निर्वाणाचा मार्ग – एक झेन कथा
निर्वाण किंवा परम मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधत असणारे अनेक आध्यात्मिक इच्छुक एका वर्तुळातच गोल फिरत राहतात. पण निर्वाणाचा मार्ग तुमच्या पायाखालीच असतो.
तो अनेक लोकांकडे गेला आणि त्याने त्यांना विचारले, “निर्वाणाचा मार्ग काय आहे?”
ज्यांनी हा प्रश्न ऐकला त्या प्रत्येकाने त्याला सांगितले की, "सर्व रस्ते बुद्धाच्या भूमीकडे जातात, परंतु तेथे एक रस्ता आहे जो थेट निर्वाणाचे दरवाजे उघडतो. केवळ त्या विशिष्ट झेन गुरूंना त्या रस्त्याबद्दल माहिती आहे. त्यांच्याकडे जा, ते तुला मार्गदर्शन करतील." आणि त्यांनी त्याला एका अतिशय प्रसिद्ध झेन गुरूंचे नाव सांगितले आणि त्याला त्यांच्या मठात जाण्यास सांगितले.
तरुणाने त्यांचा मठ गाठला आणि त्याने गुरुंच्या पायावर डोके टेकवले.
अतिशय नम्रतेने तो म्हणाला, “गुरुजी! मी तुम्हाला शरण गेलो आहे.कृपया मला मार्ग दाखवा.”
गुरुजी म्हणाले, “तो तर कुंपणाच्या भिंतीच्या अगदी बाहेरच आहे."
गुरुजींना आपला प्रश्न नीट समजला आहे की नाही असे वाटून शिष्य आश्चर्यचकित झाला.
तो म्हणाला, “गुरुजी, मी कुंपणाच्या भिंतीच्या बाहेरच्या मार्गाविषयी विचारत नाहीये. मला अंतिम मार्ग हवा आहे."
"अरे, तो रस्ता का? तो तोच रस्ता आहे जो राजधानीकडे जातो. तुला तो माहिती नाही?"
"तो रस्ता नाही, गुरुजी. मी ज्यांना विचारले त्या लोकांनी मला सांगितले की सर्व रस्ते बुद्धाच्या भूमीकडे जातात, परंतु तेथे एक रस्ता आहे जो थेट निर्वाणाच्या मार्गावर जातो. आणि ते म्हणाले की तुम्हाला हा मार्ग चांगला ठाऊक आहे. मला तो मार्ग कोठे आहे हे जाणून घ्यायचे आहे"
"अस्सं, तो मार्ग का? तो अगदी इथेच आहे,"गुरुजी शिष्य ज्या ठिकाणी उभा होता त्या दिशेकडे बोट दाखवून म्हणाले.
सद्गुरूंचे स्पष्टीकरणः
तुम्हाला निर्वाण गाठायचे असो, किंवा मुंबईला जायचे असो,त्याचा प्रवास कोठे सुरू होईल? आपण आत्ता जिथे आहात तिथूनच आपण प्रारंभ करू शकता. त्याऐवजी, मुक्तीचा मार्ग इतरत्र सुरू होईल अशी तुमची कल्पना असल्यास तुम्ही त्या भ्रमात स्वतःला हरवून बसाल. कोणत्याही प्रकारचा प्रवास, आपण आत्ता जिथे आहोत तिथूनच त्याची सुरुवात होऊ शकते.
हजारो वर्षांपासून या पृथ्वीवर असूनही मानव स्वतःमध्ये विकसित न झाल्याचे एकमेव कारण हे आहे की त्यांनी हा मुद्दा लक्षातच घेतला नाही. आज आपण त्याच प्रकारे रागावत आहोत, जसे गुहेत रहात असलेला आदिमानव रागावत होता. बाह्य परिस्थिती आणि शस्त्रे अधिक जटिल बनली आहेत, परंतु मूलभूत गोष्टी मात्र अगदी समान आहेत.
रागामुळे किती दुःख, कुरुपता आणि यातना होतात याची जाणीव असूनही या क्षुल्लक भावनांच्या पलीकडे कसे जायचे हे आम्हाला समजलेले नाही. आपण अशा स्थितीत का आहोत? फक्त हेच कारण आहे की आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून हलायला तयार नाही. तुम्ही ज्या जागेवर आहात त्यापासून एक इंचही न हलता तुम्ही मुक्तीची मागणी केली तर तुम्हाला ती कशी मिळेल? आपण आता कुठे उभे आहोत हे न पाहता, जर आपण पुढच्या रस्त्यावरून जायचे ठरवले तर प्रवासच होणार नाही. आपण आपल्या काल्पनिक जगाच्या वर्तुळामध्ये गोल फिरत रहाल.
आपण आत्ता जिथे आहोत तेथून पुढचे पाऊल उचलले तरच, अजून पुढची पायरी,आणखी एक पुढची पायरी,तरच प्रवास घडू शकतो.
झेन गुरु त्या तरुणाला फक्त हेच सूचित करत होते.