राष्ट्रगीत गायलं जात असताना आपण उभं राहावं का?
गौतम गंभीर आणि सदगुरू राष्ट्रीय प्रतीकांप्रती आदर आणि राष्ट्रगीत गायलं जाताना उभं राहिलं पाहिजे का, यांवर चर्चा करत आहेत.
गौतम गंभीर: मला याबद्दलचं सत्य जाणून घायचंय, की का हा वाद सुरु आहे की राष्ट्रगीतासाठी उभं राहावं की नाही, काही लोक म्हणतायत की ही वैयक्तिक इच्छा असावी. माझं वैयक्तीक मत आहे, की या देशाने तुम्हाला इतकं काही दिलंय, आणि ५२ सेकंदासाठी उभ राहावं की नाही याबद्दल वाद व्हायलाच नकोय. माझा ठाम मत आहे की लोकांनी उभं राहावं. कारण तुमच्या देशासाठी तुम्ही करू शकणारी ही किमान गोष्ट आहे निदान आपल्या राष्ट्रगीताचा सन्मान करावा. ते चित्रपट गृहात असो किंवा, कुठेही असो. ते शाळॆत वाजवलं जात असो, किंवा कुठेही… जिथं कुठे ते वाजवलं जाईल, आपल्याला ५२ सेकंद उभं राहायलाच हव. मला याबद्दलच सत्य जाणुन घ्यायचंय.
सदगुरू: नमस्कार गौतम ! हे हास्यास्पद नाहीये का की आज आपल्या देशात तुम्ही हा प्रश्न विचारताय, हे दुर्दैव नाही का?आपण हे समजून घ्यायला हवं, की राष्ट्र म्हणजे काय? एक राष्ट्र म्हणजे काही देवानं निर्माण केलेली गोष्ट नाहीये. ही फक्त एक कल्पना आहे, जी आपण सर्वांनी मान्य केलीये. राष्ट्र हे त्याच्या संविधानानं बांधलं गेलंय आणि त्याचं प्रतिक म्हणजे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत. तर मग प्रश्न हा आहे की, जर आपल्याला एक राष्ट्र म्हणून कार्य करायचं असेल, एक राष्ट्र म्हणून जगायचं असेल, एक राष्ट्र म्हणून समृद्ध व्हायचं असेल, एक
राष्ट्र म्हणून विकसित व्हायचं असेल, तर देशाप्रती अभिमान आणि निष्ठा असणं महत्त्वाचं आहे का ?
मी असा कुणी नाहिये, जो “राष्ट्रवादाबद्दल” बोलतोय. मी “मानवतावादी” आहे. मी संपूर्ण मानवी अस्तित्वाच्या बाजूनं आहे. पण आत्ता सध्या, आपण संबोधित करू शकणारी सर्वांत मोठा संख्या किंवा जनमानसाचा सर्वांत मोठा भाग म्हणजे राष्ट्र. भारताची लोकसंख्या १.३ अब्ज आहे. हे जणू एक स्वतंत्र जगच आहे. जर आपण राष्ट्रवादाची जबरदस्त भावना निर्माण केली नाही तर आपण समृध्द होऊ शकत नाही, आपण जगाच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकणार नाही आणि आपल्याला एक राष्ट्र म्हणून काही विशेष अर्थ उरणार नाही. तर राष्ट्रगीत हा याचा फक्त एक पैलू आहे. “मी उभं राहावं की नाही ?” तुम्हाला पाय नसतील तर तुम्ही उभं राहायची गरज नाही. पण जरी तुम्हाला पाय नसतील, तरी तुम्ही राष्ट्रगीताप्रती आणि झेंड्याप्रती कुठल्यातरी प्रकारे आदर व्यक्त करायला हवा कारण हे राष्ट्रीयतेचं प्रतिक आहे. यामुळेच राष्ट्र एक आहे. जर तुम्हाला तुमचं राष्ट्रगीत अभिमानानं गाता येत नसेल, तर राष्ट्राचा प्रश्न येतोच कुठे ?
