प्रश्नकर्ता: माझ्या कुटुंबाने एकामागून एक गंभीर आपत्तींचा जणू प्रवाहच पाहिला आहे. तर जे लोक फक्त दुःखच भोगत असतात त्यांची आपण कशी मदत करू शकतो?

सद्गुरू: मी सांगतो ते कदाचित सहानुभूतीपूर्ण वाटणार नाही. पण तुम्हाला सांत्वन हवे की उपाय, हे आपण समजून याची निवड केली पाहिजे. जर उपाय हवा असेल, तर त्याचा एक मार्ग आहे. जर सांत्वन हवे असेल, तर मी तुम्हाला बरं वाटेल अश्या काही गोड गोष्टी सांगू शकतो, पण तो काही उपाय नव्हे. गोड गोड बोलून थोडा वेळ बरं वाटेल, आणि पुढच्याच क्षणी प्रश्न पुन्हा तसाच राहील. तुम्हाला जर उपाय हवा असेल, तर तुम्ही हे समजून घ्यायला हवं की तुमचे जीवनाचं दु:ख भोगत नाही आहात. दुःख म्हणून जे काही तुम्ही भोगत आहात, खरं पाहता तुम्ही फक्त तुमच्या स्मृतीच भोगत आहात.

दु:ख हे संपूर्णपणे आपण स्वत: निर्माण केलेलं असतं. इतर लोक अवघड, किचकट परिस्थिती निर्माण करू शकतात; पण ते तुम्हाला किंवा मला दु:ख भोगायला लावू शकत नाहीत.

तुमच्या आठवणी दोन ठिकाणी अस्तित्वात असतात – एक ठिकाण म्हणजे तुमचे शरीर आणि दुसरं तुमचं मन. ह्या दोन्ही साठवणुकी तुम्ही वर्षानुवर्षे, आजपर्यंत जमा केलेले स्मृतींचे साठे आहेत. हे जणू आपण परिधान केलेल्या वेशभूषेसारखे आहे... आज मी जरा ढिले कपडे घातले आहेत, म्हणून त्यांची मला सतत जाणीव आहे. समजा मी जर खूप घट्ट, नायलॉन कपडे घातले, तर काही वेळाने मला माझे कपडे कुठले आणि माझी त्वचा कुठली हे कळणार नाही. तुमच्या बाबतीत असेच घडले आहे – तुम्ही कोण आहात, तुमचं शरीर कुठं आहे आणि तुमचं मन कुठं आहे हेच तुम्हाला कळेनासं झालं आहे – सर्वकाही जणू एकत्र तुम्हीच झाला आहात, कारण ते तुम्ही फार घट्टपणे घातलं आहे. जर तुम्ही ईशा क्रिया केली असेल तर हे तुमच्या लक्षात आले असेल की, “मी शरीर नाही; मी मनही नाही”. जर तुम्ही इथे बसलात, तर तुम्ही आणि तुमचं शरीर, तसेच तुम्ही आणि तुमचं मन यात थोडं अंतर निर्माण होतं – आणि हे अंतर म्हणजेच तुमच्या दु:खाचा अंत आहे.

तुम्हाला दोनच प्रकारची दुःख आहेत – शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख. जर तुम्ही आणि तुमचं मन यात थोडं अंतर ठेवू शकलात, तर इथेच तुमच्या दुःखाचा अंत होतो. तुमचं हे मन म्हणजे एक प्रचंड मोठी शक्यता आहे पण बहुतेक माणसं, त्याचा दुःख निर्मितीचं यंत्र म्हणूनच वापरतायत. आजही मी हे पाहतो की, कुठल्याही कारणांमुळे असेना का, दुःख फार लोकप्रिय आहे! जेव्हा कोणीतरी त्यांच्या दु:खाबद्दल बोलतात लोक टाळ्या वाजवतात, जेव्हा कोणीतरी त्यांच्या आनंदाबद्दल बोलतात, लोक त्यांच्यावर हसतात.

