आनंद मिळवण्यासाठी स्वतःमध्ये डोकावून पहा
सद्गुरु या लेखात वर्णन करतात आनंदाचे स्वरूप जो आपल्या आतून अखंडपणे वाहणारा एक झरा असल्यासारखा.
प्रश्न: आपण असे म्हणता की जेंव्हा मनुष्य आनंदी असतो, तेंव्हा तो अधिक जुळवून घेणारा, अधिक मुक्त, “मी”पणाच्या ओझ्याखाली कमी दबलेला असतो. हा आनंद नक्की काय आहे? सद्गुरु, आपण या आनंदाचे वर्णन करू शकता का?
सद्गुरु: मी तुम्हाला कसे सांगू? हा प्रश्न खरं म्हणजे आनंदाच्या स्वरुपाच्या विशिष्ट गैरसमजुतीतून उदभवू शकतो. आज अगदी मनाला उत्तेजित करणार्या औषधं, मादकपदार्थांनासुद्धा “आनंद” असे नाव देण्यात येते. तुम्ही जेंव्हा “आनंद” असे म्हणता, तेंव्हा पाश्चात्य देशातील लोकांना त्यांना असे वाटते की तुम्ही एखाद्या विशिष्ट औषधी गोळी किंवा औषधाबद्दल बोलता आहात.
“खरा आनंद” आणि “खोटा आनंद” अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही जेंव्हा सत्यात असता, तेंव्हा तुम्ही आनंदात असता. जेंव्हा तुम्ही खरोखरच सत्याच्या सान्निध्यात असता, तेंव्हा साहजिकच तुम्ही आनंदात असाल. आनंदी असणे आणि आनंदी नसणे ही तुमच्यासाठी तुम्ही सत्यात आहात की नाही याची लिटमस टेस्ट करण्यासारखे आहे. हा प्रश्न कदाचित एका विशिष्ट मानसिकतेतून येतो: “मी जर सूर्यास्त पहात असेन, मी आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेंव्हा प्रार्थना करतो, मी जर आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेंव्हा ध्यान करत असतो आणि आनंदी होतो, तेंव्हा तो खरा आनंद असतो का?
बहुतेक लोकांमध्ये सुखोपभोग म्हणजेच आनंद अशी गैरसमजूत आहे. सुखोपभोग तुम्ही फार काळ टिकवून ठेवू शकणार नाही. पण आनंद ही अशी अवस्था आहे जी कशावरही अवलंबून नाही. सुखोपभोग हा नेहेमी कशावर किंवा कोणावर तरी अवलंबून असतो. पण आनंद हा कशावर किंवा कोणा व्यक्तीवर अवलंबून नाही. तो तुमचा प्राकृतिक स्वभावच आहे. एकदा तुम्ही त्याच्या सान्निध्यात आलात की तुम्ही त्यात स्थित होता, एवढंच.
आनंद हा काही तुम्ही बाहेरून मिळवण्याजोगा नाहीये, तो तुम्ही तुमच्या आतच, खोलवर शोधून काढता. ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आत खोलवर खणून शोधून काढता. हे जणू एक विहीर खोदण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमचं तोंड उघडून पावसाचे थेंब तोंडात पडण्याची वाट बघत बसलात, तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही थेंब तोंडात पडू शकतात. पण तोंड उघडून पावसाची वाट बघत तहान भागवण्याची ही एक अगदी दयनीय आणि निराशजनक स्थिती आहे. त्याशिवाय पाऊस हा काही शाश्वतपणे पडणारा नाही. एखाद, दोन तास पडेल आणि थांबणार.
यासाठीच तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणता – जेणेकरून वर्षभर पाणी उपलब्ध असेल. जे काही तुम्ही खरा परमानंद म्हणता ते एवढंच आहे, तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणली आहे आणि तुम्हाला पाण्याचा सापडलं आहे जे तुम्हाला सदासर्वदा तृप ठेवेल. आता तुम्ही पाऊस पडत असताना तोंड उघडून बसत नाही. नाही. आता तुमच्याजवळ निरंतर पाण्याचा साठा आहे. हाच आहे परमानंद.