एक स्मरण         

स्वामी निश्चला: कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेच्या शेवटी असलेल्या  “चला हे घडवून आणूया” या विधानाने माझे लक्ष वेधून घेतले. ते मी सहा वर्षांपूर्वी कोइंबतुरमधे राहत असलेल्या घरमालकांनी ईशा उत्सवासाठी उपस्थित राहण्यासाठी पाठवलेले निमंत्रण होते. “याचा मी ज्यांच्यासोबत योगाचा कार्यक्रम केला त्या तेजस्वी ऋषीसारखे दिसणार्‍या योग शिक्षकाशी काही संबंध असू शकेल का?” मी विचार केला. कारण त्या निमंत्रणात असलेल्या शब्दांनी मला वर्गात लटकावलेल्या कागदाच्या फलकाची आठवण करून दिली ज्यावर लिहिले होते, “संपूर्ण प्रेमाने, प्रकाशाने आणि हास्याने भरलेले जग, याची वेळ आता आली आहे. चला हे घडवून आणूया.” मला “प्रेम, प्रकाश आणि हास्य” हे एकत्र आणण्याची कल्पना आवडली होती आणि म्हणून ते वाक्य माझ्या लक्षात होते. पुन्हा ते नजरेस पडल्यावर मी 1990 साली कोइंबतूरमधे पूर्ण केलेल्या त्या असामान्य ध्यान-योग वर्गाच्या स्मृती माझ्या मनात जागृत झाल्या. 

एखादी व्यक्ती एखाद्या  चाकराप्रमाणे सेवा करूनसुद्धा आतून एक उन्नत जीवन जगू शकते हे मला माहिती नव्हते.

माझ्यासाठी तो अगदी नवीनच अनुभव होता – मी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते असे मंद वाद्य संगीत, म्हैसुरचे योग शिक्षक सद्गुरु – ज्यांना बघून मला पंड्या राजघराण्याच्या काळातील संत मणीकगवचार यांची आठवण झाली – आणि दिक्षेच्या दिवशी सद्गुरुंसोबत सहभागी झालेले स्वयंसेवक. मला आठवते दिक्षेच्या दिवशी खेळाच्या कार्यक्रमात एकदा मी सद्गुरुंच्या अगदी समोर आलो होतो, खूप जवळ. त्यांच्या चेहेर्‍यावर असे तेज होते जे मी कधीही पाहिले नव्हते, आणि पुन्हा एकदा मला असे वाटले की हा काही कोणी सामान्य माणूस नाही– सद्गुरु पहिल्यांदा वर्गात आले होते तेंव्हा सुद्धा मला असेच वाटले होते.

आणखी एका गोष्टीमुळे मी भारावून गेलो ती म्हणजे स्वयंसेवक श्रीनिवासन यांनी दिक्षेच्या दिवशी सांगितलेली एक आठवण. “सद्गुरूंनी आम्हाला 30 देवतांची सेवा करायला सांगितले,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहात होते. ते आम्हाला, वर्गातील 30 सहभागी व्यक्तींना उद्देशून बोलत होते. त्या क्षणी माझ्या अंतर्मनात मूलभूत असे काहीतरी घडले. एखादी व्यक्ती एखाद्या  चाकराप्रमाणे सेवा करूनसुद्धा आतून एक उन्नत जीवन जगू शकते हे मला माहिती नव्हते. मला त्यावेळी स्वयंसेवेची संकल्पना सुद्धा माहिती नव्हती. सद्गुरुंसोबत झालेल्या साधकांच्या मेळाव्याच्या दिवशी सद्गुरु श्री. ब्रह्माच्या छायाचित्रात मला जाणवलेली तीव्रता, आणि संध्याकाळी उर्वरित वेळात मी कसा एक शब्दसुद्धा  बोलू शकलो नाही – याच्या स्मृती ती निमंत्रण पत्रिका पाहून माझ्या मनात पुन्हा उफाळून आल्या.

असे अनुभव येऊनदेखील, कार्यक्रम संपल्यावर लवकरच, माझी बदली मदुराईला आणि त्यानंतर चेन्नईला झाली. मी माझ्याच आयुष्यात व्यस्त होतो आणि या काळात मी साधना करणे देखील विसरून गेलो. 

