सद्गुरु समजावून सांगत आहेत की तुमच्यामध्ये तुमच्या मर्यादित ओळखींच्या पलीकडे एक अवकाश निर्माण करणे म्हणजे योग. तसेच ते अवधूतांच्या विषयीसुद्धा विस्ताराने बोलत आहेत.

सद्गुरु: ;योगाचा मूळ उद्देश “तुम्ही जे नाही” त्यासाठी तुमच्या आत विविध परिमाणे निर्माण करणे आहे. “तुम्ही जे नाही” यातून मला असे म्हणायचे आहे की आज ज्या ज्या गोष्टींशी तुम्ही तुमच्या ओळखी बांधलेल्या आहेत त्या म्हणजेच “तुम्ही” आहात. पण तुमच्यामध्ये तुमच्या मर्यादित ओळखींच्या पलीकडे एक अवकाश निर्माण करणे म्हणजे योग. सुरूवातीला ते अवकाश अगदी छोटेसे असते. तुम्ही त्याच्यासाठी जागा निर्माण करू लागलात, तुम्ही तुमच्या मनातील सर्व व्यर्थ कचरा काढून टाकलात, तर हे अवकाश विस्तारायला लागते. आणि एक दिवस असा येतो जेंव्हा ते सारे काही व्यापून टाकते, आणि तुमची सर्व व्यर्थ सामुग्री आजूबाजूला तरंगत राहते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांचा वापर करू शकता, अन्यथा ते तुम्हाला स्पर्श करू शकत नाहीत. जेंव्हा तुम्ही तसे बनता, तेंव्हा आम्ही म्हणतो की तुम्ही खरोखरच ध्यानमय झाला आहात, तुम्ही समाधीत आहात, एक समतोल अवस्था ज्यामध्ये कोणतीच गोष्ट तुम्हाला स्पर्श करत नाही.

अवधूत

व्यर्थ गोष्टींनी सुसज्ज असल्याखेरीज तुम्ही या जगात तग धरून राहू शकत नाही. तुम्हाला काहीही करता येणार नाही. तुम्ही एखाद्या अवधुतासारखे बनाल. हल्ली प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आहे, “मी अवधूत आहे, तुम्हीदेखील अवधूत आहात.” ती वेगळी गोष्ट आहे. अवधूत म्हणजे अशी व्यक्ती जी एका विशिष्ट अवस्थेत असते ज्यामध्ये ते एखाद्या लहान बाळासारखे असतात – त्यांना काहीही माहित नसते. तुम्हाला त्यांना जेवण भरवावे लागते, तुम्हाला त्यांना खाली बसवावे लागते, उठून उभे करावे लागते. त्यांच्या जीवनातील इतर कोणत्याही बाबी कशा हाताळाव्या याची माहिती नसल्याबद्दल ते अतिशय आनंदी असतात.

व्यर्थ गोष्टींनी सुसज्ज असल्याखेरीज तुम्ही या जगात तग धरून ठेऊ शकत नाही. तुम्हाला काहीही करता येणार नाही. तुम्ही एखाद्या अवधुतासारखे बनाल..

अशा व्यक्तीने तिचे मन संपूर्णतः काढून टाकलेले असते - ती एकूणएक सर्व व्यर्थ गोष्टींपासून मुक्त असते. एखाद्या लहान बाळासारखी तुम्हाला त्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागते; अन्यथा ती या जगात राहूच शकणार नाही. अशी स्थिती कदाचित सदैव राहू शकणार नाही, पण किमान काही निश्चित कालावधीसाठी नक्कीच राहील. वर्षानुवर्षे अवधुतासारखे राहणारी सुद्धा लोकं आहेत. ही एक अतिशय परमानंदी आणि अद्भुत अवस्था आहे, पण तुमच्याकडे तुमची काळजी घेणारे कोणीतरी असणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही त्या अवस्थेत जगू शकत नाही.

माझ्यासाठी, लोकांना अशा अवस्थेत नेणे अतिशय सोपे आहे. ही अवस्था अतिशय आनंदी आणि अदभूत स्थिती आहे, पण त्यांची काळजी वाहण्यासाठी माणसं कुठे मिळतील? जगात आज असलेल्या सामाजिक परिस्थितींमुळे, त्याच्याकडे एक सकारात्मक सुधारणा म्हणून पाहिले जाणार नाही. लोकांना वाटेल की त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे आणि त्यांना मनोरुग्णालयात नेण्याची गरज आहे. ती व्यक्ती अतिशय आनंदी होईल, पण त्यांना मात्र यामुळे काही फरक पडणार नाही.

