तुमच्या गुरूंप्रती तुम्ही कृतज्ञता कशी व्यक्त कराल?
इशा योग केंद्र येथे जुलै 2018 मध्ये झालेल्या गुरूंच्या सान्निध्यात (इन द लॅप ऑफ द मास्टर) या कार्यक्रमात, एका साधकाने त्याने कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे सद्गगुरूंना विचारले. सदगुरू ह्या विषयावर स्पष्ट करत आहेत की आपण आज वैश्विक सौजन्याच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत, म्हणून जर तुमच्या अंतःकरणात सुद्धा कृतज्ञता असेल, तर तिचा वापर करायची हीच योग्य वेळ आहे.
प्र: सद्गगुरु, नमस्कार. आपण माझे गुरु असल्याने माझे जीवन पूर्णपणे बदलून गेलेले आहे. मी नियमीतपणे माझी साधना करतो तसेच मी स्वयंसेवक म्हणून सुद्धा काम करतो. परंतु त्यापलीकडे, माझी आपल्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करायचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे मला खरोखरच माहिती नाही. कृपया मला मार्गदर्शन करा.
सद्गगुरु: कृतज्ञता ही काही दाखविण्याजोगी गोष्ट नाही. ज्या लोकांना तुम्ही कृतज्ञता दाखविणे अपेक्षित आहे, त्या लोकांना तुम्ही ति दाखविली पाहिजे. अशा लोकांबद्दल तुम्ही चांगले बोलल्यामुळे त्यांचे आयुष्य वाढते,कारण ते कोण आहेत, ते काय आहेत आणि त्यांचे मूल्य काय आहे हे त्यांना माहिती नसते. मी तुम्हाला ह्या एका गोष्टीची खात्री देऊ शकतो – माझ्याविषयी जो कोणी काही चांगल्या गोष्टी बोलत असेल, त्यामुळे माझ्या आयुष्याचे मूल्य वाढत नाही. माझ्याविषयी ज्या काही भयंकर गोष्टी बोलल्या जातात त्यामुळे सुद्धा माझे आयूष्य कोणत्याही प्रकारे कमी होत नाही.म्हणून, तुम्ही तुमची कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे कृतज्ञता ही मौल्यवान वस्तू वाया घालवणे आहे. तुम्हाला ती व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, तर तुम्ही तीला तुमच्या हृदयातच जपून ठेवा, ती तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमचे हृदय विरघळवून टाकेल. ती तुमच्यातील सर्वकाही विरघळवून टाकेल. तुम्ही जर विरघळून गेलात, तर साहजिकच तुम्ही पसरत जाल. तसे होणे ही एक सर्वोत्तम गोष्ट असेल. परंतु तुम्ही अजूनही काहीतरी हवे असण्याच्या स्थितीत आहात. तर मग मी ही संधी का वाया घालवू?
विस्मयकारक गाठीभेटी
मी नुकताच भारतीय हवाई दलातील अधिकार्यांना संबोधित करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. ते हवाई दलातील शिक्षक असून संपूर्ण देशात तीन हजारहून अधिक शाळा चालवीत आहेत. जसा मी सभेच्या ठिकाणाहून बाहेर पडलो आणि मी माझ्या कारमध्ये पाऊल टाकणार, इतक्यात मी त्या चौदा, पंधरा वर्षांच्या मुलींना सद्गगुरु, सद्गगुरु, सद्गगुरु असे ओरडत माझ्याकडे पळत येतांना पाहिले. मी त्यांचाकडे पाहत विचारले, “तुम्ही ‘सद्गगुरु’; असे का बरे ओरडत आहात? तुम्ही मला कसे ओळखता? “सद्गगुरु, आम्ही तुमचे अनुसरण करतो, आम्ही तुमची भाषणे ऐकतो.” “मला खात्री आहे की तुम्ही कंटाळले असाल.” “नाही, आम्हाला ती खूपच आवडतात, सद्गगुरु. तुम्ही फारच सुरेख बोलता सद्गगुरु!”
