कर्मावर प्रभूत्व कसे मिळवावे
बर्याच काळापासून वापरल्या जाणार्या आणि वेगवेगळ्या प्रकारे गैरवापर झालेल्या 'कर्म' या शब्दाचा अर्थ सद्गुरू समजावून सांगतात. त्याचा प्रभाव किती खोलवर आहे हे सांगण्याबरोबरच ते या गुंतागुंतीच्या रचनेवर प्रभूत्त्व कसे मिळवले जाऊ शकते याचा मार्गही दाखवतात.
सध्या शास्त्रज्ञ एपिजेनेटिक्सवर काम करीत आहेत, जी जीवशास्त्राची एक शाखा आहे ज्यात मनुष्याच्या वागणुकीचा आणि जीवनातील अनुभवांचा त्यांच्या डीएनएवर कसा परिणाम होतो आणि ते एका पिढीकडून दुसर्या पिढीपर्यंत कसे जाते याचा अभ्यास केला जातो. पण, योगिक दृष्टीकोनातून भूतकाळाचा प्रभाव आपल्या पूर्वजांच्या कितीतरी आधीपासून, अगदी पृथ्वीवरील पहिल्या जीवापासून सुरू होतो. या लेखात, सद्गुरू कर्माचा अर्थ स्पष्ट करतात जो शब्द बर्याच काळापासून वापरला जात आहे आणि त्याचा वेगवेगळ्या संदर्भात चुकीचा वापर केला जातो. त्याचा प्रभाव किती खोलवर आहे हे सांगण्याबरोबरच ते या गुंतागुंतीच्या रचनेवर प्रभूत्त्व कसे मिळवले जाऊ शकते याचा मार्ग दाखवतात.
सद्गुरु: कर्म म्हणजे कृती किंवा कृतीची छाप जी आपल्या आत बाकी राहते. तुमच्या वडिलांनी ज्या कृती केल्या त्या केवळ तुमच्या जीवनाच्या परिस्थितींमध्ये नाही तर तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये कार्यरत आणि जिवंत आहेत. तुमच्या पालकांपासून मुक्त होणे इतके सोपे नाही! तुम्हाला हे लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही १८ किंवा २० वर्षांचे होता, तेव्हा तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांविरुद्ध बंड करता, पण जेव्हा तुम्ही ४० किंवा ४५ वर्षांचे होता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासारखेच बोलू लागता, त्यांच्यासारखेच वागू लागता आणि त्यांच्यासारखे दिसूही लागता. हा जगण्याचा एक अत्यंत व्यर्थ मार्ग आहे, कारण जर ही पिढीसुद्धा पूर्वीच्या पिढीप्रमाणेच वागत असेल, काम करत असेल, जगत असेल आणि जीवनाचा अनुभव घेत असेल तर ही पिढी व्यर्थ ठरेल. या पिढीने जीवनाचा अनुभव अशा प्रकारे घ्यायला हवा ज्याची मागच्या पिढीने कल्पनाही केली नव्हती. मला असे म्हणायचे नाही की तुम्ही रस्त्यावर जाऊन काहीतरी वेड्यासारखे करा. मी असे म्हणतोय की तुम्ही ज्या प्रकारे जीवन अनुभवता ते पूर्णपणे बदलू येते. जीवनाच्या अनुभवाला पुढच्या स्तरावर घेऊन जात येते.
मूळ वेदना
पण कर्म हे फक्त तुमचे, तुमच्या वडीलांचे किंवा तुमच्या आजोबांचेच नसते. या पृथ्वीवरील पहिल्या जीवाचे, त्या जीवाणू किंवा विषाणूचे, त्या एकपेशीय जीवाचे कर्मसुद्धा अजूनही तुमच्या आत कार्यरत आहे. अगदी तुमच्या शरीरात असलेला बॅक्टेरियासुद्धा, तुमच्या आईवडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या शरीरात कशा प्रकारचा बॅक्टेरिया होता, यानुसार वागत असतो. तर, स्वतःविषयी तुमच्या मनात ज्या काही भव्य कल्पना आहेत, तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या तुमच्या ज्या भल्या मोठ्या कल्पना आहेत, त्या सगळ्या साफ चुकीच्या आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगितले आहे की ही सगळी माया आहे, कारण तुमच्या आत अशा प्रकारे गोष्टी कार्यरत आहेत की तुम्ही करत असलेल्या सर्वच गोष्टी भूतकाळातल्या माहितीने नियंत्रित होत आहेत.