अशी स्थिती भारतामध्ये साजरी केली जात असे – अवधूतांची पुजा केली जात असे. ज्यांच्याशी आमचा संपर्क आहे, असे अनेक महान अवधूत दक्षिण भारतात आहेत. त्या अतिशय महान व्यक्ती होत्या, पण त्यांना सहाय्य केल्याशिवाय ते अस्तित्वात राहू शकत नाहीत.

तुम्ही सर्व द्वैत पार करून पुढे गेलात, आणि तुमच्या मनात एक स्पष्ट मोकळे अवकाश असेल, तर द्वैत केवळ तुमच्या बाहेरच कार्यरत राहील.

थोडया कालावधीसाठी अशा अवस्थेत जाणे लोकांसाठी चांगले आहे कारण तसे करणे म्हणजे तुमच्या कर्म संरचनेमधील सर्वात खालचा मजला झाडून स्वच्छ करण्यासारखे आहे. जणू काही कर्म संरचनेचे 110 मजले आहेत, आणि या अवस्थेत असताना तुम्ही सर्वात तळाशी असणारा मजला झाडून साफ करत आहात, जे करण्याची संधी तुम्हाला तुम्ही इतर अवस्थेत असताना मिळत नाही–येवढ्या खोलवर जाऊन स्वतःला स्वच्छ करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे प्रचंड प्रमाणात सजगता असणे आवश्यक आहे. पण या प्रकारच्या अवस्थेत, एखादी व्यक्ती तिच्या मनाचा तळ सहजपणे स्वछ करू शकते. तो काहीही करत नाही, त्याला काहीही माहिती नाही, पण त्याच्याकडे कोणतेही कर्म नाही, कोणते बंधन नाही, म्हणून त्याच्यासाठी सर्वकाही स्वच्छ, नितळ झालेले असते.

योगी या प्रकारच्या अवस्थेत काही विशिष्ट कालावधीसाठी राहतात कारण मुक्त होण्याचा तो सर्वात वेगवान मार्ग आहे. पण त्याच वेळेस, बहुतेकदा, प्रत्येक वेळी, अवधूत त्यांचे शरीर अवधूत म्हणून सोडू शकत नाहीत. ही एक अशी गोष्ट आहे जी मानवी चैतन्यात निर्माण झालेली आहे. तुम्ही त्या अवस्थेत शरीर सोडून जाऊ शकत नाही. जेंव्हा तुम्हाला शरीराचा त्याग करायचा असतो, तेंव्हा तुम्हाला तुमच्या जाणिवेत परत यावे लागते. आणि त्या अवस्थेमधून बाहेर पडण्याच्या काही क्षणामध्ये तुम्ही पुन्हा एकदा कर्म निर्माण करू शकता. आम्हाला अशा काही व्यक्ती माहिती आहेत, ज्या अवधूत म्हणून जीवन जगल्या, जवळजवळ संपूर्णपणे मुक्त, परंतु अगदी शेवटच्या क्षणी, जेंव्हा ते या स्थितीतून बाहेर आले,तेंव्हा ते पुन्हा एकदा त्यांच्या कर्म संरचनेत परत आले. फक्त सोपी कर्मे, विशेष अवघड असे काही नाही, पण स्वतःला त्यापासून विलग कसे करावे हे त्यांना माहिती नव्हते.

सुसज्जता व्यर्थ गोष्टींची

तर,वायफळ गोष्टींनी सुसज्ज असल्याखेरीज तुम्ही या जगात तग धरून ठेऊ शकत नाही. तुमच्या मनात सतत कार्यरत असणार्‍या द्वैतामधील गैरसमजामुळे या व्यर्थ गोष्टी तुमच्या मनात उफाळून येतात. तुम्ही सर्व द्वैत पार करून पुढे गेलात,आणि तुमच्या मनात एक स्पष्ट मोकळे अवकाश असेल, तर द्वैत केवळ तुमच्या बाहेरच कार्यरत राहील. तुमची इच्छा असेल, तर तुम्ही हा खेळ खेळू शकता, नाहीतर तुम्ही जसे आहात तसे ठीकच आहात. तेव्हा त्या व्यर्थ गोष्टी तुमचा हिस्सा नसतात, पण तुमच्याकडे त्याचा साठा असतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या वापरू शकता, पण आता त्या तुमचा भाग बनून राहिलेल्या नसतात.