एका प्रश्नाचं सामर्थ्य – युथ अॅन्ड ट्रुथची (तरुणाई आणि सत्य) गरज काय?
कॅालेजच्या दिवसांत, एक प्रश्न विचारल्याबद्दल वर्गाच्या बाहेर जावं लागण्याची गमतीदार कथा सांगत, सद्गुरू ‘युथ अॅन्ड ट्रुथ’ सारख्या मोहिमेचं महत्व सांगतात. आपल्याला अशी तरुणाई हवी आहे, जे केवेळ प्रश्न विचारून थांबणार नाही, तर उत्तर शोधण्यासाठी जीवन पणाला लावण्याची ज्यांची तयारी असेल.
मी जे केलं, ते नक्कीच उचित नव्हतं आणि मी तसं करायला सांगत नाहीये. एवढंच की तास शिकवणं म्हणजे विद्यार्थ्यांना नोट्स वाचून दाखवून लिहून घ्यायला लावायचं, आणि केवळ स्टेनोग्राफरचं काम करण्याची माझी इच्छा नव्हती.
वर्गाच्या बाहेर पाठवलं जाणं, हा काही माझ्यासाठी नवीन अनुभव नव्हता. मला शाळा अतिशय कंटाळवाणी वाटायची कारण, शिक्षक अनेकदा अश्या गोष्टींबद्दल बोलायचे ज्या गोष्टींचं त्यांच्या आयुष्यात काही मूल्य नाही. लहानपणी, दिवसातून अधिकतर वेळ, मी शाळेपुढून जाणाऱ्या नाल्यातल्या पाण्यात पोहणाऱ्या प्रचंड वैविध्यानं भरलेल्या जीवनाकडे पाहण्यात दंग असायचो. बऱ्याच काळानंतर, जेव्हा माझ्या आईवडिलांना हे समजलं, तेव्हा त्यांनी माझ्या शोध मोहिमा थांबवून मला पुन्हा वर्गात जायला भाग पाडलं.
माझ्या मनात प्रश्नांची कधीच कमी नव्हती
याचा अर्थ मी उद्धटपणा शिकवतोय का? नक्कीच नाही. पण मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की तरुण लोकांच्या मनात प्रश्न असतात – भरपूर प्रश्न असतात – ज्यांना अगदी क्वचित प्रतिसाद मिळतो. प्रौढांचं कल्पनाशून्य जग, त्यांना केवळ परीक्षेत गुण मिळवणं आणि करियर आणि पैश्यांच्या मागे धावणं शिकवतं. मला आठवतंय की मी माझ्या डोक्यात सतत लाखो प्रश्न घेऊन फिरायचो. माझ्या वडिलांनी अगदी हात टेकले होते. ते म्हणायचे की “हा मुलगा आयुष्यात पुढे काय करणार?”. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की मला करण्यासाठी आयुष्यात गोष्टींची कधीच कमी नव्हती. मला शाळेतले वर्ग अगदी कांटाळवाणी वाटायचे. पण मला बाकी सगळ्या गोष्टींत प्रचंड रस होता – हे जग कसं निर्माण झालंय, वेगवेगळे ऋतू, वेगवेगळ्या प्रकारची जमीन, नांगरलेली जमीन कशी हळूहळू बदलते आणि त्यांतून रोपं यायला सुरवात कशी होते, लोक कश्या प्रकारे जगतात. माझं जीवन पूर्णपणे सतत अद्भुत प्रश्नांनी भरलेलं असायचं.
तरुण लोकांना प्रश्नांची कधी कमी नसते. भारताची पन्नास टक्के लोकसंख्या पंचवीस वर्षांखाली आहे. याचा अर्थ प्रश्नही भरपूर आहेत. हे ६५ कोटी तरुण लोक – त्यांच्या आशाआकांशा आणि क्षमता – हेच या देशाचं आणि जगाचं भविष्य ठरवतील. पण, बहुतांशी तरुण लोक आत्ता अश्या समाजाच्या दडपणाखाली आहेत जो त्यांनी निर्माण केला नाहीये. आपल्यासाठी एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की जगात सर्वाधिक आत्महत्येचं प्रमाण हे १५ ते २९ वर्षांच्या दरम्यान आहे. भारतात सरासरी तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो! ही धक्कादायक सरासरी बघितल्यावर आपण जरा थांबून प्रश्न करायला हवा की आपण कुठे चुकतोय.
येत्या काही दिवसांत, मला तरुण लोकांना वेळ द्यायचा आहे. त्यांना कुठला सल्ला की नैतिक शिकवणी देण्यासाठी नाही. त्यांना असे काही अध्यात्मिक उपदेश करायचे नाहीयेत ज्यांचा मलाही तरुण असताना काही उपयोग झाला नव्हता. मला केवळ त्यांच्यात स्पष्टता निर्माण करायची आहे – अशी एक निराळी स्पष्टता जीने मी पंचवीस वर्षांचा असताना माझ्या अंतरंगात जन्म घेतला. याचं साधं कारण म्हणजे मी माझ्या आत सतत प्रश्न घेऊन फिरायचो आणि मी ते जिवंत ठेऊन जगायला घाबरलो नाही. प्रश्न मनात जिवंत ठेवून, कुठलेही निष्कर्ष न काढता जगणं – अश्या जगण्यात एक वेगळीच धुंदी आहे.
‘मला माहित नाही’ या उक्तीचं प्रचंड सामर्थ्य
हे एक दुर्दैव आहे की जगाला अजून ‘मला माहित नाही’ या मनाच्या अवस्थेत दडलेल्या प्रचंड संभावना लक्षात आल्या नाहीयेत. गोष्टींविषयी कुतूहल बाळगण्याची क्षमता ही पुस्तकी ज्ञानामुळे तयार होणारे विश्वास, गृहीते आणि समज काढून घेतात. आपण विसरून जातो की ‘मला माहित नाही’ हेच दार आहे – एकमात्र दार आहे – जाणण्याच्या संभावनेकडे नेणारं.
हे दार आपल्या तरुणाई साठी आज उघडं आहे. हे एक असं दार आहे ज्यातून एका प्रगल्ब्ध जीवनाचा अगदी रोमांचकरी सफर सुरु होऊ शकतो, ज्याचा आजच्या प्रौढ लोकांना विसर पडलाय. आपल्याला असे तरुण हवे आहेत जे केवळ प्रश्न विचारून थांबणार नाही, तर उत्तर शोधण्यासाठी आपलं जीवन पणाला लावण्यास तयार असतील. आपलं वैयातिक आणि जागतिक कल्याण यावरच अवलंबून आहे.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा UnplugWithSadhguru.orgवर.
A version of this article was originally published in Speaking Tree.