मी एका खेड्यातुन आलो होतो आणि पदवी प्राप्त करून सरकारी नोकरी मिळवणार्‍या पहिल्याच पिढीतल्या लोकांपैकी एक होतो. माझ्या वडिलांकडे थोडी जमीन होती पण आम्हाला लागणारे अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी आवश्यक असलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसा कमवण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. ते संतुष्ट आणि आनंदी होते आणि त्यांच्या पूजेच्या खोलीत ते दररोज लिंगाची आणि गणपतीच्या मूर्तीची पुजा करत असत. त्यावेळी माझ्या दोन भावांची लग्न लावून देणे आणि त्यांना योग्य मार्गावर लावणे हे सुद्धा आमच्यासाठी महत्वाचे होते. त्यामुळे ती सहा वर्षे माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सावरण्यातच गेली होती.

पण आता जेंव्हा मी ईशा उत्सवाचे निमंत्रण पाहिले, तेंव्हा सारे काही माझ्या मनात पुन्हा एकदा जीवंत झाले – मी पुन्हा एकदा त्या सान्निध्यासाठी आतुर झालो होतो. पण ईशा उत्सव आणि सद्गुरूंचा वर्ग यांचा खरोखरच काही संबंध असेल याची मात्र मला खात्री नव्हती, पण मी संधी साधली आणि 23 सप्टेंबर, 1996 या दिवशी पहिल्यांदाच आश्रमात दाखल झालो.

दिव्य पुरुषासोबत पहिली भेट

swami-nischala-interacting-with-sadhguru-pic

वातावरण अतिशय उत्साही होते, प्रत्येकजण अतिशय आनंदात आणि उत्साहात वावरत होते – मी फक्त तिथे असल्याचा आनंद लुटला. काही वेळाने, मी सदगुरूंना शोधायला निघालो, आणि शिवालय वृक्षाजवळ काही लोकांशी बोलत असताना त्यांना पाहिले. काही वेळाने मी त्यांना माझ्याच दिशेने येत असलेले पाहिले. या ऋषीतुल्य व्यक्तीला कसे अभिवादन करावे हे मला कळेना म्हणून माझा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना दंडवत घालावा असे मी ठरवले. मी त्यांचे पदस्पर्श करण्यासाठी खाली वाकत असतानाच, माझा आणि सद्गुरुंचा आमच्या डोळ्यांच्या माध्यमातून संपर्क झाला, आणि ते तेंव्हा माझ्याकडे पहात सुद्धा नव्हते. त्यानंतर माझ्याबाबत जे काही घडले ते शब्दांच्या पलीकडचे आहे. योग्य शब्दांच्या अभावी, मी फक्त येवढेच म्हणू शकतो की मला त्यांच्या डोळ्यात “करुणा आणि कृपा” ओसंडून वाहात असलेली दिसली – जणूकाही त्याने संपूर्ण सृष्टीच व्यापून टाकली आहे. 

योग्य शब्दांच्या अभावी, मी फक्त येवढेच म्हणू शकतो की मला त्यांच्या डोळ्यात “करुणा आणि कृपा” ओसंडून वाहात असलेली दिसली – जणूकाही त्याने संपूर्ण सृष्टीच व्यापून टाकली आहे.

अचानक माझ्या आतमधे काहीतरी उन्मळून पडले आणि मी आतमधे अमर्याद परमानंद अनुभवला. सभोवतालच्या वातावरणाचे भान हरपून मी रडायला लागलो. मी बहुदा तासभर रडत होतो. एखाद्या हरवलेल्या आणि कुटुंबापासून विभक्त झालेल्या माणसाला पुन्हा एकदा आपले कुटुंबीय भेटल्यावर जसे वाटेल तसे मला वाटत होते. मी पुन्हा घरी परतलो होतो.