त्यानंतर मी बंगलोरला आलो. आमच्या रॅली फॉर रिव्हर्सच्या संचालक मंडळाची सभा होती. त्यानंतर, मी कोणासोबत तरी बागेत चर्चा करत उभा होतो. तीन मुले – दहा, अकरा वर्षांची मुले – माझ्याकडे आली आणि म्हणाली, “सद्गगुरु, आम्ही आपल्यासोबत फोटो काढू शकतो का?” मी त्यांना विचारले, “मी कोण आहे हे तुम्हाला कसे माहित?” ते म्हणाले, “आम्ही तुमचे व्हिडिओ पहातो.” मी म्हणालो, “काय? नक्कीच तुमचे आई-वडील तुम्हाला ते सक्तीने पाहायला लावत असतील.” त्यांनी उत्तर दिले, “नाही, आमच्या शाळेत प्रत्येकजण, आमचे सर्व मित्र, तुमचे व्हिडिओ पहातात.” माझा खरोखरच त्यावर विश्वास बसेना. ते म्हणाले, “आमच्या वर्गातील प्रत्येकजण आपल्याला ओळखतो. आम्ही सर्वजण तुमचे व्हिडिओ पहातो. तुम्ही एकदम मस्त आहात सद्गगुरु.” मी विचार केला यात काहीतरी विशेष आहे. दहा वर्षांची मुले, आपणहून आध्यात्मिक चर्चा ऐकत आहेत.
मृत्यूशय्येवरून जीवनानुभवाकडे
आध्यात्मिक प्रक्रिया आकर्षक करणे हा नेहेमीच उद्देश होता. जी लोक मरणाच्या दारात आहेत, जेंव्हा मृत्यूचे भय त्यांना “राम, राम” असे म्हणायला लावते त्यांच्यासाठी नाही. ही त्या स्वरूपाची अध्यात्मिकता नाही. ज्यांना दीर्घ आणि निरोगी जीवन जगायचे आहे, ते ह्या आध्यात्मिक प्रक्रियेकडे वळतील. आध्यात्मिक प्रक्रिया एक सामान्य प्रक्रिया, जीवन जगण्याचा मार्ग बनायला हवी. लोक ज्याप्रकारे जीवन जगतात तेच आध्यात्मिक झालं पाहिजे.
चैतन्य ही काही कोठेतरी जपून ठेवता येईल अशी गोष्ट बनता कामा नये. संपूर्ण विश्वात चैतन्याचा प्रसार होऊन ते जागृत असायला हवं. जेंव्हा दहा वर्षे वय असलेली मुले आध्यात्मिक व्याख्यान ऐकायला सुरुवात करतात, तेंव्हा ती एक अतिशय चांगली गोष्ट आहे. मी जेंव्हा दहा, अकरा वर्षांचा होतो, तेंव्हा मी असे काही करत नव्हतो. पण, मी, एका वेगळ्या मार्गावर होतो, कारण मी शरीराने अतिशय सक्षम अशा माणसाला भेटलो होतो. एखाद्या स्पायडरमॅन सारखा तो विहिरीच्या भिंतीवर चढत होता. मला त्यांच्यात रस वाटू लागला, कोणत्याही आध्यात्मिक कारणांसाठी नव्हे, तर मला असे वाटत होते की तो मला एखादा कोणीतरी सुपरहिरो बनवेल म्हणून. मला अतिशय आनंद होतो आहे की मी ज्या काही कृती केल्या त्याचा उपयोग मुलांसाठी होतो आहे.
आपण वैश्विक सौजन्याच्या विस्फोटासाठी तयार होत आहोत. तुम्ही त्याकडे ही ईशा किंवा सद्गगुरूंसाठी मोठी गोष्ट आहे या दृष्टीने पाहू नका. तो मुद्दाच नाहीये. मुद्दा असा आहे, की तरुण मुले आध्यात्मिक प्रक्रियेत रस घेऊ लागलेली आहेत. हे फारच छान आहे. आजपर्यंत, जशी एखादी बुडणारी व्यक्ती एखाद्या काडीचा आधार घेऊन राहिलेली आहे, तशी आध्यात्मिक प्रक्रिया ही लोकांनी त्यांचा शेवट जवळ आल्यावर करण्याची गोष्ट समजली जात होती.