“विशेषतः मी चित्रपटगृहात का उभं राहावं? सिनेमा हॅालमधे का उभं राहावं? मी इथं मनोरंजनासाठी आलोय.” अशा लोकांना मला एक प्रश्न विचारायचाय. तुम्ही शेवटचं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे कधी सहभागी झाला होता? तुम्ही शेवटचं स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाला कधी गेला होता? तुम्ही इतर कुठे जाऊन राष्ट्रगीत कधी म्हटलंय? कदाचित फक्त शाळेत, तेही तुम्हाला तसं करायला भाग पाडलं असेल म्हणून. तेव्हापासून तुम्ही या राष्ट्राचंच खाताय, या राष्ट्रापासून तुम्हाला अनेक फायदे झालेयेत! पण त्यासाठी तुम्हाला आपलं योगदान द्यायचं नाहीये.
तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की भारतीय लष्करात लाखोंच्या संख्येनं लोक आहेत आणि नेव्ही आणि एयर फोर्स असे सैन्याचे इतर दलही आहेत. हे जवळपास लाखो लोक, आपल्या सीमेवर उभे आहेत, आपलं आयुष्य टांगणीवर ठेऊन, अगदी रोज. दररोज तुम्ही तिथल्या
मृत्युंविषयी ऐकतो. जरा त्यांना जाऊन सांगा की आम्हाला या देशाची खरंच काही पर्वा नाहीये, म्हणजे ते आपल्या घरी जाऊन आपलं आयुष्य जगू शकतील. का ते स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचं रक्षण करतायत, जर तुम्हाला राष्ट्राबद्दल काहीच काळजी नसेल तर? या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या आणि नागरिकाच्या मनात आणि हृदयात राष्ट्रभक्ती प्रकर्षानं रुजवणं अत्यंत आवश्यक आहे.
ही एक गोष्टी आपण स्वातंत्र्यानंतरच्या काळात करण्यात अपयशी ठरलो आहोत. स्वातंत्र्यानंतर लगेच ही गोष्ट करायला हवी होती, कारण राष्ट्र हे केवळ आपल्या मनात आणि हृदयात जिवंत असतं. ही गोष्ट स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रभावीपणे केली गेली नाही, जेव्हा की राष्ट्राबद्दल प्रचंड प्रेम आणि उत्साहाची भावना होती, तेव्हाच हे करायला हवं होतं. दुर्दैवानं आपण तसं केलं नाही. अनेक लोक धर्म, जात, वंश, लिंग आणि त्यांचे क्लब यांचीच ओळख घेऊन बसले आहेत. आणि त्याहून म्हणजे स्वतःची अगदी सीमित प्रतिमा जपण्यात गुंतले आहेत.
तर मग आपण देशासाठी उभं राहायला हवं का ? शंभर टक्के ! राष्ट्रगीत हे देशासाठी उभं राहण्याचा एक भाग आहे का ? होय ! ५२ सेकंद. यात काही वाद आहे का ?
जे लोक हा प्रश्न उठवतायेत हे ते लोक आहेत ज्यांनी एका हातात पॉपकॉर्न कॅन आणि दुसऱ्या हातात कोक धरलंय. साहजिकच ते खाली पडू न देता उभं राहणं अवघडे, ही समस्या आहे. हा वाद थांबला पाहिजे ! जर आपल्याला देशातल्या ४० कोटी लोकांची चिंता असेल, ज्यांचं
व्यवस्थित पोषणही होऊ शकत नाही, अशावेळी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की, आपण संपूर्ण राष्ट्राला राष्ट्रभक्तीच्या धाग्यानं जोडून ठेवायला हवं. याशिवाय राष्ट्र असूच शकत नाही, कारण राष्ट्र देवानं निर्माण केलेली गोष्ट नाहीये. राष्ट्र म्हणजे एक करार आहे जो आपण सर्वांनी मान्य केलाय. जेव्हा आपण म्हणतो, आपण या राष्ट्राचे आहोत, त्यावेळी आपण हे मान्य करतो की ठराविक गोष्टींचं मूल्यं जपू, आदर करू, त्यासाठी उभं राहू.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.