पलीकडची एक झलक

जाण्यापूर्वी, मला असे समजले की चेन्नईत सुद्धा वर्ग सुरू आहेत. त्या काळात माझे कुटुंबीय माझ्यासाठी मुलगी शोधत होते. मला लग्न करण्याची विशेष इच्छा नव्हती, पण एका विशिष्ट वयात ते करणे सामान्य समजले जात होते. परंतु आश्रमातील या घटनेनंतर, कोणतेही प्रयत्न न करता, माझी लग्न करायची इच्छा नाहीशी झाली. एप्रिल 1997 मधे, मी भाव स्पंदन कार्यक्रमासाठी (बीएसपी) पुन्हा आश्रमात आलो, पण त्यासाठी आवश्यक  असलेला, मी 1990 मधे ईशा योग वर्ग पूर्ण केला आहे हे सुद्ध करणारा  कोणताही माझ्याकडे पुरावा नव्हता. कदाचित हा वर्ग सद्गुरुंनी कोइंबतुरमधे घेतलेल्या पहिल्या काही वर्गांपैकी एक होता, त्यामुळे स्थानिक केंद्रात सुद्धा त्याची कोणतीही नोंद नव्हती. त्यामुळे त्यांनी मला बीएसपी करण्याची परवानगी दिली नसती. पण बीएसपी सुरु होण्यासाठी आणखी दोन दिवस होते, आणि मी आश्रमातून हललो नाही आणि तयारीसाठी गृहपाठ सुद्धा करायला सुरुवात केली. खूप मिनतवारी केल्यानंतर मला बीएसपी सुरु होण्याअगोदर फक्त काही मिनिटे आधी परवानगी मिळाली. 

भावस्पंदन हा एक निर्णायक क्षण होता. प्रत्येक सत्रात, मी अधिकाधिक आनंदी झालो, अधिकाधिक उत्साही आणि अधिकाधिक उत्तेजित होत गेलो. एका क्षणी, मी सद्गुरूंना माझ्याकडे चालत येताना पाहिले, आणि मी त्यांचे पाय धरण्यासाठी खाली वाकलो, पण त्यांचे पाय तिथे नव्हतेच – माझ्या समजाप्रमाणे, तिथे केवळ रिकामी जागा होती. असह्य आनंद होऊन एका क्षणी मी जेंव्हा सभागृहाच्या बाहेर आलो, तेंव्हा शरीराचे कोणतेही भान न बाळगता मी कोलमडून खाली पडलो. मी मातीशी, वृक्षांशी, अवकाशाशी, मी खात असलेल्या अन्नाशी एकरूप झालो. मला हे स्पष्टपणे कळून चुकले होते की माझे सांसारिक जीवन संपुष्टात आलेले आहे. 

त्यानंतर मी चेन्नईत परत आल्यानंतर दोन महीने कार्यालयीन कामकाजात माझे अजिबात लक्ष लागत नव्हते – रिकाम्या मनाने किंवा मनात आनंद ओसंडून वाहात असताना,  मी कुठेतरी टक लावून बघत बसत असे. माझी अवस्था पाहून आश्चर्यचकित झालेल्या माझ्या सहकार्‍यांना  “मी योगा करतो आहे.”  असे मी उत्तर देत असे. दोन महिन्यांनंतर मी पुन्हा सामान्य स्थितीत आलो पण सद्गुरुंचाच एक भाग होण्याची अतिशय तीव्र इच्छा  माझ्या मनात सदैव होती. मी तेरा दिवसांची रजा घेतली आणि चेन्नाईत झालेल्या ईशा योग कार्यक्रमाच्या सर्व तीन सत्रांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले. मी आश्रमाच्या निमंत्रणावरुन ईतर साधकांसोबत कडप्पाला देखील भेट दिली. तिथे मी एक चमत्कार अनुभवला. 

एक चमत्कार

तो उन्हाळ्यातला एक उष्ण दिवस होता, आणि आकाशात सूर्य तेजाने तळपत होता. संध्याकाळी साधारण 4.30 च्या सुमारास, सद्गुरुंनी ब्रह्मचार्यांना  प्रक्रियेसाठी गर्भगृहाजवळील खोलीत नेले. ते साधारणतः  तासभर आतमधे होते. सद्गुरु बाहेर येण्यापूर्वी दहा मिनिटे अचानकपणे पाऊस पडायला सुरुवात झाली. नंतर रात्रीच्या सत्संगाच्या वेळी स्थानिक पंचायत अध्यक्षांनी सांगितले, “मी गुरूंकडे पाऊस मागितला कारण पाऊस नसल्याने आम्हाला त्रास होत होता; आणि आजच पाऊस पडला.” ते सद्गुरुंविषयी अत्यंत कृतज्ञ होते. 

