गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं, पती-पत्नीचं नातं का इतकं किचकट होतं?
नातेसंबंध नक्कीच आपल्या आयुष्यात गोडवा आणतात, पण ते कटुता सुद्धा निर्माण करू शकतात. मौनी रॉय सदगुरुंना विचारतीये नाते संबंध का कडवट बनतात.
मौनी रॉय: माझा प्रश्न आहे, की कोणतंही नातं, एका ठराविक वेळेनंतर इतकं गुंतागुंतीची का बनतं? हे गर्लफ्रेंड्स मधलं असो , बॉयफ्रेंड्स मधलं असो, विशेषकरून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा पती-पत्नी मधलं?
सदगुरू: नमस्कार मौनी. तर तुला नात्यांमधली आबंट चव जाणवायला लागलीये. अर्थातच, सगळ्यांनीच प्रेमसंबंधांमधला गोडवा चाखलेला असतो, पण त्यात पुष्कळ आंबटपणाही असतो. दुर्दैवानं आज आपण ही पाश्चात्य कल्पना अंगिकारलीये की जर तुम्ही ‘रिलेशनशिप’ हा शब्द उच्चारला, तर लोक अनेकदा शाररीक नात्याचा विचार करतात, किंवा हे स्त्री-पुरुषाचंच नातं असलं पाहिजे किंवा असं काहीतरी, पण मुळात शररीक नातं. नाही, नातेसंबंध अनेक प्रकारचे असू शकतात.
जर नाती फक्त शाररीक असतील, तर एकमेकांच्या शरीराबद्दलचा उत्साह काही वेळानंतर मावळेल. जे तुम्हाला सर्वस्व वाटलं होता, काही काळानंतर ते तसं वाटणार नाही. तर तुम्ही याला कंटाळणं स्वाभाविक आहे कारण यामधलं जे मुख्य आकर्षण होतं, ज्यानं ते एकत्र आले होते, जेव्हा ते हळूहळू विरू लागतं, नकळतपणे, एकमेकांप्रती कटूभाव निर्माण होऊ लागतो. कारण, मुळात हे नातं दुसऱ्या माणसातून स्वतःसाठी गोडवा मिळवण्याबद्दल होतं, आनंद मिळवण्याबद्दल होतं. जर तुम्ही तुमचा आनंद दुसऱ्या कुणातून पिळून काढायचा प्रयत्न केला, आणि काही वेळा नंतर सुरवातीला मिळत होता तसा अपेक्षित परिणाम मिळणं बंद झालं, की त्यात कटुता येऊ लागेल.
हे महत्वाच आहे. जेव्हा तुम्ही तरूण असता, तेव्हा काही गोष्टी घडतील. जसं तुमचं वय वाढत जाईल.. जेव्हा मी वयस्कर म्हणतो म्हणजे कालपासून आजच्या दिवसापर्यंत, तुम्ही किंचित वयस्कर झाला आहात. मी एवढंच म्हणतोय की कालपेक्षा आज तुम्ही अधिक वयस्कर आहात. तर आज, तुम्ही असा विचार केला पाहिजे, जीवनातल्या सर्वच नात्यांबद्दल – फक्त शारीरीक नाती नव्हे – तुमच्या जीवनातलं कुठलंही नातं; एक आनंदाची अभिव्यक्ती झालं पाहिजे, आनंद मिळवण्यासाठी नाही.
यासाठी, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या सहज स्वभावानं आनंदी झालं पाहिजे. जर तुम्ही यावर केंद्रित असाल, की तुम्ही स्वतः एक आनंदाचा ओसंडून झरा असाल, आणि तुमची नाती, हा आनंद इतरांसोबत वाटण्याबद्दल असली, तर तुम्हाला, लोकांना नाती सांभाळण्यासाठी करावी लागणारी सर्कस करावी लागणार नाही.
संबंधांना हाताळण्याची कला
नातेसंबध जोपासणं म्हणजे, दैनंदिन जीवनात एखादं नातं हे अनेकदा आयुष्याच्या एका क्षेत्रापुरता मर्यादित रहात नाही. एकदा दोन व्यक्ती एकत्र आल्या, की अनेक गोष्टींची देवाणघेवाण होते. साहजिकच, तुमचा चुकून एकमेकांच्या पायावर पाय पडू शकतो, अनेक लहानसहन गोष्टींसाठी. आणि यामुळे, अनेक वादविवाद, किंवा भांडण म्हणूया, हे होऊ लागतं.
हे रोजच सुरळीतपणे निभावता येत नाही. लोकांना वाटतं हे शक्य आहे पण काहीवेळानं तुम्ही बघाल हे अवघड आहे. तर, उत्तम गोष्ट म्हणजे, तुम्ही स्वतःला अश्या प्रकारे घडवलं पाहिजे, की तुम्ही साहजिकच एक उत्साही आणि आनंदी जीव आहात.
हे जर घडलं, तर तुमची नाती छान राहतील. आणि ती तुमच्या गरजांवर आधारलेली नसतील. जेव्हा नाती ही गरजांवर आधारलेली असतात, तेव्हा तुमच्या गरजा पूर्ण झाल्या नाही, की तुम्ही कुरकुर करू लागाल. तुम्ही तक्रार करू लागाल आणि दुःखी व्हाल, की तुम्हाला जे मिळायला पाहिजे, ते मिळत नाहीये. जर तुम्ही ही गरज तुमच्यामधून काढून टाकलीत, आणि स्वभावतः तुमच्यातून आनंद ओसंडून वाहत असेल, जर ही एक गोष्ट तुम्ही केली, तर तुम्ही उत्तम नातं जोडू शकाल कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीबरोबर. ते कोण आहे यानं काही फरक पडत नाही. ते तुमच्यासारखे असण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या लोकांबरोबर तुम्ही उत्तम नातं जोडू शकता. तुमच्या जीवनातली नाती अगदी सुंदर असो, हा माझा आशीर्वाद आहे.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.