https://youtu.be/sgJod3n9Yko

तुम्ही लहान मुल असताना सुद्धा हे असं घडलं असेल. तुमचे पालक नकळतपणे तुमच्या बाबतीत हे करत होते. आणि कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांबरोबर हे करत असाल. जर मुले आनंदाने उड्या मारत आणि ओरडत असतील तर तुम्ही त्यांना गप्प व्हायला सांगता. पण जर ते कोपर्‍यात जाऊन गप्प बसले तर तुम्ही काय झाले म्हणून विचारता. तेव्हा पासून ते शिकतात की दुःखी होण्यात फायदे आहेत. पण जे काही फायदे मिळत असले तरी, तुम्ही दुःखी असाल तर त्याचा काय उपयोग? या उलट, जर तुम्ही आनंदी आहात आणि अगदी काहीही नाही मिळाले – तरी काय बिघडलं?

म्हणून तुमच्या दुःखाला कुरवाळत बसू नका – ती काही अदभूत गोष्ट नाही. आणि तुम्ही ते स्वतःलाच करत आहात. ह्या क्षणी तुम्ही आनंदी आहात की दुःखी हे पूर्णतः तुमची निवड आहे. लोक फक्त बाह्य परिस्थिती प्रिय किंवा अप्रिय करू शकतात, पण ते केवळ बाहेरून. पण त्याचं दुःख होऊ द्यावं की नाही हे पूर्णतः तुमचीच करणी आहे. इतर लोक अवघड परिस्थिती निर्माण करू शकतात; पण ते तुम्हाला किंवा मला दुःखी करू शकत नाहीत.

इतर कुणी तुम्हाला पिडीत करत नाहीये, तुम्ही स्वतःच तुम्हाला पिडा देत आहात.

दुःख ही तुमची निवड आहे. तुम्ही “बुद्ध” हा शब्द ऐकला आहेत. तुमच्यातील बहुतेक लोकांना गौतमबुद्ध डोक्यात येईल.पण गौतमच केवळ बुद्ध नाही. त्यांच्या आधी हजारो बुद्ध होऊन गेले आणि त्याच्या नंतरही हजारो झाले आणि अजूनही आहेत आणि होतील. “बुद्ध” याचा अर्थ असा आहे - बु म्हणजे बुद्धी, “ध” म्हणजे “जो वर आहे.” जो बुद्धीच्या वर आहे तो बुद्ध आहे. जो त्याच्या बुद्धीतच अडकला आहे तो अविरत दु:खी माणूस आहे. काही घडले तर त्यांना दुःख होईल, काही नाही घडले तरी ते दुःखी होतील. त्यांना सगळ्याच गोष्टींपासून दुःख कसे मिळवायचे हे माहिती आहे. तुम्ही जर बुद्धीच्या खाली असाल तर तुम्ही इतके दुःखी असणार नाही.

इतर जीव तुमच्या इतके दुःख भोगत नाहीत. जर त्यांच्या शारीरिक गरजा भागल्या, तर ते मजेत असतात. पोट भरलेले असेल तर ते छान असतात. पण तुमचं तसं नाही – भूख लागली तर त्याचं एक प्रकारचं दुःख असतं, अपचन झालं त्याचं दुःख वेगळंच.कृपा करून तुमच्या दुःखाला रोमँटिक करू नका. इतर कुणी तुम्हाला पिडीत करत नाहीये, तुम्ही स्वतःच तुम्हाला पिडा देत आहात. हे तुम्हाला कदाचित सहानुभूतीपूर्ण वाटणार नाही. पण जर तुम्हाला उपाय हवा असेल, तुमच्या दुःखामागचे मूळ कारण तुम्ही आणि केवळ तुम्हीच आहात हे समजून घ्यायला हवे. इतर लोक केवळ तुमच्यासाठी अवघड, किचकट परिस्थिती निर्माण करू शकतात. ते काही बोलतील किंवा करतील. पण त्याचे दुःख होऊ द्यायचे की नाही, हे पूर्णतः तुमच्या हाती आहे.

