महाभारत भाग ४: शकुंतला आणि भरतचा जन्म
मागील भागात आपण पांडव आणि कौरव यांचे चंद्रवंशी पूर्वज पुरु आणि त्यांचा सावत्र भाऊ यदु ज्याच्यापासून यादव कुळ अस्तित्वात आले यांच्या कथा पाहिल्या. आजच्या कथेमध्ये, सद्गुरू आपल्याला शकुंतला आणि दुष्यंतची लोकप्रिय कथा आणि भरतच्या जन्माबद्दल सांगत आहेत.
शकुंतलेचा जन्म
सद्गुरु: पुरुपासून काही पिढ्यानंतर विश्वामित्र नावाचा राजा होता, ज्याला कौशिक म्हणूनही ओळखले जाते. ऋषीमुनींचे सामर्थ्य पाहता त्याला एका राजाच्या शक्तीच्या तुलनेत फारच कमी वाटत होती. म्हणूनच, जरी तो जन्माने राजा असला तरी तो एक ऋषी होऊ इच्छित होता. तो जंगलात जाऊन गंभीर तपश्च़र्या करायला लागला.ज्या तीव्रतेने हे सर्व सुरू होते ते पाहून इंद्राला वाटले की विश्वामित्राला जे हवे आहे ते त्याने साध्य केले तर इंद्राचे वर्चस्व धोक्यात येईल. त्याने आपली एक “मधाळ-गुंतवणारी एजंट” म्हणजेच अप्सरा मेनका पाठवली. विश्वामित्राला भुरळ घालणे आणि त्याच्या तपश्च़र्या आणि साधनेपासून त्याचे लक्ष विचलीत करणे हे मेनकाचे कार्य होते. ती यशस्वी झाली आणि तिला विश्वामित्रापासून एक मुलगी झाली.
काही काळानंतर विश्वामित्राला कळले की त्याने यापूर्वी त्याच्या साधनेद्वारे जे कमावले होते ते लक्ष विचलीत झाल्यामुळे गमावले आहे. तो संतापला आणि आई व मुलीला सोडून, तेथून निघून गेला. अप्सरा असल्यामुळे मेनका या जगात पाहुणी म्हणून आली होती मर्यादित व्हिसावर! तिला परत जायचे होते. ती मुलीला वडिलांजवळ सोडू शकत नव्हती कारण वडिलांना ती मुलगी नको होती, त्यामुळे तीने मुलीला मालिनी नदीच्या काठावर सोडले आणि तेथून निघून गेली.
तिथल्या काही शकुन पक्ष्यांचे लक्ष या चिमुरडीकडे गेले, ते कसेतरी तिच्याकडे गेले आणि इतर प्राण्यांपासून तिचे रक्षण केले. एके दिवशी कण्व ऋषी त्या मार्गावरून जात होते आणि ही विचित्र परिस्थिती त्यांनी पाहिली जेथे एका लहान बालकाचे पक्षी संरक्षण करीत होते. त्यांनी बाळाला उचलले आणि तिला आश्रमात नेले आणि तिला मोठे केले. शकुन पक्ष्यांनी तिचे रक्षण केले म्हणून त्यांनी तिला शकुंतला हे नाव दिले. ती मोठी होऊन एक एक अतिशय सुंदर युवती झाली.
एके दिवशी, राजा दुष्यंत मोहिमेवर गेला. युद्धावरून परतताना त्याच्या सैनिकांना त्याला जेवण द्यायचे होते. तो जंगलात गेला आणि सैन्याच्या जेवणासाठी प्राण्यांना त्याने अंदाधुंदपणे ठार केले. जेव्हा तो एका बऱ्याच मोठ्या नर काळवीटाला मारायला गेला तेव्हा त्याचा बाण निशाण्यावर लागला परंतु तरीही काळविटाने पळ काढला. दुष्यंतने त्याचा पाठलाग केला आणि तो शकुंतलेकडे सापडला. तो तिचा पाळीव काळवीट होता आणि ती त्याची मोठ्या करुणेने काळजी घेत होती. जेव्हा दुष्यंतने हे पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला, तो काही काळ तिथेच राहिला आणि कण्व ऋषींच्या परवानगीने तिच्याशी तेथे लग्न केले.
मग दुष्यंतला परत जावे लागले. त्याची संपूर्ण सेना जंगलाच्या सीमेवर थांबली होती. त्याने शकुंतलेला सांगितले की तो जाऊन आपल्या राज्यात सर्व काही व्यवस्थित बसवेल आणि नंतर परत येईल. आपली आठवण आणि विवाहाची खूण म्हणून दुष्यंतने आपली अधिकृत अंगठी काढून शकुंतलेच्या बोटात घातली. स्वाभाविकच, ती योग्यरित्या बोटात बसली नाही. तो म्हणाला, “मी तुझ्यासाठी परत येईन.”