कडप्पामधे, सद्गुरु ध्यानलिंग निर्माण करण्याविषयी सुद्धा बोलले; सद्गुरु त्यावर जे काही बोलले, त्यावरून माझ्या हे लक्षात आले की ही मानवतेला दिलेली एक अदभूत भेट असेल, आणि याचा किमान एक लहानसा भाग होता यावे या इच्छेने माझे हृदय सद्गतित झाले. “आता पुन्हा ऑफिसला जायचे नाही,” असे मी कडप्पाहून परत आल्यावर ठरवूनच टाकले. 

पूर्णवेळ स्वयंसेवक बनण्यासाठी मी पुन्हा एकदा आश्रमात आलो.  मला चांगली वागणूक देण्यात आली आणि स्वयंसेवक म्हणून माझ्यावर काही कामे सोपवण्यात आली. परंतु चौथ्या दिवशी स्वामी निसर्गा मला म्हणाले, “सद्गुरुंच्या परवानगीखेरीज तुम्ही स्वयंसेवक म्हणून इथे तीन दिवसांपेक्षा अधिक वेळ राहू शकत नाही.” सदगुरूंना कुठे शोधायचे हे त्यांनी मला सांगितले नाही, आणि म्हणून मग मी पुन्हा चेन्नईला परतलो. 

अर्पण

सुदैवाने, मी परत आल्यावर लगेचच सद्गुरु योग वर्ग घेण्यासाठी चेन्नईला आले. दिक्षेनंतर दुसर्‍या दिवशी मी सदगुरूंना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेतली. मला सकाळी 11 वाजताची वेळ देण्यात आली होती. त्या दिवशीही सकाळी मी झोपेतून उठलो तेंव्हा पुन्हा एकदा मला अचानक संत माणिकगवचार यांच्या कथेची आठवण झाली. त्या कथेत, पंड्या राजाच्या दरबारात प्रधान असलेले माणिकगवचार राजाच्या आज्ञेवरुन अरबी घोडे खरेदी करायला जातात. परंतु वाटेत त्यांची भेट गुरुंच्या रूपात आलेल्या शंकराशी  होते, ज्यांना माणिकगवचार यांना स्वतःचाच एक अभिन्न अंग बनवायाचे असते; आणि त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आले. त्या दिवशी असेच काहीतरी घडेल अशी तीव्र भावना माझ्या मनात होती. पुढे मी असा विचार केला, “आज मी शंकराला प्रिय असणारी फुले अर्पण करायला हवीत.” सकाळी साडेसात वाजताच मी शंकराला प्रिय असणारी नंदियवट्टम, मंदरई, विल्व, हिबिस्कस आणि नागलिंग अशी पाच प्रकारची फुले/पाने शोधायला बाहेर पडलो. शेजारच्या घराच्या मागच्या अंगणात मला तीन प्रकार सापडले, मी ते एका ओल्या पंच्यात गुंडाळून घेतले, आणि विल्व सापडेल या आशेने दूरवर असलेल्या शंकराच्या मंदिरात गेलो. आणि मला विल्व आणि नागलिंग या दोन्ही गोष्टी त्या मंदीराजवळ सापडल्या. फुले गोळा करून सदगुरूंना भेटायला जायच्या ठिकाणी मी पोहोचे पर्यन्त माझी आत जाण्याची वेळ झाली होती. 

सदगुरू प्रथमच माझ्याशी बोलले

swami-nischala-pagirvu-pic3

सद्गुरु बसलेल्या खोलीत प्रवेश केल्यावर, मी वीरासनात बसलो, पंचा उघडला, आणि त्यांच्या पायावर फुले अर्पण केली. नकळत, त्या पाच फुलांसोबत, मी स्वतःला जे काही समजत होतो तेसुद्धा पुर्णपणे त्यांच्या चरणी अर्पण केले. आयुष्यभर मी याच क्षणाची प्रतीक्षा करत होतो असे मला वाटले. अचानकपणे, माझ्यातील सर्वकाही स्तब्ध झाले, आणि मी त्यांच्या पावलांकडे बघत तिथेच बसून राहिलो. डोळ्यामधून अश्रु वाहात होते. दोन ते तीन मिनिटे अशीच निघून गेली; असे वाटत होते की जणू काही मी त्यांच्या पावलांकडे खेचला जात होतो. काही क्षण ती पावले सोडली तर मला इतर काहीही दिसले नाही. 

