सद्गगुरु: मी अगदी छोटा असल्यापासून माझ्या मनात पर्वत शिखराची प्रतिमा उमटलेली होती. डोळे उघडे असोत किंवा डोळे मिटलेले असोत, ती सदैव तेथे असे. मी सोळा वर्षांचा होईपर्यंत मला असे वाटत असे, की प्रत्येकाच्याच डोळ्यात पर्वत शिखराची प्रतिमा असते. जेंव्हा मी सोळा वर्षांचा झाल्यावर या विषयावर मी माझ्या काही मित्रांशी बोललो, तेंव्हा त्यांनी मला वेड्यातच काढले. तेंव्हापासून मला दिसत असलेल्या त्या विशिष्ट पर्वत शिखराचा माझा शोध सुरू झाला.

मी काही पर्वतांचा चाहता नाही, मी तर पर्वतांचा गुलाम आहे. त्यांच्याशिवाय मी जगणं अशक्य आहे.

मी पश्चिम घाटाच्या शेवटाला असलेल्या कर्नाटक आणि केरळ मधील पर्वत रांगांमध्ये कित्येकदा ट्रेकिंग केले. त्यानंतर, मी कारवारपासून कन्याकुमारीपर्यन्त अकरा वेळा मोटरसायकलवरुन भ्रमंती केली आणि शक्य असलेली सर्व शिखरे पाहिली. जेंव्हा मला ते सापडले नाही, तेंव्हा एकोणीस वर्षांचा असल्यापासून मी हिमालयात यायला सुरुवात केली. पण ज्या क्षणी मी हे पर्वत बघितले, तेंव्हाच माझ्या लक्षात आले, की मी ज्या शिखराचा शोध घेतो आहे, ते या ठिकाणी नाहीये, कारण मी पाहत असलेल्याचे स्वरूप वेगळे होते. 

त्यानंतर कितीतरी वर्षानी मी पहिल्यांदाच दक्षिण भारतातील पर्वत पाहिला जो तंतोतंत जुळला, आणि आज त्याच ठिकाणी इशा योग केंद्र उभे आहे. तर, मी काही पर्वतांचा चाहता नाही, मी तर पर्वतांचा गुलाम आहे. त्यांच्याशिवाय मी जगणं अशक्य आहे. 

 

रस्कीन बॉन्ड: हो, आपण दोघेही पर्वताचे गुलाम आहोत. जेंव्हा जेंव्हा मी दुसरीकडे जातो, एका आठवड्यासाठी जरी मी दुसरीकडे गेलो, तरी मला त्यांची ओढ जाणवते. मला नेहेमीच परत यावेसे वाटते कारण एकदा का पर्वत तुमच्या रक्तात भिनले, तर ते परत कधीही बाहेर येत नाहीत. 

 

घरी माझ्या पतवंडांना माझ्यापेक्षा कितीतरी अगोदर सद्गुगुरूंविषयी माहिती होती. मला वाटले, की ह्या दोन मुलांना अध्यात्माची काही विशेष ओढ नाहीये,  तर त्यांच्यामध्ये असे काय आहे, ज्यामुळे ही मुले तुमच्याकडे आकर्षित झाली असावीत? आणि मग ते म्हणाले, “ते मोटरसायकल चालवतात.” आपण आम्हाला तुमच्या मोटरसायकलच्या दिवसांविषयी काही सांगू शकाल का.

सद्गगुरु: काही काळापूर्वी, कोणीतरी मला सांगितले की एक झेक मोटरसायकल, जावा पुन्हा भारतात येणार आहे. एके काळी, इतर कोणीही वापरली नसेल इतकी मी जावा मोटरसायकल वापरलेली आहे. प्रत्येक वर्षी मी साधारणतः 55 ते 60,000 किलोमीटर्स प्रवास करीत असे. जवळ जवळ सात वर्षे मी अक्षरशः मोटरसायकलवरच आयुष्य घालवलेले आहे. 

एका ठराविक ठिकाण मनात ठरवून न जाता, असंच संपूर्ण भारत भ्रमण केले आहे. मला फक्त त्या त्या ठिकाणचा नैसर्गिक भू-प्रदेश पाहायला आवडत असे. माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट चित्रस्वरुपात धावते – मी कधीही शब्दात विचार करायला शिकलो नाही. मी इतका अडाणी आहे! म्हणून मला फक्त प्राकृतिक भू-प्रदेश पाहायला, आणि निसर्गाची प्रत्येक छटा पाहायला आवडत असे.

काही वर्षांपूर्वी मी हिमालयाच्या या भागात पुन्हा एकदा आलो, आणि मी वाहन चालवत होतो. कोणीतरी मला एक खूप वेगवान कार दिली, आणि मी त्या डोंगररांगांमधून तशी 150, 160 किलोमीटरच्या वेगाने प्रवास करीत होतो. लोकं म्हणाली, “सद्गगुरु, तुम्ही मृत्यूला निमंत्रण देत आहात.” मी त्यांना सांगितले, “या रस्त्यावरील प्रत्येक वळण माझ्या मनात कोरलेले आहे.” ह्या रस्त्यावर मी अक्षरशः माझे डोळे बंद करून वाहन चालवू शकतो.

