ईशा योग सेंटर मधील आदियोगीची प्रतिमा एवढी भव्य का बरं?
श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, दिल्ली इथल्या विद्यार्थ्यांनी सद्गुरूंना विचारलं की आदियोगींचा पुतळा एवढ्या मोठ्या आकाराचा का बांधला. ह्यावर सद्गुरू म्हणतात की आकार ही व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे. त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो. पुतळ्याची भौमितिक रचना एका ठराविक पद्धतीने केली आहे जेणेकरून त्याचे तीन विशिष्ट पैलू प्रकर्षित होतील.
प्रश्न: सद्गुरू, तुम्ही बांधलेल्या आदियोगी प्रतिमेचं आश्रमात आलेल्या प्रत्येकाला खरंच खूप नवल वाटतं. तुम्हाला वाटतं का की हल्ली जर लोकांचं लक्ष वेधायचं असेल तर गोष्टी मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतात?
सदगुरू: पण तिथे तर एकच पुतळा आहे. मोठ्या प्रमाणावर कसं काय?
प्रश्न: तो आकाराने प्रचंड मोठा वाटतो.
सदगुरू: लहान मोठं हे लोकांच्या बघण्यावर अवलंबून असतं. योगाकेंद्रातील लोकं मला सांगत होते की हा पुतळा अजून मोठा बांधायला हवा होता. मागच्या डोंगरापेक्षा हा खूपच लहान दिसतो. म्हणजेच हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. हे असं बांधायला एक कारण आहे ज्याला आपण 'दृष्टीवर पडणारा प्रभाव' असं म्हणूया. तुमच्याजवळ पाच ज्ञानेंद्रिये आहेत. समजा मी तुम्हाला सांगितलं की मी आता ह्यातील चार घेऊन टाकतो. तुम्ही एक तुमच्यापाशी ठेऊ शकता. तर तुम्ही कोणतं ठेवाल? फक्त नाक कि फक्त जीभ?
प्रश्न: सगळं महत्त्वाचं आहे.
सदगुरू: सगळं आहे महत्त्वाचं. पण तुम्हाला चार ज्ञानेंद्रियं गमवावी लागतील. तुम्ही पर्याय निवडायला शिकलं पाहिजे कारण आयुष्य तसंच असतं. सगळं नाही मिळत. तर मग कोणती चार गमवायला तयार आहात आणि कोणतं ठेऊन घेणार?
प्रश्न: कोणती पाच इंद्रिये?
सदगुरू: डोळे, कान, जीभ, त्वचेला जाणवणारी संवेदना किंवा नाक. ह्यापैकी एक तुम्ही ठेऊ शकता. सांगा काय ठेवाल?
प्रश्नकर्ता: डोळे!
सदगुरू: अर्थात डोळे. कारण ह्या पाचही इंद्रियांमध्ये डोळ्यांमुळे पडणारा प्रभाव हा आत्ता तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. समजा तुम्ही श्वान असता आणि मी तुम्हाला हे विचारलं असतं तर तुम्ही 'नाक' सांगितलं असतं कारण नाक हे कुत्र्याच्या अस्तित्वासाठी सगळ्यात जास्त उपयोगी आहे. पण माणसासाठी त्याची 'दृष्टी' ही सगळ्यात मोलाची. म्हणूनच आदियोगींबाबत आकारापेक्षा योग्य भूमिती असणे महत्वाचे ठरते. आणि छोट्या आकारात अचूक भूमिती बसवणे हे कठीण असते. आम्हाला तश्या भूमितीसाठी एका विशिष्ट आकाराची गरज होती.
आदियोगींच्या भूमितीरचनेमागील प्रमुख कारण म्हणजे तीन विविध पैलू प्रकर्षित करणे. समजा तुम्ही घरी गेलात आणि तुमचे वडील हे एका ठराविक पद्धतीने बसले असतील तर फक्त त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवरून तुम्ही सांगू शकता की त्यांच्या मनाची स्थिती कशी आहे. ते रागावले आहेत का आनंदी आहेत, दुःखी आहेत का त्रासलेले आहेत. आम्हाला आदियोगींची भूमिती अशा प्रकारे आखायची होती की त्यातून तीन पैलू - उत्साह, स्थिरता आणि धुंदी हे प्रकट होतील. मी जवळ जवळ अडीच वर्षे फक्त त्यांच्या चेहऱ्याची रचना कशी असावी ह्यावर कार्यरत होतो. अनेक चेहरे बनवून पाहिले. आम्हाला एक ठराविक आकार हवा होता. आणि तो आकार ऐंशी फुटांच्या वर गेला. मग आम्ही विचार केला की अंकालाही महत्व असते म्हणून मग आम्ही तो एकशे बारा फुटांचा बनवला.
जेव्हा आदियोगींनी माणसाला सर्वोच्च शक्यता गाठण्याचे मार्ग सांगितले तेव्हा ते एकशे बारा होते म्हणून आम्ही पुतळ्याची उंची एकशे बारा फुट ठेवली. जर आम्ही तो ऐंशी किंवा नव्वद फुटांच्या खाली बनवला असतं तर आम्हाला योग्य भूमिती साधणं शक्य झालं नसतं. मी विचार केला, चला तर मग त्याच्या आवडत्या अंकाचा तो बनवूयात. म्हणून तो एकशे बारा फुटांचा आहे.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा UnplugWithSadhguru.orgवर.