“आता आपण बोलू,” काही मिनिटांनंतर सद्गुरु म्हणाले, आणि त्यांनी त्यांचे पाय हलवले. त्यांचे पाय माझ्या आतमधेच हलताहेत असे मला वाटले. 

काय बोलावे मला काही सुचत नव्हते, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते आणि मी मला माहिती असलेले सर्वकाही विसरून गेलो होतो. माझ्या तोंडातून बाहेर पडलेले मोजकेच शब्द कुठून आले ते मला माहिती नाही, पण मी म्हणालो, “माझी वेळ आता आली आहे!” 

“नक्कीच वेळ आली आहे,” सद्गुरु म्हणाले. “तर मग आपण आता काय करूया?” 

मी ताबडतोब म्हणालो, “मला संन्यासी बनायचे आहे,”. 

मग त्यांनी मी काय करतो आणि माझी कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरे याची  चौकशी केली. माझ्या कौटुंबिक स्थितीबद्दल ऐकल्यानंतर त्यांनी विचारले, “मग तुझ्या पालकांची काळजी कोण घेणार?” मी त्यांना खात्री दिली की माझे मोठे बंधु त्यावेळी कुटुंबाची काळजी घेण्यायेवढे सधन होते. ते म्हणाले, “डिसेंबरमधे आश्रमात ये.” आणि आमची भेट संपली. 

जुलै महिना होता. माझ्यासाठी सारे काही संपले होते; मी जे काही होतो असे मला वाटत होते, ते सारे काही मी त्यांच्या पावलांवर सोडून आलो होतो. त्या क्षणापासून या क्षणापर्यन्त, मी हे लिहीत असताना, माझ्या मनात खोलवर एक अमर्याद आनंद आहे; वरवर सर्व प्रकारच्या भावना घडतात, पण मनात मात्र सदैव आनंदच असतो. 

1 डिसेंबर, 1997 रोजी मी पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून आश्रमात दाखल झालो, आणि 1998 मधल्या महाशिवरात्रीला मला ब्रम्हचर्याची दीक्षा देण्यात आली.

ध्यानलिंग बांधकामाचा उत्सव

सुरूवातीला, मी स्वयंपाकघरात काम केले, मी भांडी घासत असे आणि भात शिजवत असे. तीन महिन्यांनंतर, मी बांधकाम संघाचा एक भाग बनलो. एके दिवशी, मला इतर आणखी दोघांसोबत  सद्गुरुंना भेटायला बोलावले गेले. “एका विशिष्ट दिवसापर्यंत मला ध्यानलिंगावर छप्पर बांधून हवे आहे,” सद्गुरुंनी आम्हाला  त्या बैठकीत सांगितले, आणि ध्यानलिंगाच्या घुमटाचा पाया कसा बांधायचा हे आम्हाला तपशीलवार सांगितले. या सर्व वर्षात, त्यांनी आम्हाला जटिल बांधकामांचे तपशील तोंडी, ड्रॉइंग न पाहताच इतक्या उस्फूर्तपणे सांगितले आहे – की आकार, आकारमान, स्थान, आणि आराखडा कुठेतरी त्यांच्या डोक्यात नक्कीच तयार असतो.  त्या पहिल्या बैठकीत सद्गुरुंनी आम्हाला हे सुद्धा विचारले, “या मंदिरात दररोज किती लोकं यावी असे तुम्हाला वाटते?” 

“एक हजार,” मी मोठ्या उत्साहात म्हणालो – माझ्या मनात येऊ शकणारी सर्वात मोठी संख्या. 

“हो, यापेक्षा अधिकजण येतील,” सद्गुरु उत्तरले. 

आज हजारो लोकं ध्यानलिंगाला भेट द्यायला येतात हे पाहून मला अतिशय आनंद होतो. 

