शरीर काहीही विसरत नाही!
या लेखात सद्गुरू म्हणतात; आजची वाढती अस्वस्थता, असुरक्षितता आणि नैराश्य, याचे कारण आपली शरीरे संभ्रमात पडलेली आहेत.
आ ज आपण अशा संस्कृतीत रहात आहोत जिथे आपण संपूर्ण आयुष्य एकाच जोडीदारासोबत घालवणे गरजेचे नाही. गोष्टी बदलल्या आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की जोडीदार आता एक्सपायरी डेट म्हणजे मुदत संपण्याच्या तारखेसह येतात. तुम्ही जेंव्हा नाते प्रस्थापित केले तेंव्हा तुम्ही असा विचार केला होता की हे नाते कायमस्वरूपी आहे, पण तीनच महिन्यातच तुम्ही विचार करू लागता, “मी या व्यक्तीसोबत का राहात आहे?” कारण हे सर्व तुम्हाला काय आवडते आणि काय आवडत नाही यावर चालू होतं. यामुळे, हे सतत होकार, नकार...होकार, नकाराच्या चक्रात गुरफटत आहे. जेंव्हा नातं तुटतं किंवा ते अस्थिर बनते, तेंव्हा तुम्हाला भयंकर दुःख आणि वेदनेतून जावं लागतं, जे अजिबात अनावश्यक आहे. जर तुम्ही प्रेमात पडण्याचा आणि प्रेमभंग होण्याचा उपक्रम सतत करत राहिलात, तुम्ही जर अनेक व्यक्तीं भावनांशी खेळत राहिलात, तर कालांतराने आपण बधिर व्हाल, आपल्याला कोणतीच व्यक्ती आवडणार नाही कारण जीवनात ऋणानुबंध असं काही तरी असतं.
ऋणानुबंध हा कर्म प्रक्रियेचाच एक पैलू आहे, तो कर्म संरचनेची एक ठराविक अशी एक रचना आहे. लोकांना भेटल्याने आणि त्यांच्या सहवासात काही काळ राहिल्याने तसे घडते. जेंव्हा एका विशिष्ट कालावधीसाठी आपण लोकांना भेटतो आणि त्यांच्या सहवासात राहतो, तेंव्हा काही ऋणानुबंध निर्माण होतात. विशेषतः जेंव्हा दोन शरीरे एकत्र येतात, तेंव्हा ऋणानुबंध अधिक गहिरा असतो. शरीरात एक प्रकारची नोंद तयार होत असते; शरीर घडलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असते. जर दुसर्या शरीरासोबत निकट संबध निर्माण झाले; तर त्या विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची नोंद ठेवत असते.
आणि शरीर लक्षात ठेवत असल्याने, जर एकापेक्षा अधिक जोडीदार असतील, तर काही काळानंतर शरीर हळूहळू गोंधळात पडू लागते आणि हा गोंधळ आपल्या आयुष्यात लक्षावधी मार्गांनी उलगडू लागतो. तुमचे मन गोंधळलेले आहे पण कसे तरी तुम्ही त्याच्या सोबत जगत आहात. शरीर जर गोंधळून गेले, तर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत याल.
आज जगात अस्वस्थता, असुरक्षितता आणि नैराश्याची पातळी वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ;अनेक मार्गांनी, शरीरे गोंधळात पडलेली आहेत. काही काळानंतर आपल्याला वेड लागायला कोणतेही कारण लागणार नाही. कोणत्याही कारणाखेरीज लोकं विक्षिप्तपणे वागत आहेत कारण त्यांचे शरीर गोंधळून गेले आहे.
