हास्य हे खरोखरच एक सर्वोत्तम औषध आहे का? – जागतिक हास्य दिन
हास्य एक सर्वोत्तम औषध म्हणून ओळखले जाते, पण ते एक बंधन सुद्धा होऊ शकते. आपण आपल्या हास्याच्या स्त्रोताचा ठाव घेणे का आवश्यक आहे हे सद्गुरू समजावून सांगत आहेत.
आनंदाची फक्त एक अभिव्यक्ती
सदगुरू: खूप पूर्वीपासून लोक सांगताहेत, की हास्य हे एक सर्वोत्तम औषध आहे. कोठेतरी, कोणालातरी हे समजले की आनंदी लोकं स्वतःला सहज, स्वाभाविकपणे बरे करतात. तुम्ही आजारी आहात किंवा निरोगी हे, तुमचे शरीर किती कार्यक्षमतेने कार्यरत आहे यावर अवलंबून आहे. जर ते उत्तमरीत्या कार्यरत असेल, तर आपण त्याला आरोग्य असे म्हणतो. जर तसे नसेल, तर आपण त्याला आजारपण असे म्हणतो. जेंव्हा तुम्ही आनंदी असता, तेंव्हा तुमचे शरीर सर्वोत्तमरित्या कार्यरत असते. त्यामुळे ते निरोगी बनणे स्वाभाविक आहे. हास्य तुमचा आजार बरा करत नाही; तर आनंद तुमचा आजार बरा करतो, परंतु हास्य हे आनंदाशी अतूट जोडले गेले आहे.हास्य हे एक बंधन सुद्धा होऊ शकते. आनंद म्हणजे सतत “हाssहाssहा” करणे असं वाटत असेल, तर तुम्ही नक्कीच अतिशय हास्यास्पद वाटणार, कारण सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये, तिची व्याप्ती आणि गांभीर्य न समजता तुम्ही फक्त “हाssहाssहा”च करत बसाल. आनंद म्हणजे हास्य नव्हे. आनंद शक्य तितक्या अनेक मार्गानी व्यक्त होऊ शकतो - त्यासाठी विशिष्ट असा कोणता एक मार्ग असायला हवा असे नाही. हास्य ही एका प्रकारची अभिव्यक्ती असू शकते, मौन ही आणखी एका प्रकारची अभिव्यक्ती होऊ शकते. आनंद तुमच्यामध्ये स्थैर्य आणू शकतो, कार्य-कृतीशीलता आणू शकतो, किंवा तुमचे डोळे आनंदाश्रुने भरू शकतो.
गौतम बुद्ध हे स्वतः जरी आनंदाचा आविष्कार होते, तरी कोणालाही ते कधीच हसताना आढळले नाहीत. गौतम बुद्ध कधीही मोठयाने हसले नाहीत, किंवा निर्लज्जपणे हसले नाहीत; त्यांचे हास्य ही एक अगदी लहानशी गोष्ट होती. आनंद याचा अर्थ स्मित किंवा हास्य हाच असणे आवश्यक नाही. आनंद म्हणजे आपण जीवनाच्या केंद्रस्थानी आहात. ज्या क्षणी तुम्ही त्याला एकाच अभिव्यक्तीसोबत अडकवून टाकता, तेंव्हा आपण नेहमी आनंदी राहू शकत नाही याची तुम्ही खात्री केलेली असते.
आनंद म्हणजे काय?