आयुष्यभर ते त्यांचे जीवन अतिशय अजाणतेपणे, मूर्खपणाच्या गोष्टी करत जगले. आयुष्यभर त्यांनी केवळ साठवणूक, साठवणूक, साठवणूक येवढी एकच गोष्ट केली – मग ते पैसे असोत, संपत्ती असो किंवा ज्ञान असो. त्यांनी त्यांचे प्रेम आणि हास्यसुद्धा कोणालाही न देता स्वतःकडेच जपून ठेवलं. खरच त्यांनी सर्वकाही साठवून ठेवले. आणि जेंव्हा त्यांचा मृत्यू जवळ आल्याचा त्यांना साक्षात्कार झाला, आणि जेंव्हा त्यांनी असे पाहिले की मरणारी प्रत्येक व्यक्ती रिकाम्या हातानेच गेलेली आहे, तेंव्हा मग अचानकपणे त्यांनी “राम, राम, राम” म्हणायला सुरुवात केली.
दुर्दैवाने गेल्या काही शतकांमध्ये, ह्या देशात सुद्धा आध्यात्मिक प्रक्रियेचे स्वरूप या प्रकारचे झालेले आहे. त्यामुळे बंगलोरमध्ये त्या तीन मुलांना भेटल्यानंतर मी अतिशय उल्हासीत झालो. दहा, बारा वर्षांची मुले – त्यांच्या वयामध्ये गुरूंमध्ये रस असणे ही सुद्धा एक अतिशय मोठी गोष्ट आहे.
कृतज्ञाने ओतप्रोत हृदये
तर, आज आपण वैश्विक सौजन्याच्या विस्फोट होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आपण गोष्टी योग्य प्रकारे हाताळायला हव्यात. ते जेंव्हा घडेल, तेंव्हा आपल्याला असंख्य हातांची गरज भासेल. आणि जर कृतज्ञतेने पूर्णतः भरलेली हृदये असतील, तर आम्हाला त्यांचा वापर करून घ्यायला आवडेल. तुम्ही जर कधी असा विचार केलेला असेल, अगदी एक क्षणभर सुद्धा, की तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे आहे – तर हीच योग्य वेळ आहे. यासारखी आणखी एक चळवळ सुरू करणे सोपे नाही. हे मी माझी स्वतःचीच स्तुती करण्यासाठी बोलत नाहीये. तर हे आध्यात्मिक प्रक्रियेविषयी बोलतो आहे. यापूर्वी कधीही शुद्ध स्वरुपातील आध्यात्मिक प्रक्रिया आज आपल्याकडे जितक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारली जात आहे, तशी ती स्वीकारलेली गेलेली नव्हती.
माझ्या मृत्यू नंतर माझ्यासाठी कोणतेही सोन्याचे स्मारक उभारू नका. कदाचित मी अशी परिस्थिती निर्माण करेन की तुम्ही कोणतेही स्मारक उभारू शकणार नाही, कारण मी कोठे गेलो ते तुम्हाला समजणार सुद्धा नाही. मी त्यावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण आपल्याला कोणत्याही स्वरूपाचे स्मारक नको आहे. मी तुमच्यासाठी एक स्मारक बनून राहावे असे तुम्हाला वाटते का? नाही. माझे अस्तित्व या पृथ्वीवर एक जीवंत ऊर्जा बनून राहावे. ते प्रत्येकाच्या हृदयात राहावे.
जर तुमच्या हृदयात कृतज्ञता खळखळून वाहत असेल, तर तिला तिथेच ठेवा. तिला त्या मार्गात येणारे तुमची मूर्ख मने विरघळवून टाकू दे. तुम्ही कराव्या अशा कोणत्याही गोष्टीचा जर तुम्ही विचार केलेला असेल, तर पुढील सहा महिने ते वर्षाच्या कालावधीमध्ये ती गोष्ट करून टाका कारण त्या करण्याची गरज तेंव्हा भासणार आहे.
Editor's Note: Offering the rare possibility to go beyond all limitations, Sadhguru takes the seeker on a mystical journey towards ultimate liberation. In the ebook, “A Guru Always Takes You For a Ride”, Sadhguru delivers rare insights into the Guru-shishya relationship. Name your price and download.
A version of this article was originally published in Forest Flower, September 2018.