शकुंतला सतत स्वप्नांमध्ये होती - ही जंगलातली मुलगी अचानक राणी, एक महाराणी बनली होती! एके दिवशी ऋषी दुर्वासा कण्व मुनीच्या आश्रमात आले. ते रागीट होते. ते शकुंतलेला उद्देशून काहीतरी बोलले पण तिने काहीच उत्तर दिले नाही - तिचे डोळे उघडे असले तरी तिला काहीच दिसत नव्हते. त्यांना अपमान झाल्यासारखे वाटले आणि म्हणाले, “सध्या ज्याने तुझे लक्ष वेधले आहे, तो तुला कायमचा विसरून जाऊ दे.” ती अचानक भानावर आली आणि ओरडून म्हणाली, “हे असं होऊ शकत नाही! तुम्ही असं का केले? ”
आश्रमातील लोकांनी दुर्वासांना समजावून सांगितले की शकुंतलाने एका राजाशी लग्न केले आहे आणि तो परत येऊन तिला त्याच्याबरोबर घेऊन जाण्याची ती वाट पहात आहे. "ती दिवास्वप्न पाहत होती - कृपया तिला क्षमा करा," ते म्हणाले. तोपर्यंत त्यांनी दुर्वासांचे आदरातिथ्य केले होते आणि त्यामुळे ते थोडे शांत झाले होते. ते म्हणाले, “ठीक आहे, मला ते सुधारु दे. होय, तो तुला विसरला आहे, परंतु जेव्हा तू त्याला स्वतःची आठवण दाखवशील तेव्हा त्याला तुझ्याबद्दल सर्व आठवेल. ”
भरत जन्म
शकुंतला वाट पाहत राहिली आणि पाहतच राहिली, पण दुष्यंत कधीच आला नाही. तिला एक मूल झाले ज्याला तिने भरत नाव दिले. त्याच्याच नावाने आज आपला देश ओळखला जातो. अनेकानेक गुण असलेल्या या सम्राटाच्या नावावरून भारत किंवा भारतवर्ष असे आपल्या राष्ट्राला नाव देण्यात आले. तो एक आदर्श माणूस होता.
भरत जंगलात मोठा झाला. एके दिवशी कण्वाने शकुंतलाला सांगितले, “तु जाऊन राजा दुष्यंतला आठवण करून दे की तू त्याची पत्नी आहेस, आणि त्याला एक मुलगा आहे. राजाचा मुलगा वडिलांच्या संपर्कात न राहता मोठा होत आहे हे योग्य नाही.” शकुंतला त्या लहान मुलाला घेऊन राजवाड्यास जायला निघाली. त्यांना एक नदी पार करायची होती. ती अजूनही प्रेमाच्या स्वप्नात होती. जेव्हा ते एका बोटीतुन नदी पार करत होते तेव्हा तिने पाण्याला स्पर्श करण्यासाठी तिचा हात बाहेर काढला आणि अंगठी मोठी असल्यामुळे नदीत घसरून पडली. तिला याची जाणीवही झाली नाही.
राजे आणि राजवाड्यांच्या मार्गांचे तिला ज्ञान नव्हते. राजाच्या दरबारात, जेव्हा दुष्यंतने विचारले, “तू कोण आहेस?” ती म्हणाली, “बरं, आठवत नाही का? मी तुमची पत्नी शकुंतला आहे. हा तुमचा मुलगा आहे. ” दुष्यंत खूप रागावले. "तुझी हिम्मत कशी झाली! अशा प्रकारच्या गोष्टी सांगणारी तू कोण आहेस? ” तिला महालातून बाहेर काढण्यात आले. तिला कळलेच नाही की काय झाले? "त्याने माझ्यावर खूप प्रेम केले! आणि आता, त्याने आपली स्मरणशक्ती पूर्णपणे गमावली आहे? ”
ती दु:खी होऊन परत गेली. प्रथमच ती समाजाच्या संपर्कात आली होती आणि त्यानंतर हे असे घडले. ती आश्रमामागील दाट जंगलात गेली आणि आपल्या मुलासमवेत वनात राहायला लागली. भरत वन्य प्राण्यांसह मोठा झाला - तो खूप शूर, खूप सामर्थ्यवान, पृथ्वीच्या ज्या भागात तो राहिला त्याचा तो भाग बनला.
नंतर दुष्यंतला पुन्हा अंगठी सापडल्यानंतर तो या जंगलात शिकार करायला आला. त्याने एक लहान मुलाला प्रौढ सिंहांसोबत खेळताना, हत्तींवर बसलेले पाहिले. त्याने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, “तू कोण आहेस? तू एक प्रकारचा अतिमानव आहेस का? तू देव आहेस? तू दुसऱ्या दुनियेतून आला आहेस का? ” मुलगा म्हणाला, “नाही, मी दुष्यंतचा मुलगा भरत आहे.” राजा म्हणाला, “मी दुष्यंत आहे. मी तुला कसे ओळखत नाही? ” मग कण्व आला आणि त्याने संपूर्ण कथा सांगितली. शेवटी दुष्यंत शकुंतला व भरतला राजवाड्यात घेऊन गेला.
पुढे चालू...