समजा तुम्ही रस्त्याने जाताय आणि कोणीतरी तुम्हाला नावं ठेवली; समजा त्यांनी तुम्हाला मूर्ख म्हटलं. तुम्ही मनातल्या मनात उफाळून उठाल, “हा कोण गाढव आहे मला मूर्ख म्हणणारा. तो स्वतःच एक मोठ्ठा मूर्ख आहे. वगैरे...” आणि नंतर पहाटे 2 वाजता तुम्ही या कुशी वरून त्या कुशीवर होत तुम्हाला मूर्ख म्हणणाऱ्या त्या माणसाबद्दल विचार करता. तो माणूस एक शब्द म्हणून निघून गेला. अन तुमच्यावर केवढा मोठा आघात झाला. म्हणजे त्या माणसानं जे म्हटलं ते खरं असलं पाहिजे. अगदी कोणीही तुम्हाला दुःखी, कष्टी करू शकतो. आणि त्याच्यापैकी कोणीही जवळ नसेल तर तुम्ही आपणहोऊन स्वतःवर दुःख ओढून घेता. कृपा करून हे थांबवा. दुःखात रोमांचक, रोमँटिक, आकर्षक असे काही नाही. दुःखी आयुष्य जगणे जर तुम्हाला आवडत असेल तर खुशाल तसे जगा; पण मग तक्रार करू नका.

काही लोकांना प्रेमकथा, रोमँटिक सिनेमा आवडतात, काहींना विनोदी, काही लोकांना भयपट. तुम्हाला दुःख आवडत असेल आनंदाने दुःखी व्हा, तुम्ही त्याचा आनंद लुटला पाहिजे. लोक शेक्सपियरनी लिहिलेली शोकांतिका नाटकं बघायला जातात कारण त्यांना दुसऱ्या कोणाची दुःखं बघण्यात आनंद मिळतो. तुम्हाला जर तुमचे स्वतःचे दुःख आवडत असल्यास, त्याचा आनंद लुटा – ही निवड तुमची आहे, परंतु स्वतः दु:ख निर्माण करून असे समजू नका की इतर कुणीतरी त्याला जबाबदार आहे. आजच्या जगात, जर कोणी तुम्हाला शारीरिक त्रास, पिडा देत असेल, तर काय करायचे हे तुम्हाला माहिती आहे. कोणीतरी तुम्हाला मानसिक त्रास देत आहे असे समजू नका. तसे कोणीही करत नाहीये. लोक त्यांना जे चांगलं जमतं तेच ते करत आहेत. तुम्ही आपण होऊन स्वतःला दुःखाच्या खाईत लोटत आहात. समजा मला फक्त शिवीगाळ करण जमतं. मग मी येथे उभा राहून निरंतरपणे तुम्हाला शिवीगाळ करेन. म्हणजे त्या अपशब्दांची घाण माझ्या तोंडात आहे, तुमच्या मनात नाही.

तर, अकारण आपण पिडीत असल्याची भावना सोडून द्या. इतर कुणाने नाही तर, तुम्ही स्वतःच स्वतःला पिडीत करत आहात. ही पूर्णतः, तुम्हीच निर्माण केलेली, तुमची करणी आहे. जोपर्यंत तुम्ही हे स्पष्टपणे पाहू आणि समजून घेत नाही, तोवर यातून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. ही अगदी मुलभूत गोष्ट तुम्ही लक्ष्यात घ्यायला हवी. तुम्ही सध्या जे काही आहात आणि जे काही नाही आहात, ती पूर्णपणे तुमचीच जबाबदारी आहे. कृपया स्पष्टपणे, नीट समजून घ्या.