आनंद म्हणजे मूलभूतरित्या जीवनात तुम्ही पृष्ठभागावर नव्हे तर खोलवर रुजलेले आहात. तुम्ही जीवनाच्या स्त्रोताच्या ठिकाणी आहात, आणि म्हणूनच तुम्ही स्वतःच आनंद आहात. लोक त्याकडे नेहेमीच इतर मार्गानी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. कोणाला वाटते दारू पिणे म्हणजे आनंद, आणखी कोणाला वाटते आनंद म्हणजे हास्य. तुम्हाला माहिती आहे, लोकांनी हसणाऱ्या व्यक्तींचे समुदाय स्थापन केले आहेत. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी ते “हाहाहा, हूहूहू, हेहेहे!” असे करताना दिसतात. सुरूवातीला त्यात गंमत वाटेल, पण आपल्याला सदैव हसतच सुटणार्या व्यक्तीसोबत राहावे लागले, तर एक दिवस फक्त त्याचे हास्य थांबवण्यासाठी तुम्हाला त्याला ठार मारावेसे वाटेल!
हास्य हा एक परिणाम आहे!
आज हास्य योग नावाचा “योगा”चा एक अतिशय दयनीय प्रकार सुरू आहे. आपण दोघे एकमेकांच्या समोर उभे राहतो आणि तुम्ही “हाssहाssहा” म्हणता, मी “हाssहाssहा” म्हणतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. नुकतेच मी एका तथाकथित अमेरिकन टू-डू शिक्षकाने असा सल्ला दिलेला मी वाचलं, तो म्हणतो की आपण दिवसातून किमान दहा मिनिटे तरी हसायलाच हवे......म्हणजे लवकरच तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल!
हे पहा, बागेत तुम्हाला फुले हवी असतील तर तुम्ही बाजारातून प्लॅस्टिकची फुले आणून ती बागेत खोचून ठेवत नाही. तुम्ही असं काहीतरी केलं पाहिजे जे फुलांसारखं मुळीच दिसत नाहीत – तुम्हाला माती, खत, पाणी, सूर्यप्रकाश या गोष्टी हाताळाव्या लागतील. यापैकी कोणतीही गोष्ट फुलांसारखी दिसत नाही, त्यांना फुलांसारखा वास नाही किंवा त्यांचा स्पर्श सुद्धा फुलांसारखा नसतो. पण आपण या गोष्टी योग्यरित्या हाताळल्या, तर फुले हमखास फुलतील. म्हणून तुम्ही “मी प्रत्येक दिवशी दहा मिनिटे हसायलाच हवे” अशी भूमिका
घेतल्याने खरे हास्य उमटणार नाही. तुम्ही तुमच्या आत एका सहज समाधानाच्या अवस्थेत पोचलात, तर अकारण तुमच्या चेहेर्यावर एक स्मित-हास्य उमटेल. अगदी छोटीशी गुदगुली केली तरी हसू लागाल. हास्य हा एक परिणाम आहे. परिणाम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. हास्यनिर्मितीच्या प्रक्रियेवर, त्याच्या स्त्रोतावर काम करा.
आनंद ही काही तुम्ही करण्यासारखी कोणती गोष्ट नाही. तुमच्यातील मुलभूत जीवन प्रक्रियेत अडथळा आणला नाही, तर आनंद हा त्याचा एक सहज स्वाभाविक परिणाम आहे. आनंद म्हणजे कोणती ध्येय प्राप्ती नाही, आनंद ही आपली मुलभूत अवस्था आहे. योगामध्ये आम्ही मानवाकडे पाच कप्प्यांचे शरीर म्हणून पाहतो: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. म्हणजेच तुमच्याआत केंद्रस्थानी असलेला गाभा म्हणजे 'आनंद' आहे. जर शरीराचे तीन कप्पे – शारीरिक, मानसिक आणि ऊर्जाशरीर – सुसंगत असतील, तर सर्वात आत असलेला गाभा, जो परिपूर्ण आनंद आहे, त्याला सहज स्वाभावीकअभिव्यक्ती सापडेल.
Editor’s Note: The New York Times Bestseller book, “Inner Engineering: A Yogi’s Guide to Joy,” by Sadhguru is a guide to self-empowerment that relies on the teaching and principles of classical yoga to help readers create an enduring foundation for inner stability and peace. Order your copy now on Amazon.