हे प्रवास कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात समृद्ध भाग आहेत, कारण मी कुठल्याही ठराविक उद्देश्याविना प्रवास करीत होतो. मी जे काही वाचन केलेले आहे, ते सुद्धा कोणत्याही उद्देशाविना केलेले आहे. मी मोठा होत असताना, माझी आवडती पुस्तके खरेदी करण्यासाठी  मी माझी अभ्यासाची पुस्तके विकलेली आहेत, आणि परीक्षा जवळ येईपर्यंत मी कधीही अभ्यासाची पुस्तके घेतलेली नाहीत! या ठिकाणी इतकी मुले उपस्थित असताना हे गोष्ट सांगणे चुकीचे आहे!

रस्कीन बॉन्ड: हो, जेंव्हा मी डेहराडूनमध्ये लहानाचा मोठा होत होतो, तेंव्हा सायकलींचे युग होते. प्रत्येक तरुण आणि लहान मुलाकडे सायकल होती. तुम्हाला तेंव्हा अगदी थोडक्या कार्स पाहायला मिळायच्या, आणि फार मोटरसायकली सुद्धा नव्हत्या. आम्ही सर्व जण सायकलवरुनच फिरायचो. पण मी कायम सायकलवरून खाली पडायचो, ज्यामुळे मी जास्त चालायला सुरुवात केली. मी पूर्ण गावभर पायी फिरत असे, आणि मला प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक गल्ली माहिती होती. त्यामुळे, लोकं मला “रोड इन्स्पेक्टर” म्हणायचे. ते सायकलींचे दिवस होते.

आजकाल तुम्हाला आजूबाजूला फारशा सायकली दिसत नाहीत. आजची मुले तंत्रज्ञानाच्या युगात मोठी होत आहेत, ज्यामध्ये लक्ष विचलित करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. लोकं म्हणतात, मुले वाचन करीत नाहीत, पण मी कित्येक तरुण मुलांना भेटतो, जी वाचन करतात, आणि कित्येक तरुण मुले तर लिखाण सुद्धा करतात.  

सद्गगुरु:  तंत्रज्ञान ही काही वाईट गोष्ट नाही. दुर्दैवाने, लोक असे बोलत असतात, की जणू काही तंत्रज्ञान आपले आयुष्य उध्वस्त करीत आहे. केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर कोणत्याही गोष्टीचा बेजबाबदार वापर आपले आयुष्य उध्वस्त करेल. तुमच्या आणि माझ्या काळात, आपण मुले म्हणून शारीरिकदृष्ट्या कितीतरी अधिक सक्रिय होतो. आपण आपल्याला पाहिजे तितके अन्न पचवु शकत होतो, आणि तरीसुद्धा आपण कायमच कृश असायचो. वाढत्या वयातल्या मुलाचे किंवा मुलीचे वजन अतिरिक्त वाढण्याची संधीच नव्हती कारण काही ना काही उपक्रम सतत सुरूच असायचे.

मला असे वाटते, आजच्या मुलांच्या वाढीतील हरवलेला दुवा म्हणजे त्यांचा आपल्या आजूबाजूच्या जीवनाशी काही संपर्कच राहिलेला नाहीये – झाडे झुडपे, पशुपक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, इतर अनेक प्रकारचे जीवन. संपर्कच उरलेला नाहीये. फक्त स्वतःबद्दल विचार करूनच मोठे होत जाणे ही काही मानवासाठी चांगली गोष्ट नाही.

 

दुर्दैवाने, धार्मिक विचारांच्या माध्यमातून लोकांच्या मनात असे बिंबवण्यात आलेले आहे, की मानव म्हणजे देवाचीच प्रतिमा असून, इतर सर्व जीव या भूमीवर फक्त आपल्या सेवेसाठीच जन्माला आलेले आहेत. सर्व मानवी मनामध्ये असलेली ही एक सर्वाधिक विनाशकारी कल्पना आहे.

मी जंगलात कितीतरी काळ व्यतीत केलेला आहे, काही वेळेस आठवड्याच्या अखेरीस, फक्त मी एकटाच, बाहेरील कोणत्याही मदतीशिवाय राहिलेलो आहे. प्रत्येक जीव – मुंग्या, कीटक, प्राणी, पक्षी – प्रत्येकाला त्यांचे स्वतःचे परिपूर्ण जीवन आहे. परंतु ते आपण मानवाविषयी काय विचार करत असतील, ते मात्र मला माहित नाही.

रस्कीन बॉन्ड: हो, मला असे वाटते कदाचित;  हल्ली लहान मुलांना आजूबाजूला पुरेसे खुले अवकाशच मिळत नाही. 

सद्गगुरु: इतर कोणत्या जीवांसोबत काहीही संपर्कच नाही, निसर्गाशी काहीही संपर्क नाही. जो काही आहे तो एक वरवरचा संपर्क आहे. मुलांची निसर्गाशी ओळख करून देण्यासाठी शाळांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हे काही पर्यावरणीय जाणिवेबद्दल नाहीये. तुमच्यातील माणुसकी उभारून येण्यासाठी, तुम्ही इतर सर्व जीवांकडे ते सुद्धा एक आपल्यासारखेच जीवन म्हणून पाहणे, आणि त्यांनासुद्धा या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे हे स्वीकारणे खूप महत्वाचे आहे. ते आपल्यापेक्षा किती तरी अगोदर काळापासून इथे आहेत!