जर मी तुम्हाला म्हणालो, “तुम्हाला काही करण्याची गरज नाही, आम्ही तुमची काळजी घेऊ. तुम्ही फक्त दिवसभर एका जागेवर बसून बारा तास ध्यान करा.” तुम्हाला सुरवातीला हे एक मोठे वरदान वाटेल. पण, एका महिन्यानंतर तुम्ही वेडे व्हाल. जर तुम्ही त्या वेडेपणाच्या पलीकडे गेलात तर तुम्ही सर्व गोष्टींच्या पलीकडे जाल. पण जेव्हा हा वेडेपणा येऊ लागतो तेव्हा बहुतेक लोक हार मानतात. ते घाबरून जातात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात कारण ते काही सोपे नसते. तो तुमच्या वडिलांचा, आजोबांचा, पूर्वजांचा आणि त्या जिवाणूंचा मूळ आक्रोश आहे. सर्व कोट्यावधी जीव स्वत: ला व्यक्त करण्यासाठी आक्रोश करतील. त्यांना त्यांचे म्हणणे सांगावेसे वाटेल. ते तुम्हाला इतक्या सहजासहजी मुक्त होऊ देणार नाहीत. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण ते तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये धडधडत आहेत.
"याचा अर्थ असा आहे का, की मी पूर्णपणे अडकलो आहे आणि मी मुक्त होण्याची काही आशाच नाही?" होय! नक्कीच तुम्ही अडकले आहात, परंतु कोणतीही आशा नाही असे नाही. पशुपत असण्यापासून - जी पशु स्वभावाची संमिश्र अभिव्यक्ती आहे, एक पेशीय जीवापासून ते सर्वोच्च स्तरापर्यंत - एक ‘पशुपति’ होण्याची शक्यता आहे! ‘पशु’ म्हणजे त्यात सर्व जीव आले, आणि ‘पती’ म्हणजे स्वामी - सर्व जीवांचा स्वामी. हे सगळं मागे सोडून त्यापलीकडे जाता येऊ शकते.
प्रभूत्व मिळवा
हे समजून घेतले पाहिजे, की कर्म तुमचा शत्रू नाही. कोणती गोष्ट नेमकी काय आहे याविषयी जागरूक नसणे हा तुमचा शत्रू आहे. कर्म म्हणजे जीवनाची स्मृती. तुम्ही तुमचे शरीर आता आहे तसे बनवू शकला आहेत ते फक्त यामुळेच की जीवनाची स्मृती आहे. त्या एकपेशीय जीवापासून इतर प्रत्येक स्वरूपातल्या जीवाची स्मृती. तुम्ही तुमच्या शरीरात आत्ता अस्तित्वात असण्याचा आधार म्हणजे कर्म. जर तुमचे सर्व कर्म काढून घेण्यात आले, तर याच क्षणी तुम्ही तुमचे शरीर सोडून द्याल. हे म्हणजे तुमचा आधारच काढून घेण्यासारखे आहे. कर्म एक डिंक आहे. कर्माने तुम्हाला शरीरात प्रस्थापित केले आहे.
तुम्हाला तुमचे शरीर किंवा मन बदलण्याची आवश्यकता नाही, फक्त हँडल कुठे आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे. आत्ता, जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता, तेव्हा तुम्ही स्वत:ला सीटबेल्ट बांधता. सीटबेल्ट चांगली गोष्ट आहे, तो तुमचे जीवन वाचवू शकतो. पण, समजा तुम्ही सीटबेल्टने स्वत: ला अशा प्रकारे बांधले की तुम्हाला तो उघडायचा असेल तेव्हा तो उघडणार नाही, तर मग हा तुम्हाला तुरुंगवासाच झाला. जेव्हा तुम्ही कारमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्ही दार बंद करता. ही एक चांगली गोष्ट आहे. पण समजा, की तुम्ही कारमध्ये बसला आणि तुम्ही दरवाजा उघडू शकत नाही, ही एक भयंकर गोष्ट होईल. हँडल कोठे आहे हे तुम्हाला फक्त माहित असणे आवश्यक आहे. मग, जरी तुमच्याकडे कर्माचा डोंगर असला तरीही काही हरकत नाही.
समस्या ही कर्मामुळे नाही. समस्या ही तुम्ही त्यात अडकल्यामुळे आहे. तुम्ही त्याच्या जाळ्यात सापडले आहात. तुम्ही आणि तुमचे शरीर, तुम्ही आणि तुमचे मन. यांच्यात जर थोडे अंतर आले तर कर्म काहीही असू देत, त्याचा तुमच्यावर काहीही प्रभाव असणार नाही. तुम्ही अजूनही शरीरात असण्यासाठी आणि जगण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. अजूनही तुम्ही एक स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व जपू शकता, पण हे तुम्हाला बांधून ठेऊ शकत नाही, तर तो एक पुढे जाण्याचा मार्ग ठरतो.