अनेकांशी निकट शारीरिक संबंध ठेवल्याने शरीर गोंधळून जाते हा एक भाग झाला. त्याचा दूसरा भाग म्हणजे तुम्ही सेवन करत असलेले अन्न. जेंव्हा थोडीशी संपन्नता येते, तेंव्हा लोकांना असे वाटते की सर्व प्रकारचे अन्न एकाच भोजनात खाऊन टाकले पाहिजे. भारतात, कर्मठ व्यक्ती आपल्या भोजनात कधीही दोन किंवा तीनपेक्षा अधिक पदार्थ घेत नाहीत, आणि ते तिन्ही पदार्थ पूरक असत. आपल्या घरातील व्यक्तींना आपल्या शरीराची इतकी चांगली समज होती, की जेंव्हा एखादी विशिष्ट प्रकारची भाजी बनवताना एका ठराविक प्रकारचाच रस्सा त्यासोबत बनवला जाता असे. एका प्रकारची भाजी बनविल्यावर, दुसर्या प्रकारची भाजी बनवली जात नसे, कारण परंपरेने त्यांना हे माहिती होते की ही आणि ती गोष्ट एकत्र केली तर शरीर गोंधळून जाईल.
आम्ही लहान असताना –आम्ही जर बाजारात गेलो, तर भाजी कशी निवडावी हे आम्हाला शिकवले जात असे. सध्या असे काही आढळून येत नाही, पण मी लहान असताना मात्र आम्हाला हे शिकवले जात असे –आम्ही जेंव्हा बाजारात जात असू, “आपण जर ही भाजी विकत घेतली, तर त्यासोबत ती भाजी विकत घेऊ नये कारण या दोन भाज्या दोन दिवसांच्या अवधीत पाठोपाठ खाल्ल्या जाऊ शकत नाहीत. आपण जर ही भाजी खाल्ली असेल, तर आपण ती भाजी खाऊ नये,”कारण शरीर गोंधळून जाईल. एकदा आपले शरीर गोंधळून गेले, की आपण सैरभैर होऊन जाऊ. ही समज त्यांच्यात नेहेमीच होती.
मी आज असे पाहतो आहे, की आपण एखाद्या श्रीमंत भोजनाला गेलो, तर तो एक वेडेपणा झालेला आहे. नुकतेच एका कार्यक्रमात कोणीतरी खूप अभिमानाने जाहीर करत होते की त्याच्या भोजनात खाण्यापिण्याचे 270 विविध पदार्थ होते. लोकं प्रत्येक पदार्थ थोडा थोडा घेतात आणि खातात. या प्रकारच्या भोजनाने शरीर पार गोंधळून जाते.
तर या दोन प्रमुख गोष्टी आहेत – लोकं व्यवस्थितपणे खात नाहीत आणि इतर शरीरांसोबत निकट संबंध ठेवण्याची स्वैर बुद्धी – ज्यामुळे शारीरिक पातळीवर काहीसा संभ्रम, गोंधळ निर्माण होतो ज्याचा नकारात्मक परिणाम काही काळानंतर जाणवू लागतो. “तर मग मी पाप केले आहे का? मला ही शिक्षा भोगावी लागत आहे का? नाही. हे या पातळीवर नाहीये. प्रत्येक कृतीचे परिणाम भोगायलाच लागतात. हे नैतिक
नाही, तर ती अस्तित्वाची एक निश्चित अशी प्रक्रिया आहे. तुम्ही तुमच्या मनाने काही विशिष्ट गोष्टी केल्या, तर त्याचे काही निश्चित परिणाम होतील. तुम्ही जर आपल्या शरीराने काही विशिष्ट गोष्टी केल्या, तर त्याचे काही निश्चित परिणाम घडून येतील.
भारतीय संस्कृतीत या गोष्टी सखोलपणे जाणून घेऊन त्याभोवती आपल्या जीवनाची मांडणी एका निश्चित स्वरूपाने केली गेली होती. सध्या स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्याला प्रत्येक गोष्ट नष्ट करायची आहे आणि यातना भोगायच्या आहेत. जीवन जगण्याचा हा काही शहाणपणाचा मार्ग नाही हे कदाचित काही शतकांनंतर आपल्या लक्षात येईल.