ऑरा सेल स्टोन आणि चार कारखाने

या बैठकीनंतर, सद्गुरुंनी ठरवलेल्या वेळेत घुमटाचे काम पूर्ण करण्यासाठी आश्रमातील सर्व रहिवासी आणि स्वयंसेवक हात सरसावुन पुढे आले. आमच्यापैकी कोणीही दिवस आहे का रात्र आहे याचा विचार न करता स्वतःला या कामात पुर्णपणे झोकुन दिले.  पाया आणि भिंतीची उभारणी पटकन झाली, पण ऑरा सेल्स (ध्यानलिंग गर्भगृहातील छोटेखानी ध्यान कक्ष)  पूर्ण करण्यासाठी आम्हाला लिंटेल स्टोन्सची आवश्यकता होती. पुरवठादाराने ते एका महिन्यात देण्याचे आश्वासन दिले होते, पण आम्हाला त्याच्याकडून काहीच कळवण्यात आले नाही. म्हणून एका महिन्यांनी जेंव्हा कापलेले दगड आमच्यापर्यंत पोचले नाहीत, तेंव्हा आम्ही खाणीला भेट देण्याचे ठरवले. आम्ही जेंव्हा तिथे पोचलो, तेंव्हा आम्हाला आवश्यक असणार्‍या चोपन्न दगडांपैकी फक्त दोन दगड तयार होते हे पाहून आम्हाला धक्काच बसला. आम्हाला उरलेले दगड वेळेत मिळण्याचा कोणताही मार्ग नव्हता. काय करावे ते आम्हाला समजत नव्हते, आणि नेहेमीप्रमाणे आम्ही ही बातमी स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवली. 

गोबीचिट्टीपालयम येथील अरुणगिरी अण्णा आणि सेंथिल अण्णा आमच्या मदतीसाठी धावून आले, आणि त्यांनी आम्हाला बंगलोर इथल्या एका खाणीचा पत्ता देऊन तिथे भेट द्यायला सांगितले. लवकरच, खरेदी प्रमुख - स्वामी अभिपाद आणि अनुवादक - स्वामी निसर्गा त्या खाणीत गेले आणि कच्च्या दगडांच्या वितरणाची तारीख निश्चित करून आले. तरीसुद्धा येवढ्या कमी वेळात हे कच्चे दगड कसे कापून घ्यावे! हा प्रश्न होताच. गोबीच्या दोन्ही अण्णांनी पुन्हा एकदा उपाय शोधून काढला आणि हे शक्य होण्यासाठी एकाच वेळी दगड कापणारे चार कारखाने काम करतील याची व्यवस्था त्यांनी केली. उशीर होण्याचा धोका टाळण्यासाठी, मी कामाची प्रगती तपासून पहाण्यासाठी दररोज एका कारखान्यातून दुसर्‍या कारखान्यात बसने जात होतो. मनाला स्पर्श करणारी एक गोष्ट होती ती म्हणजे जेंव्हा मी सिंगनल्लुर कार्यालयात रात्री अकराच्या सुमारास येत असे, तेंव्हा स्वामी देवसत्व मला काहीतरी खाल्ल्याशिवाय झोपू देत नसत. ते किमान उपमा तरी बनवून मी तो खाईन याकडे लक्ष देत असत. 

तयार विटा

खरं म्हणजे, आमच्यापैकी कोणालाच सद्गुरूंनी आम्हाला वापरायला सांगितलेल्या ग्रानाईट आणि इतर सामुग्रीच्या खरेदीची आणि प्रक्रियेची माहिती नव्हती. पण जेंव्हा जेंव्हा आमचे काम थांबले, तेंव्हा तेंव्हा आम्हाला काहीतरी मदत मिळाली. ते अगदी एखाद्या चमत्काराप्रमाणे घडले. जसे की घुमटासाठी लागणार्‍या विटांच्या बाबतीत घडले. सद्गुरूंनी आम्हाला घुमटासाठी दोन इंच रुंदीच्याच विटा वापराव्यात अशी स्पष्ट सूचना दिली होती, आणि आम्हाला तामिळनाडुमध्ये त्या पुरवणारा कोणीही पुरवठादार मिळेना. काय करावे हे आम्हाला सुचेना,  आणि पुन्हा एकदा ही बातमी पसरली, आणि पुन्हा एकदा एका स्वयंसेवकाने एक तोडगा शोधून काढला. मोहन दास अण्णांनी केरळमधला एक कारखाना शोधून काढला ज्यांच्याकडे आम्हाला आवश्यक असलेल्या आकाराच्याच विटा तयार होत्या. खरं म्हणजे मोहन त्या पुरवठादाराच्या शोधासाठी गेले नव्हते; ते दुसर्‍याच एका कामासाठी केरळमधे गेले होते – आणि योगायोगानेच त्यांची या पुरवठादाराशी गाठ पडली.

