महाभारत भाग 5: शंतनु गंगेला भेटतो
गेल्या आठवड्यात, आपण पाहिले की शकुंतला दुष्यंतला कशी भेटली आणि भरताचा जन्म झाला. या कथेत, सद्गुरू महाभारताची कहाणी पुढे सांगतायत, आणि भरताच्या विवेकबुद्धीबद्दल आणि त्याचे वंशज शंतनु गंगेला कसे भेटतात याबद्दल सांगतात.
त्याला विधाता नावाचा एक मुलगा सापडला, जो बृहस्पतीच्या भावाची पत्नी ममतेच्या पोटी जन्माला होता. बृहस्पतींनी, काही क्षणांसाठी, परिणामांचा विचार न करता, ममतेवर स्वत: ला लादले आणि विधताचा जन्म झाला. भरताने या मुलाला राजा म्हणून निवडले. विधाता एक महान राजा झाला आणि त्याने आपल्या आयुष्यभर मोठ्या विवेकबुद्धीने आणि संतुलनाने राज्य केले. विधात्याच्या नंतर, चौदा पिढ्यानी शंतनु येतो, आणि आता आपण कथेकडे वळतोय!
शंतनु हे पांडव आणि कौरवांचे खापर पणजोबा होते. त्याच्या आधीच्या जन्मात शंतनु महाभिषेक म्हणून ओळखला जात असे. त्याने संपूर्ण आयुष्य जगल्यावर देवलोकामध्ये प्रवेश केला. जेव्हा गंगा देवी भेटण्यासाठी आली होती तेव्हा तो इंद्राच्या दरबारात बसला होता. असं झालं की नकळत एक क्षणी तिचे वस्त्र खाली पडले आणि तिच्या अंगाचा वरचा भाग उघडा पडला. त्यावेळेस योग्य वागणूक म्हणून प्रत्येकाने नजर दुसरीकडे वळवली. देवलोकात नवीन असलेला महाभिषेक तिच्याकडे टक लावून पाहत राहिला. जेव्हा हे अयोग्य वर्तन इंद्राच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, “तू देवलोकात असण्यास अयोग्य आहेस. परत जा आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला ये. ” मग इंद्राच्या लक्षात आले की गंगा ह्याचा आनंद घेत आहे. त्यावर तो म्हणाला, “हे पूर्णपणे अयोग्य आहे. तुला हे आवडत आहे असे भासत आहे. तुही परत जा आणि माणूस म्हणून जन्म घे. माणसाच्या सर्व वेदना आणि सुख अनुभव. जेव्हा तुम्ही या अभिमानापासून मुक्त व्हाल तेव्हा तुम्ही परत येऊ शकता. ”
तर, शंतनु गंगेला भेटणार आहे, परंतु त्याला त्याची जाणीव नाही कारण त्याच्याकडे मागील जन्माच्या आठवणी नाहीत. पण गंगेकडे तिच्या आठवणी कायम होत्या आणि ती शंतनुला तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. पण राजा असल्याने तो सर्वत्र भटकत होता. शंतनू एक चांगला शिकारी होता आणि जेव्हा तो शिकार करत असे, तेव्हा तो त्यात इतका मग्न होऊन जातं असे, जशी त्याच्यासाठी शिकार करणे ही त्याची उपासनाच होती.
एकदा, सलग काही आठवड्यांसाठी, तो गंगा किनारी शिकार करायला निघाला होता परंतु तो आपल्या शिकारीमध्ये इतका मग्न झाला होता की त्याने नदीकडे लक्ष दिले नाही. राजा असल्यामुळे, जेव्हा जेव्हा त्याला तहान किंवा भूक लागली तेव्हा त्याचे सेवक नेहमीच त्याच्या आजूबाजूला असत. पण एक दिवस, त्याला खूपच तहान लागली होती आणि त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. मग, त्याला नदी दिसली आणि तो तेथे आला. त्या क्षणी, गंगा नदीतून एक स्त्रीच्या रुपात प्रकट झाली, आणि जेव्हा त्याची नजर तिच्यावर पडली, तेव्हा तो पूर्णपणे तिच्या प्रेमात पडला. शंतनुने तिला लग्न करण्यासाठी विनवणी केली. गंगेने सहमती दिली, परंतु तिने एक अट ठेवली की, “मी तुझ्याशी लग्न करीन, परंतु मी काहीही केले तरी तू मला मी असे का करीत आहे असे विचारायचे नाही."
इतिहासात स्त्रियांनी अश्या अटी ठेवल्याचे अनेक दाखले आहेत. कुरूंचा पहिला पुरू, अप्सरा (एक स्वर्गीय व्यक्ती) उर्वशी हिच्या प्रेमात पडला आणि जेव्हा त्याने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा ती म्हणाली, “माझ्या दोन अटी आहेत. पहिली अट अशी आहे की माझ्याकडे काही पाळीव शेळया आहेत. तुला नेहमी हे पाहिलेच पाहिजे की या शेळ्या सुरक्षित आहेत, काहीही झाले तरीही. जर तुला तुझी संपूर्ण सेना वापरावी लागली तरी तु माझ्या शेळ्यांचे रक्षण केले पाहिजे. दुसरी अट अशी आहे की, कोणीही कधीही तुला नग्न अवस्थेत पाहू नये.”
एकदा असे घडले की देवांना उर्वशीला परत आणायचे होते म्हणून उर्वशी आणि पुरू शय्येवर असताना त्यांनी येऊन शेळ्या चोरुन नेल्या. तेव्हा ती ओरडली, “माझी शेळी, कोणीतरी त्यांना घेऊन जात आहे!” पुरु उठून चोरांना पकडण्यासाठी धावत गेला. इंद्राने संधी साधून वीजा चमकवल्या. संपूर्ण परिसर प्रकाशित झाला आणि पुरू नग्न अवस्थेत सर्वांना दिसला. उर्वशी ताबडतोब म्हणाली, “तु अटी मोडल्या. मी जातेय." आणि कधीही न परतण्यासाठी ती निघाली.
काळाच्या ओघात, काही गोष्टी बदलत असल्यामुळे, स्त्री पुरुषासमोर वाजवी किंवा अवास्तव अटी ठेवण्याची क्षमता गमावते. आपण महाभारताच्या कथेमध्येच हे पाहू शकता की समाज हळूहळू कसा मातृसत्ताकपासून पितृसत्ताकमध्ये बदलत गेला.
कथेकडे परत जाऊया, शंतनु गंगेच्या प्रेमात इतका वेडा होता की तिने जे काही मागितले त्याने ते मान्य केले. म्हणून गंगा त्याची अत्यंत सुंदर आणि आश्चर्यकारक पत्नी बनली. आणि मग ती गरोदर राहिली.
पुढील भागात...