"जेव्हा तुम्ही डोळे बंद करता..."
या आठवड्याच्या लेखात एक साधक डोळे बंद केल्यावर दिसणाऱ्या दृश्यांसंबंधी विचारतात. सद्गुरू मानसिक समतोल आणि स्थैर्य यांवर भर देतात. "कोणासाठीही प्राथमिक साधना ही आहे की जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, तेव्हा काहीही दिसलं नाही पाहिजे. जर तुमचं मन तितकं स्थिर झालं, आणि मग तुम्ही तुमच्या दोन डोळ्यांपलिकडील काही बघू शकले, तर त्याला 'दृष्टी' म्हणावं; नाहीतर तो शुद्ध वेडेपणाचं ठरेल.”
प्रश्नकर्ता: सद्गुरू, बरीच वर्षं मला अनेक उच्च अध्यात्मिक अनुभूती येत आहेत. मी जेव्हा डोळे मिटतो तेव्हा मला काही गोष्टी दिसतात.
सद्गुरू: देवदूत भेट देत आहेत तुम्हाला (हशा)?
प्रश्नकर्ता: नाही, तसं नाही.....
सद्गुरू: मग काय भूत-पिशाच्च वगैरे(हशा)?
प्रश्नकर्ता: तसंही नाही, पण एखाद्या गोष्टीच्या किंवा चेहऱ्याच्या आकृतीच्या कडेवर उर्जेचं वलय, असं काहीतरी मला दिसतं. मी जे पाहतो त्यावर माझं नियंत्रण नसतं.
सद्गुरू: तुमच्या मनाचा स्वभाव असा आहे की ते तुम्हाला जे जे हवं आहे ते दाखवू शकते. हे एक विलक्षण साधन आहे, आणि त्याचे अनेक स्तर आहेत. ज्या गोष्टींची तुम्ही जाणीवपूर्वक कल्पनाही करू शकत नाही त्या गोष्टी ते तुम्हाला दाखवू शकतं, कारण त्यांची छाप तिथे असते. तर, कुठल्याही अनुभूतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, जे की सभोवतालच्या भौतिक जगताच्या पलीकडचे आहे, तुम्ही तुमच्या मनाचा पाया उत्तम बनविणे महत्वाचे आहे; इतका की तुमचे तार्किक मन - तुमची बुद्धी – ही एका स्थिर पायावर उभी असली पाहिजे.
बुद्धीचा पाया अस्थिर असताना जर तुम्ही अनुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात गेलात, तर तुम्ही मानसिक समतोल बिघडवून बसाल,आणि त्यानंतर मग, तुम्ही थांबू शकत नाही. सर्व प्रकारच्या गोष्टींची तुम्ही कल्पना करू लागाल. कल्पनाशक्ती ही वास्तविकतेपेक्षा प्रबळ आहे, समजलं तुम्हाला ? जर तुम्ही मानसिक तोल हरवलेल्या कुणाच्या संपर्कात आला असाल तर लक्षात येईल की त्यांची कल्पनाशक्ती वास्तविकतेपेक्षा प्रचंड प्रबळ असते. डोळे उघडे ठेऊन तुम्हाला जे दिसतं ते तितकं स्पष्ट आणि तेजस्वी नसतं जितकं की डोळे मिटलेले असताना.
मुळात, तुमच्या डोळ्यांवर पापण्या आहेत - म्हणजे जर तुम्ही डोळे मिटले, तर तुम्हाला काहीच दिसायला नको. जरा प्रयत्न करा आणि बघा. माझ्यासाठी, जर मी डोळे बंद केले, तर जग नाहीसं होतं, त्याचं काही अस्तित्वच राहत नाही. हाच हेतू आहे पापण्यांचा. जर तुम्ही डोळे बंद केले, तर जग नाहीसं व्हायला हवं. पण जर तुम्ही डोळे मिटले आणि तुम्हाला तेच जग दिसलं, किंवा आणखी कुठलीतरी दुसरीच दुनिया दिसते आहे, म्हणजे तुमच्या या मन नावाच्या जटील यंत्रणेत काहीतरी भलतंच घडत आहे. म्हणून कोणासाठीही प्राथमिक साधना ही आहे की जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, तेव्हा काहीही दिसलं नाही पाहिजे. जर तुमचं मन तितकं स्थिर झालं, आणि मग तुम्ही तुमच्या दोन डोळ्यांपलिकडील काही बघू शकले, तर त्याला 'दृष्टी' म्हणावं; नाहीतर तो शुद्ध वेडेपणाचं ठरेल.
