमच्यासमोर पर्याय केवळ एवढाच आहे की एकतर तुम्ही त्यांच्या सुरात सूर मिळवत आहात किंवा नाही. सत्य तुम्हाला नव्याने निर्माण करावयाचे नाहीये. सत्याचा तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये. तुम्हाला ते स्वर्गातून पृथ्वीवर आणायचे नाहीये.
जर एक झाड वाढते, फुलते आणि बहरते आहे म्हणजे त्याच्या जीवनाला आधार देण्यासाठी आवश्यक ती सर्व साहित्य सामुग्री इथे उपलब्ध आहे – म्हणूनच ते जिवंत आणि वाढते आहे. जर तुम्ही इथे आहात म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्यामधील जीवनासाठी बहरण्यासाठी आवश्यक ते सर्व काही इथे उपलब्ध आहे. नाही तर तुम्ही इथे असला नसता. तर प्रश्न हा आहे की तुम्ही या शक्तींशी तालात आहात की त्यांच्या विरोधात आहात?
“अहो, मी का जीवन शक्तींच्या विरोधात असेन?” वास्तविकता अशी आहे की, ज्या क्षणी तुम्ही जे प्रत्यक्षात नाही ते मी आहे, असे मानता, त्याच क्षणी तुम्ही जीवन शक्तीच्या विरुद्ध ठाकता. तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की तुम्ही धार्मिक आहात, पण खरं पाहता तुम्ही पार गोंधळून गेलेले आहात. तुम्ही एक मानसिक काल्पनिक नाट्य करत आहात आणि अस्तित्वाचे खरेखुरे नाट्य नजरेआड करत आहात. तुम्ही सृष्टीकर्त्याच्या कलाकृतीला मुकता आहात कारण तुमच्या स्वतःच्या खुळ्या काल्पनिक कलाकृतींमध्येच तुम्ही व्यस्त आहात
आत्मसाक्षात्कार – अज्ञानाचा एक उत्सव
तुम्ही सत्याच्या दिशेने तेव्हाच वाटचाल करू लागाल जेव्हा तुम्हाला हे उमजेल की “मला माहित नाही”. तुम्हाला माहित आहे या समजुतीत जर तुम्ही अडकून राहिलात, तर तुम्ही नेमकं असत्याच्या दिशेने जाऊ लागाल. कारण, “मला माहित आहे” हा फक्त एक विचार आहे. वस्तुस्थिती “मला माहित नाही” ही आहे; ती वास्तविकता आहे. जितक्या लवकर हे तुमच्या लक्षात येईल, तितके उत्तम. तुमच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचे आकलन म्हणजे, तुम्हाला ‘माहित नाही’ ही आहे. “मला माहित नाही” ही प्रचंड मोठ्ठी शक्यता आहे. केवळ जेव्हा तुम्हाला “मला माहित नाही” याचे आकलन होते, तेव्हाच तुमच्यामध्ये जाणून घेण्याची ओढ, त्यासाठी शोध आणि मग ज्ञानोदयाची शक्यता प्रत्यक्षात साध्य होऊ लागतात.
या संस्कृतीत आपण नेहेमीच अज्ञानाशी ओळख बांधली आहे कारण आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला अगदी कितीही ज्ञात असले तरी ते फार थोडे आहे, मात्र आपले अज्ञान मात्र अमर्याद आहे. म्हणून जर तुम्ही तुमची ओळख तुमच्या अज्ञानाशी निगडीत ठेवलीत तर एका प्रकारे तुम्ही अमर्याद व्हाल. कारण तुमची ओळख ज्याच्याशी निगडीत असेल, त्याचे गुण तुमच्यात येतात. एका प्रकारे, आत्मज्ञान म्हणजे अज्ञानाचा उत्सव आहे, परमानंदी अज्ञान. तुमच्या डोक्यात माहितींचा पसारा नाहीये आणि म्हणून तुम्ही गोष्टी जश्या आहेत तश्या सुस्पष्ट बघू शकता, एवढेच. जर मनात माहितीचा गडबड गोंधळ असेल तर, तुम्ही गोष्टी जश्या प्रत्यक्ष आहेत तश्या बघू शकत नाही; तुम्ही सर्वांप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगता.
तर, कबीर हा एक आत्मज्ञानी विणकर होता; एक गूढ योगी. आध्यात्म हे काही फक्त भूतकाळातल्या कुठल्या एका व्यक्तीशी निगडीत असता कामा नये - की ज्याने कविता लिहिल्या आणि तुम्ही त्यातल्या काही वाचल्या – असे असायची गरज नाही. गूढ आध्यात्म म्हणजे, रोज तुम्ही जीवनाच्या नवीन अयमात पाय ठेवणे. तुम्हाला माहित नसलेले काहीतरी नवीन रोज तुम्हाला अनुभवायला मिळणे. आध्यात्म म्हणजे, गोळा केलेल्या माहितींचा साठा नव्हे; तर तो एक शोध आहे. जर तुम्ही कश्यावर तरी विश्वास ठेवू लागलात की तुम्ही त्याचा शोध घ्यायला जाणार नाही. फक्त जेव्हा तुम्हाला हे माहिती असेल की तुम्हाला “माहित नाही”, तेव्हाच तुम्ही खरोखर शोध घेऊ शकाल.
Editor’s Note: Read more on other mystics that Sadhguru has spoken about.