प्रश्न 1) आजचा युवक ऍप्स आणि विविध गॅजेट्स यांनी वेढला गेला आहे. त्यांचा दिवस एखाद्या पोस्टने सुरू होतो आणि एखादे ट्विट करून समाप्त होतो. अशा परिस्थितीमध्ये ते आपल्या जीवनावर कसे नियंत्रण मिळवू शकतात?

सद्गुरु: ज्यांनी आपल्या स्वतःवर ताबा मिळविलेला नाही, ते नेहमी या ना त्या कारणाने विचलित होत राहतील. म्हणून ही गॅजेट्स समस्या नाहीत, तर त्यांचा सक्तीपूर्ण वापर ही समस्या आहे. आपण आपले तरुण, आपली मुले तसेच सर्व प्रौढ व्यक्ती यांच्या हे लक्षात आणून देणे आवश्यक आहे, की आपण आपल्या जीवनाचे आचरण अनिवार्यतेने करत नाही. आपण कसे जेवतो, बसतो, उठतो, कार्ये करतो या सर्व गोष्टी सजगतेने करायला हव्यात. या सर्व कामांमध्ये सजगता आली तर ह्या गॅजेट्सचा वापर ही सुद्धा एक सजगतेने केली जाणारी प्रक्रिया बनेल.

 

प्रश्न 2) तरूणांवर सतत होणाऱ्या माहितीच्या प्रभावामुळे, ते आपल्या दैनंदिन जीवनाचे नियोजन कसे करू शकतील?

सद्गुरु: आपण माहिती विषयी तक्रार करायला नको. शंभर वर्षांपूर्वी, अगदी शंभर किलोमीटर दूर अंतरावर जेंव्हा एखादे संकट कोसळले असेल, किंवा एखादी अतिशय विलक्षण घटना घडली असली, तरीही त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यास महिना लागत असे. आज जगात काय घडते आहे याची माहिती तुम्हाला त्वरित समजते. तंत्रज्ञान चांगले किंवा वाईट नसते. त्याला स्वतःचे कोणतेही गुणधर्म नाहीत – तुम्ही त्याचा वापर कशा प्रकारे करतो त्यावर सर्वकाही अवलंबून असते.

तुम्ही इतर कोणतीही तंत्रज्ञाने हाताळत असा – मोबाईल फोन, कॉम्पुटर किंवा सोशल मीडिया – यापैकी काहीच मानवी यंत्रणेपेक्षा परिष्कृत, जटील आणि अत्याधुनिक नाही – मानवी यंत्रणा ही या ग्रहावरील सर्वात परिष्कृत यंत्रणा आहे. आपण सर्वप्रथम त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मग सर्वकाही आपोपाप हाताळले जाईल. अन्यथा तंत्रज्ञानाची ही सुंदर देणगी आपल्या जीवनात पुष्कळ तणाव निर्माण करेल.

 

प्रश्न 3) कुटुंब आणि आप्तेष्टांशी संपर्क तुटत चाललेले तरुण, आपले भावनिक संतुलन कसे विकसित करू शकतील?

सद्गुरु: मानवी अस्तित्वाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे त्याची "भावना", आणि म्हणूनच भावनिक सुरक्षेला सर्वाधिक महत्व आहे. जर मनुष्य खरोखर सजग बनला, तर भावनांचा त्याच्यावर विशेष प्रभाव पडणार नाही. अन्यथा, मानवी जीवनात भावना फार भूमिका बजावतात.

म्हणून, अगदी लहानपणापासून, लहान मुलांना भावनिक सुरक्षितता प्रदान करणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच त्यांच्या आजूबाजूला नेहमी प्रेमळ वातावरण असणे आवश्यक आहे – केवळ घरीच नव्हे, तर शाळेत, रस्त्यांवर – ज्या ज्या ठिकाणी मुले वावरतात, त्या त्या ठिकाणी मुलांना प्रेमाची, आपुलकीची आणि वात्सल्याचे वातावरण निर्माण केले पाहिजे. आपण मानवतेच्या भविष्याच्या कल्याणाची काळजी घेतली पाहिजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.

प्रश्न 4) पाळीव प्राणी किंवा पक्षांपासून तरुणांना काय बोध घेता येतो?

सद्गुरु: हल्ली, अनेक व्यक्ती मनुष्याच्या ऐवजी कुत्र्यांना प्राधान्य देताना दिसतात कारण कुत्रे पाळणे म्हणजे 12 वर्षे विना अट प्रेमाची हमी! देव म्हणजे प्रेम आहे का, हे आपल्याला माहिती नाही, परंतु कुत्रा म्हणजे नक्कीच प्रेम आहे! सकाळी तुम्ही तुमच्या कुत्र्याला कोणत्या प्रकारची वागणूक दिली असली, तरीही संध्याकाळी जेंव्हा तुम्ही घरी परतता, तेंव्हा तो कुत्रा तुमचे ज्या प्रकारचे स्वागत करतो, तसे कोणतीही पत्नी, किवा मुलं कधीच करणार नाही.

म्हणून अनेक लोक त्यांच्या कुटुंबियांपेक्षा अधिक प्रेम त्यांच्या कुत्र्यांवर करतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. परंतु आपल्याला एखाद्या कुत्र्याविषयी जितके प्रेम वाटते, तितकेच प्रेम आपल्याला एखाद्या मनुष्याविषयी सुद्धा वाटू शकते, कारण प्रेम हे तुमचा कुत्रा, मित्रमंडळी किंवा कुटुंबा बद्दल नाहीये, प्रेम हे तुमच्या स्वतःबद्दल आहे.

प्रेम ही तुमच्याआत निर्माण होणारी गोष्ट आहे. तुम्ही जर अतिशय प्रेमळ बनलात, तर तुमचे अस्तित्व आनंददायी बनेल. आणि तुम्ही जर आनंदी असाल तरच तुम्ही जीवनाच्या सर्व पैलूंचा शोध घेण्याचे धाडस कराल. अन्यथा, दुखीः विचार, भावना आणि शरीर आपल्याला नेहमी  व्यस्त ठेवेल. आपण जर मन, शरीर आणि भावना आनंदी आणि प्रेमळ ठेवल्या, तर आपल्यामध्ये दुखाःची भीतीच शिल्लक राहणार नाही. आणि जेंव्हा दुखाःची भीतीच राहत नाही, तेंव्हाच आपण आपल्या जीवनाचा परिपूर्णतेणे शोध घ्यायला सिद्ध होतो.

Editor’s Note: Watch the Youth and Truth #UnplugWithSadhguru playlist, a comprehensive compilation of Sadhguru’s talks and interactions with the youth and students of India. New videos will be added to this playlist as more videos are released from the Youth and Truth events, so remember to visit this playlist again!