भविष्यातील तंत्रज्ञान शाप ठरेल की वरदान?
या लेखामध्ये, सद्गगुरु भविष्यातील तंत्रज्ञान आपल्या जीवनाला कसा आकार देतील यावर आपला दृष्टिकोन मांडत आहेत.
एकदा का यंत्रांनी तसे करायला सुरुवात केले, की आपण कोण आहोत यावर खोलवर विचार करणे तुमच्यासाठी अपरीहार्य ठरेल. आणि तो एक महान दिवस ठरेल, कारण आपल्याला काहीच काम उरणार नाही. आपण काहीही कमविण्यासाठी जगणार नाही. आणि मग आपण जीवनाकडे अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकू.
स्मृतीच्या पलीकडील परिमाण
तुम्ही ज्याला शरीर आणि मन म्हणता ते स्मृतीचा एका निश्चित स्वरूपाचा साठा असतो. तुम्ही आज जे काही आहात, तसे तुम्हाला केवळ स्मृतीने बनविलेले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या पुरुषाने ब्रेडचा तुकडा खाल्ला, तर त्या ब्रेडचे मनुष्यात रूपांतर होते. जर एखाद्या स्त्रीने तो खाल्ला, तर त्याचे रूपांतर स्त्रीत होते. तोच ब्रेड जर एखाद्या कुत्र्याने खाल्ला, तर त्याचे रूपांतर कुत्र्यात होते. ब्रेडचा तुकडा किती हुशार आहे ना! ब्रेडचा तुकडा नव्हे, तर आपल्या शरीर प्रणालीत जी स्मृती साठवून ठेवलेली असते, ती त्या ब्रेडचे रूपांतर पुरुष, स्त्री किंवा कुत्र्यामध्ये करते.
तुमच्या शरीराची रचना म्हणजे स्मृतीचे एक निश्चित परिमाण आहे. स्मृती म्हणजे सीमारेषा निश्चित करणे सुद्धा आहे. पण बुद्धिमत्तेचे एक परिमाण आहे, ज्याला आपण चित्त असे म्हणतो, किंवा आधुनिक परिभाषेनुसार आपण त्याला साधारणपणे चैतन्य असे सुद्धा म्हणू शकतो. बुद्धिमत्तेच्या या परिमाणामध्ये स्मृती नसते. ज्या ठिकाणी स्मृती नसते, त्याला कोणत्याही प्रकारच्या सीमारेषा नसतात.
मानवी बुद्धिमत्ता हे एक प्रकारचे बेट आहे. म्हणून तंत्रज्ञानासकट, मानवी बुद्धिमत्तेची सर्व उत्पादने ही छोटी छोटी बेटे आहेत. चैतन्य हा एक महासागर आहे, ज्यामध्ये आपले अस्तित्व आहे. चैतन्य ही एक बुद्धिमत्ता आहे, जी तुम्ही आणि मी, हे आणि ते अशा प्रकारच्या कोणत्याही स्मृती किंवा सीमारेषांशी बांधील नाही. हे बुद्धीमत्तेचे असे परिमाण आहे ज्याला कोणत्याही सीमारेषा नाहीत.
आपल्या तंत्रज्ञानाच्या क्षमता जशा वाढत जातील, तसे आपण सुद्धा मानवी बुद्धिमत्तेच्या मर्यादा ओलांडून तीच्या गहन परिमाणाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो आपल्या जीवनाचा मूळ स्त्रोत आहे.
चैतन्यासाठी आधारभूत संरचना
आपल्याला काहीही निर्माण करायचं असेल, तर मानवाची एक निश्चित प्रमाणातील ऊर्जा, वेळ आणि साधने त्यासाठी समर्पित करणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण चैतन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आजपर्यंत आपण केवळ आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच झगडत होतो. पण एकदा ही तंत्रज्ञाने प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली, की अस्तित्व हा मुद्दाच उरणार नाही. जेंव्हा अस्तित्व हा प्रश्नच शिल्लक राहणार नाही, तेंव्हा आपण निश्चितपणे गुंतवणूक करायला सुरुवात करू. पण आपण जितक्या लवकर गुंतवणूक करू, तितके आपण तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या शक्यतांना सामोरे जाऊ; तेंव्हा त्यासाठी कमी विरोध होईल.