हौर्डीस टाईल्सची मजबूती

आणखी एक गोष्ट म्हणजे, ध्यानलिंगाच्या बांधकामाच्या दरम्यान, आम्ही तंत्र आणि सामुग्रीबद्दल जे काही शिकलो, त्याचा वापर आम्ही आजही मोठ्या प्रमाणावर करत आहोत. उदाहरणार्थ, सद्गुरूंनी आम्हाला आतल्या परिक्रमेचे छत बनवण्यासाठी हौर्डी टाईल्स वापरायला सांगितल्या. सद्गुरूंनी जे काही समजावून सांगितले, त्यानुसार त्या टाईल्स नाजुक वाटल्या. त्या काही वजन घेऊ शकतील का याबद्दल माझ्या मनात शंका होती. त्याशिवाय तमिळनाडूमध्ये इतर कुठेही त्यांचा वापर केला गेलेला आम्हाला आढळला नाही. पुन्हा एकदा, मोहन दास आम्हाला केरळमधील कालिकत इथल्या हौर्डीच्या कारखान्यात घेऊन गेले. त्या टाईल्स पाहिल्यावर मी न रहावून त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगितले की त्यांचा वापर कसा करावा हे आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे. आश्चर्यचकित होऊन त्यांनी  आम्हाला त्यांच्या अभियंत्याशी गाठ घालून दिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्याने आमची भेट घेण्याचे कबुल केले. त्यानंतर पाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे मी आजसुद्धा आश्चर्यचकित होतो.

आम्ही हॉटेलमधे शिरताक्षणी, आमची भेट एका साधकासोबत झाली, जो पूर्वी कोइंबतुरमधे विमानतळ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता आणि त्याने आश्रमाला भेट दिली होती. साहजिकच त्याने स्वामी अभिपाद यांना ओळखले. आमचे बोलणे ऐकून झाल्यानंतर त्याने बांधकामाची ठिकाणे पहाण्यासाठी त्याची गाडी आम्हाला दिली आणि तो व त्याची पत्नी रिक्षाने घरी परतले. आम्ही जेंव्हा अभियंत्याला भेटलो तेंव्हा आम्हाला समजले कि त्यांचे शिक्षण सुद्धा कोइंबतुरमधेच झालेले आहे. त्या टाईल्सचे तांत्रिक तपशील त्याने आम्हाला अधिक तपशीलवार समजावून सांगितले, तसेच आम्ही भेट देणार्‍या 2 – 3 ठिकाणची निश्चित वेळसुद्धा घेऊन ठेवली.

आम्ही जेंव्हा पहिल्या ठिकाणी गेलो, तेंव्हा योगायोगाने असे लक्षात आले कि दुकानाचे मालक सुद्धा पूर्वी आश्रमात येऊन गेलेले आहेत. ईशाचे त्या ठिकाणी केंद्र नसताना सुद्धा तिथे एवढ्या ध्यान साधकांना भेटून आम्हाला आश्चर्य वाटले. तो आमच्याशी येवढा आपुलकीने वागात होता कि त्याने अधिक तपशील देण्यापूर्वी आम्ही फळांचा रस प्यावा असा आग्रहच धरला. त्यानंतर त्याने आम्हाला सर्व काही दाखवले आणि समजावून सांगितले. त्या टाईल्स त्याचा दुकानाच्या पोटमाळ्यावर वापरल्या जात होत्या, ज्यावर फ्रीजसारख्या अवजड वस्तु ठेवल्या जात असत. त्यामुळे टाईल्सच्या ताकदीबद्दल माझे समाधान झाले होते आणि आणखी एखाद्या ठिकाणी भेट देण्याची आवश्यकता मला वाटली नाही. अगदी आजसुद्धा, ईशाच्या अनेक इमारतीत आम्ही हौर्डीच्याच टाईल्स वापरतो.