कृपया हे लक्षात घ्या की शहाणपणा आणि वेडेपणा यातला फरक अत्यंत सूक्ष्म आहे. जो कोणी एकदम शहाणा असेल आणि तीन दिवस जर त्याने स्वतःला सतत त्या दिशेने ढकलले, तर तो सहजपणे वेडा होऊ शकतो, कारण मुळात या दोन्हीतली रेषा इतकी बारीक आहे; कुणीही जर प्रयत्नपूर्वक त्या दिशेने राहिलं, तर त्यात हरवून जाऊ शकते. आणि त्याचमुळे, पुन्हापुन्हा, आम्ही कोणालाही आलेल्या कोणत्याही अनुभूतीचे अवमूल्यन करत आलो आहोत. जरी मला लक्षात आलं की ते सत्य आहे, तरी मी त्याचे अवमूल्यन करेल कारण ती अनुभूती गरजेची नाहीये; त्याने काहीही साध्य होणारे नाहीये. समजा तुम्ही झाडावर काहीतरी लटकलेले पाहिले, ते काहीतरी वैचित्र्यपूर्ण असेल, पण त्याने काय साध्य होते? तुमच्या आंतरीक विकास आणि कल्याणाच्या दृष्टीने काहीच साध्य होत नाही.
तर अनुभूती मिळवण्याच्या मागे लागू नका. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आधी हे शरीर आणि हे मन स्थिर केलं पाहिजे. जर ते स्थिर असेल, तर देव जरी आला तरी तुम्ही फक्त त्याच्याकडे नुसते बघू शकाल. जर देवदूत आले, तरी तुम्ही नुसते बघू शकाल. जर ते तितकं स्थिर बनलं की तुम्ही देव, देवदूत, राक्षस, भूत-पिशाच्च यांच्याकडेसुद्धा दुर्लक्ष करू शकण्याची आता तुमची क्षमता आहे, तर मग ठीक आहे. नाहीतर तुमच्या दोन डोळ्यांना जे दिसतं तेच तुम्ही बघावं. तुम्ही काहीतरी बघितलं किंवा तुम्हाला काहीतरी अनुभूती आली किंवा नाही याबद्दल मला काही वादविवाद करायचा नाहीये. मी एवढंच म्हणतोय की तुम्ही तुमचं शरीर आणि मन स्थिर ठेवलं पाहिजे, ते ही अशा स्थितीपर्यंत की जर तुम्ही तुमचे डोळे मिटले तर सारे जग तुमच्यासमोरून पुसले गेले पाहिजे. जर ते होत नसेल तर तुम्ही काहीही बघितलं नाही पाहिजे. सर्वप्रथम, पापण्यांच्या उपयोग करा. पापण्यांचे कार्य एवढेच आहे की जर तुम्ही त्या बंद केल्या, तर जग नाहीसं व्हायला हवं. जर तुम्ही कान बंद केले, तर तुम्ही काहीही ऐकलं नाही पाहिजे.
तुम्ही डोळे बंद केले आणि काहीतरी बघितलं किंवा कान बंद केले आणि काहीतरी ऐकलं किंवा तोंड बंद केले आणि बोलू शकले, तर असं समजू नका की तुम्ही अध्यात्मिक प्रगती साधताय. उलट त्या साऱ्याचा अर्थ असा की तुम्ही एका अत्यंत विलक्षण अशा मन नावाच्या यंत्रणेवरचं नियंत्रण हरवताय. जर ते नियंत्रणापालिकडे गेले तर ही विलक्षण यंत्रणा हानिकारक ठरू शकते.
तुमच्या सर्व आंतरिक अनुभूती आणि दृष्टी, खास करून दृष्टी, माझ्यावर सोपवा. माझ्यावर सोपवणे म्हणजे तुम्ही त्यांचे विश्लेषण, पारख, इतरांना सांगणे किंवा चिंतन करणे या गोष्टी करणार नाहीत. ते सारं माझ्यावर सोपवून द्या. तुमचा आंतरीक विकास होऊन तुम्ही बहरावे हाच माझा एकमेव उद्देश आहे. जर तुम्हाला फक्त साक्षात्कार नव्हे तर अनेक गोष्टींचा शोध घ्यायचा असेल, तर तुम्ही माझ्यासोबत अगदी जवळून काम केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडी-निवडी बाजूला ठेवाल, आणि याउपर, तुमच्या समतोलतेवर आणि स्थैर्यावर काम करा, तेव्हाच ती शक्यता यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरू शकेल.