तंत्रज्ञान ही नेहेमीच एक दुधारी तलवार असते. आपण कोण आहात त्यानुसार आपण त्याचा कसा वापर करणार आहात हे अवलंबून असते. तुमची ओळख आणि आपले अनुभव खूप अनन्य, संकुचित आहे, का तुमची ओळख आणि तुमचा अनुभव सर्वसमावेशी आहे यावर तिचा वापर कसा होणार आहे हे ठरेल.
तर मग मानवी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्याची जाणीव निर्माण होण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? प्रत्येक पिढीत जाणीव सिद्ध असे अनेक पुरुष आहेत. पण काही पिढ्या आणि काही समाजांमध्ये त्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले. इतर काही समाजांमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता अशी वेळ आलेली आहे की परिमाणविरहित, मर्यादाविरहित चैतन्य निर्माण होण्यासाठी आवाज उठवून तो ऐकला गेला पाहिजे, आणि सजग कसे बनायचे याचे मार्ग सर्वांसाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत.
आंतरिक स्वास्थ्य-संपन्नतेचे तंत्रज्ञान
आपल्या भोवतालच्या परिसर स्वास्थ्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तसेच आपल्या आत सुद्धा तसे करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. कितीही तंत्रज्ञान उपलब्ध असले आणि तुम्हाला कसे राहावे हे माहिती नसले, तर तुम्ही अद्याप विकसित झाला नाही. मानवतेच्या इतिहासात आत्तापर्यन्त कोणत्याही पिढीला माहिती नसलेल्या सोयी आणि सुविधा आपण दैनंदिन जीवनात वापरत आहोत. पण आपण आजपर्यंतची सर्वात आनंदी आणि उत्तम पिढी आहोत असा दावा आपण करू शकतो का? नाही! लोकं अतिशय कमकुवत बनत चालली आहेत. आपण इतर पिढ्यांपेक्षा वाईट आहोत असे मला म्हणायचे नाही, पण आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी सर्वांनी येवढे कष्ट करूनसुद्धा आपण त्यांच्यापेक्षा लक्षणीयरित्या अधिक चांगले सुद्धा बनलेलो नाही.
या तंत्रज्ञानांच्या सहाय्याने सोयी आणि सुविधा मिळतात, पण स्वास्थ्य लाभत नाही. आता मात्र आंतरिक स्वास्थ्यावर लक्ष केन्द्रित करण्याची वेळ आलेली आहे. अजूनही आपले स्वास्थ्य आपल्या आजूबाजूला काय आहे याद्वारे ठरविले जाते, आपल्या आतमध्ये काय आहे यावर नाही.
आपले शरीर आणि आपल्या मेंदूने आपल्याकडून सूचना घेतल्या, तर आपण आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षणी निरोगी आणि आनंदी ठेवाल का? आपल्याला जर निवडीचा पर्याय उपलब्ध असता, तर तुम्ही निश्चितपणे तसे केले असते. आपण जर प्रत्येक क्षणी आनंदी नसाल, तर साहजिकच तुमचे शरीर आणि तुमचा मेंदू तुमच्याकडून सूचना स्वीकारत नाहीये. याचाच अर्थ आपल्यात पुरेशी जाणीव निर्माण झालेली नाही असा आहे.
म्हणूनच, आपल्याला त्या दिशेने गुंतवणूक करायला सुरुवात करायला हवी. आपल्या शहरांमध्ये, रुग्णालये आहेत, शाळा आहेत, स्वच्छतागृहे आहेत, सर्व काही आहे. पण लोकांना ध्यान करण्यासाठी जागा उपलब्ध आहे का? आपण आज करत असलेल्या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाचा उपयोग करून करायला सुरुवात झाली, आणि आपण का अस्तीत्वात आहोत हे आपल्याला जर माहिती नसेल, तर आंतरिक स्वास्थ्य मिळवण्याची आवश्यकता अतिशय तीव्र होईल. म्हणूनच आपल्याला त्या दिवसासाठी तयार राहायचे असेल, तर आपण आपल्या अस्तित्वाच्या अंतर्गत केंद्रावर लक्ष केन्द्रित करणार्या भौतिक पायाभूत सुविधा आणि मानवी पायाभूत सुविधा निर्माण करणे अतिशय महत्वाचे आहे.
Editor’s Note: Inner Engineering is an opportunity to engineer an inner transformation that deepens your perception, bringing about a dimensional shift in the very way you look at your life, your work, and the world that you inhabit. There are three different modules in which you can learn Inner Engineering. Check out this page for more details.
A version of this article was originally published in Forest Flower, July 2018.