सी-क्लांपचा क्लांप

बांधकाम प्रक्रियेचा आणखी एक पैलू... आम्हाला जे काही माहिती होते, आणि आमच्या अंगात जे काही गुण होते त्याचा वापर करणे आमच्याकडून अपेक्षित होते. एकदा मी पुढील मंडपाचे मोठमोठे खांब उचलण्यासाठी स्वतःचे डोके चालवून सी आकाराचा एक लोखंडी क्लांप तयार केला. असे वाटत होते कि त्याने खांब योग्य प्रकारे धरून ठेवता येतील, पण त्याच्या वापराविषयी मी साशंक होतो. “खांब खाली पडला तर काय होईल, कोणाला दुखापत झाली तर काय होईल, एखाद्याचा मृत्यू झाला तर काय होईल...” या सर्व विचारांनी मला रात्रभर झोप आली नाही. या सर्व विचारांनी मी येवढा अस्वस्थ झालो, की दुसर्‍या दिवशी सकाळी मला जुलाब झाले. त्यानंतर मी 3 तास ध्यानलिंगात जाऊन बसलो आणि माझे मन ताळ्यावर आले. मी बाहेर येत असतानाच, मला स्वामी नंदीकेशा भेटले, जे एक मेक्यानिकल इंजिनीअर आहेत. मी त्यांच्यासोबत या परिस्थितीवर चर्चा केली. काही मिनिटे विचार केल्यानंतर, ते म्हणाले, की आपण तो क्लांप लाकडाचे छोटे तुकडे घालून घट्ट करू शकतो, आणि खांबाच्या तळाशी आणखी एक क्लांप वापरू शकतो. हा उपाय चांगला लागू पडला. ते सुद्धा नुकतेच पदवीधर झाले होते आणि त्यांना फारसा अनुभव नव्हता, पण आम्ही फक्त आमचे ज्ञान ज्यास्तीत ज्यास्त वापरले – आणि त्याचा उपयोग झाला. 

कृपेच्या छायेत जगणे

मी इथे असताना गेल्या वीस वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत. खरं म्हणजे बांधकामाच्या नावाखाली आम्ही ईशामधे जे काही करतो त्या सर्वसंकल्पना सद्गुरुंच्या आहेत. आणि अनेक मार्गांनी ती बांधकामे सद्गुरुंच्या कृपेने पार पडली आहेत. आम्ही जेंव्हा त्यांच्यासोबत बांधकामाविषयी बैठका घेतो, तेंव्हा सद्गुरु आम्हाला तपशील देतात, आणि त्याच क्षणी माझ्या मनात ते बोलत असतात त्याच्या त्रिमितीय प्रतिमा उमटतात. कालांतराने रेखांकने तयार करताना, त्यांनी दिलेली वस्तुरेखांकन विषयक परिमाणे आणि प्रमाण तंतोतंत जुळतात. 

सद्गुरूंचे मानवतेसाठीचे स्वप्न साकार करण्यात मी थोडाफार उपयोगी पडलो याबद्दल मी ऋणी आहे. आणि इथे असल्यामुळे माझ्यात जे काही घडून आले आहे ते माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. जेंव्हा जेंव्हा मी सद्गुरूंचे भौतिक स्वरूप माझ्या कल्पनेत आणतो – त्यांचा तेजस्वी चेहेरा – तेंव्हा मला आनंद होतो, काहीवेळा हा आनंद ओसंडून वाहात असतो; कधीही आणि कुठेही. हे कसे घडते ते मला माहिती नाही, पण माझ्यासाठी सद्गुरु म्हणजे खुद्द शंकराचाच अवतार आहेत – त्यापेक्षा काहीही कमी नाही आणि अधिक नाही.

थेलिवू गुरुविन थिरुमेनी कंदल

थेलिवू गुरुविन थिरुवरथाई केट्टल

थेलिवू गुरुविन थिरुनामम सेप्पल

थेलिवू गुरुविन थिरुवरू सिंथिथल थाने

गुरुंचे स्वरूप पाहून साधकाला स्पष्टता प्राप्त होते

गुरूंचे शब्द ऐकून साधकाला` स्पष्टता प्राप्त होते

गुरूंचे नामस्मरण करून साधकाला स्पष्टता प्राप्त होते

गुरुंच्या स्वरूपाचे चिंतन करून एखाद्याला स्पष्टता प्राप्त होते

ओम शंभो, शिव शंभो, जय शंभो महादेवा!