महाभारत: कथा जगणे
सद्गुरु स्पष्ट करतात की महाभारताची कथा आणि पात्रं हि काही परीक्षण करण्यासाठी नाहीत. जर आपण फक्त कथा जगली तरच ती आपल्यासाठी एक अध्यात्मिक प्रक्रिया बनेल.
लेखक आणि इतिहासकार
सद्गुरु: महाभारताची पहिली आवृत्ती, जी स्वतः गणपतीने लिहिली होती, त्यामध्ये २,००,००० पेक्षा जास्त श्लोक होते. जेव्हा व्यासांना हि गोष्ट सांगण्याची इच्छा झाली आणि ती लिहिण्यासाठी त्यांना कोणाची तरी गरज भासली, तेव्हा त्यांना गणपती पेक्षा उत्तम इतिहासकार सापडला नाही. पण गणपतीला अशा प्रकारच्या विद्वत्तापूर्ण उद्योगाचा कंटाळा आला होता. तो म्हणाला, "एकदा का मी लिहायला सुरवात केली, की तुम्ही क्षणाचाही विलंब केला नाही पाहिजे. जेव्हा मी एक शब्द लिहीत असताना, त्यापुढील शब्द आधीपासूनच आला पाहिजे. जर तुम्ही थांबलात, तर मी हा प्रकल्प सोडून जाईन. तुम्ही अशा प्रकारे कथा सांगत राहिले पाहिजे की मला कधीच मध्ये थांबावं लागणार नाही. तुम्ही यासाठी तयार आहात का?” व्यास म्हणाले, “ठीक आहे, कारण हि कथाच अशी आहे कि ती मी तयार करणार नाही. हि कथा माझ्यामध्ये जिवंत आहे - तिला फक्त अभिव्यक्ती सापडेल. फक्त एकच अट आहे की तु असा एकही शब्द लिहिला नाही पाहिजे जो तुला समजला नाही.”
त्यांनी अतिशय चतुर करार केला, आणि व्यासांनी हि कथा सांगितली - या २,००,००० श्लोकांमध्ये शेकडो पात्रांचे वर्णन केले गेले आहे, जे पाहुणे कलाकार नाही आहेत. त्या प्रत्येकांसाठी, त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंचे विस्तृत वर्णन केले गेले आहे - त्यांचे जन्म, त्यांचे बालपण, त्यांचे लग्न, त्यांचे तपश्चर्या, त्यांची साधना, त्यांचे विजय, त्यांचे सुख, त्यांचे दु:ख, त्यांचे मृत्यू आणि बर्याच जणांसाठी अगदी त्यांचे मागील जीवन तसेच त्यांचे पुढील जीवन. महाभारत, ओडीसि आणि इलियाड हे दोन्ही एकत्र केले तर त्या पेक्षाही सुमारे १० पट मोठे आहे.
याचं परीक्षण करू नका - ते जगा
हे इथे २१ व्या शतकात बसून आणि ५००० वर्षांपूर्वी जगलेल्या लोकांवर अभिप्राय देण्याबद्दल नाही - ते सर्वात अन्यायकारक असेल. मला खात्री आहे कि जर ते आता जिवंत होऊन आले आणि तुम्हाला त्यांनी तुम्ही जसे आहात तसं पाहिलं, तर ते तुमच्याबद्दल फार वाईट अभिप्राय बनवतील. हे चांगले किंवा वाईट, चूक कि बरोबर याबद्दल नाही आहे. हे मानवी स्वभाव उलगडून बघण्याबद्दल आहे जे यापूर्वी कधीही कुठेही केले गेले नाही. हा फक्त एक सहज शोध आहे - यावरून कोणताही निष्कर्ष काढू नका.
व्यास, ज्यांनी सर्वप्रथम कथा सांगितली, त्यांनी हे आव्हान स्वीकारले कारण त्यांना कथा जिवंत कशी राहील हे पाहायचं होतं. तेव्हा पासून, हजारो लोकांनी सौम्य रूपांतरासह स्वतःचे महाभारत लिहिले आहे. देशातील विविध प्रदेश, विविध जाती, प्रजाती, आणि जमातींमध्ये याचं रूपांतरण करण्यात आलं आहे. प्रत्येक कथाकाराने, समोर बसलेल्या गर्दीकडे बघून स्वतःचे रूपांतर बनवले आहे. परंतु रूपांतराद्वारे कथा दूषित झाली नाही. ती केवळ त्यांच्याद्वारे समृद्ध झाली आहे, कारण या ५००० वर्षांत, कोणीही या गोष्टीचा परीक्षण करण्याचा प्रयत्न करून या कथेला दूषित केलं नाही. तुम्हीही ते करायला नाही पाहिजे. "चांगला माणूस कोण आहे?" "वाईट माणूस कोण आहे?" या दृष्टीने विचार करू नका. ते तसं नाही आहे. हे फक्त लोकं आहेत.
धर्म आणि अधर्म हे बरोबर आणि चुकीचे, चांगले आणि वाईट याबद्दल नाही. हे राजा, धर्मोपदेशक किंवा नागरिकांसाठी असलेली एक प्रकारची आचारसंहिता नाही. हा एक कायदा आहे, जो तुम्ही आकलन करून घेतलात, तर तो तुम्हाला सत्याकडे वाटचाल करून देतो. तुम्ही जर कथा जगली, तर ती एक शक्तिशाली अध्यात्मिक प्रक्रिया आहे. तुम्ही जर कथेचं परीक्षण केलंत, तर ती तुमच्या आयुष्यात एक मोठा गोंधळ निर्माण करू शकते, कारण या नंतर, तुम्हाला चांगलं आणि वाईट काय आहे हे कळणार नाही, काय करावं आणि काय करू नये, कुटुंबात राहायचं कि जंगलात निघून जायचं, युद्ध लढायचं कि नाही. जर तुम्ही हि कथा जगलात, तर तुम्हाला समजेल कि धर्म हे तुमच्या जीवन प्रक्रियेला दिव्यत्वाकडे नेणारी शिडी बनू शकते. अन्यथा, तुम्ही या जीवन प्रक्रियेला नरकाकडे वळवाल - बरेच लोक हेच करत आहेत.
महाभारताच्या समाप्तीबद्दल तुम्हाला जे काही माहित आहे ते बाजूला ठेवा. तुम्ही जर तुमच्या जीवनाचे सौंदर्य शोधू इच्छित असाल, तर तुम्हाला परिणामाचा विचार न करता कथेचे सौंदर्य शोधावे लागेल. हि कथा एक प्रचंड संधी आहे या महान युद्धातुन जाण्याची ते ही एकही ओरखडा न लागता. यातून जाणे महत्वाचे आहे कारण बहुतेक लोकांसाठी, मानवी अनुभव हा बहुदा त्यांच्या विचार आणि भावनांच्याद्वारे आकारास येतो.