कुंभमेळा - सर्वात मोठा मेळावा
सद्गुरू, जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्याचे - कुंभमेळ्याचे - शास्त्र आणि महत्त्व याबद्दल सांगतात आणि प्रयागमधील कुंभमेळ्यातील स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करतात.
..सूर्य त्याच्या प्रदक्षिणेत भेट देणाऱ्या देशांमध्ये, भारताला सर्वात असामान्य देश बनवण्याबाबतीत निसर्ग आणि माणूस यांनी काहीही शिल्लक ठेवलेले नाही. - मार्क ट्वेन
सद्गुरू: भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात संमिश्र आणि रंगीबेरंगी संस्कृती आहे. तुम्ही पहाल की, देशातील प्रत्येक ५० किंवा १०० किलोमीटरवर लोकांचे रूप, त्यांची भाषा आणि आहार, त्यांचा पेहराव, संगीत आणि नृत्य, सर्वकाही वेगवेगळे आहे. एक ठिकाण जिथे या संस्कृतीची संमिश्रता तुम्ही खरोखर पाहू शकता, तो म्हणजे कुंभमेळा.
२००१ च्या महाकुंभमेळ्यात अलाहाबाद येथे ६ कोटी लोक जमले होते. मला कधीही अशा ठिकाणी जाण्याची ओढ नव्हती, पण खूप चर्चा सुरु होती, म्हणून अकल्पनीय प्रमाणात होणारा हा भव्य कार्यक्रम पाहण्यासाठी मी कोईम्बतूरहून गाडी चालवत जायचे ठरवले.
हे जगातील सर्वात अद्भुत दृश्यांपैकी एक आहे. मी तिथे पहाटे २ वाजता गेलो आणि देशाच्या विविध भागातील सर्व प्रकारचे लोक तिथे सभोवती बसले होते. त्यांना झोपायला जागा नव्हती, म्हणून त्यांनी छोटीशी शेकोटी पेटवून त्यासोबत त्यांची गाणी आणि नृत्य, संस्कृती आणि चर्चा चालू होत्या. मानवतेचे अधम आणि परम तिथे एकत्र आले होते - प्रत्येक प्रकारचा धूर्त आपला हात साफ करू इच्छित होता, पण त्याचबरोबर महान सिद्धी असलेले अनेक योगीही होते. लोक हजारो वर्षांपासून असे एकत्र येत आहेत. ही एक परंपरा आणि संस्कृती आहे जी तुम्ही मारू शकत नाही, आणि तिला एक विशिष्ट सामाजिक संदर्भ आहे. पण एक आध्यात्मिक शक्तीही आहे.
पृथ्वी आणि चंद्र यांचा प्रवास चक्रीय असतो. प्रत्येकजण या चक्राच्या अधीन आहे, पण ही चक्रे बंधनाची चक्रे बनू शकतात, किंवा ती एका जीवनचक्रावरुन दुसरे जीवनचक्र पार करण्याचे साधन बनू शकतात. ज्याला मुक्तीची ओढ असते, तो सतत स्वतः निर्माण केलेल्या चक्रांपासून मुक्त कसे व्हावे याचा शोध घेत असतो. अशी विविध प्रकारची चक्रे आहेत, सर्वात दीर्घ म्हणजे १४४ वर्षांचे; १४४ वर्षांतून एकदा, सौरमंडळात विशिष्ट घटना घडतात ज्यासाठी आपल्याकडे महाकुंभमेळा आहे, जो यापूर्वी २००१ मध्ये होऊन गेला.
कुंभमेळे देशातील विशिष्ट ठिकाणी भरतात, ज्याभोवती संपूर्ण ऊर्जा प्रणाली तयार करण्यात आली होती. पृथ्वी फिरत असल्यामुळे ती अपकेंद्री बल निर्माण करते. ० ते ३३ अंश अक्षांशावर, हे बल तुमच्या यंत्रणेत प्रामुख्याने उभ्या दिशेने कार्य करते, आणि विशेषतः ११ अंशावर, ऊर्जा सरळ दिशेने वर जात असतात. म्हणून पूर्वजांनी पृथ्वीवरील अशी ठिकाणे मोजली आणि चिन्हांकित केली जिथे लोकांवर समर्थक प्रभाव पडतो. अशी अनेक स्थाने नद्यांच्या संगमांवर आहेत आणि अशा भागात स्नान करण्याचा एक लाभ आहे. जर एखादा, विशिष्ट दिवशी त्या ठिकाणी असेल तर दुर्मिळ संधी उपलब्ध होतात, म्हणून लोक या परिस्थितींचा फायदा घेण्यासाठी तिथे जातात. यापैकी बरेच लोक गरीब शेतकरी आणि निरक्षर आहेत जे अल्प संसाधनांसह लांबचा प्रवास करतात, फक्त तिथे असण्याची इच्छा बाळगून, मुक्तीची ओढ ठेवून. जगात दुसरीकडे कुठेही संपूर्ण लोकसंख्या एवढ्या तीव्रतेने मुक्तीची ओढ बाळगत नाही.
दुर्दैवाने, आज आपण पाहत असलेली आध्यात्मिक संस्कृती बऱ्याच प्रमाणात, आक्रमणांमुळे नष्ट केली गेली आणि दीर्घकालीन दारिद्र्यामुळे विकृत झाली आहे. तरीही, आध्यात्मिक प्रक्रियेचे मूळ तत्त्व नष्ट झालेले नाही, किंवा ते नष्ट होऊ शकत नाही. या गहन परंपरेचा पूर्ण वैभवाने लाभ घेण्याची ही वेळ आहे. कुंभमेळा
प्रयागराज
प्रयागराज येथील कुंभमेळा कदाचित जगातील सर्वात मोठा मेळावा आहे. या शुभ दिवशी, जो ग्रहांच्या स्थितीवर आधारित मोजला जातो, संपूर्ण भारतातून सर्व प्रकारचे आध्यात्मिक साधक आणि प्रत्येक आध्यात्मिक मार्गांवरील साधक पवित्र गंगा नदीत स्नान करण्यासाठी एकत्र येतात. मेळा दर १२ वर्षांनी होतो, जे एक सौर चक्र आहे, आणि आध्यात्मिक मार्गावरचा एक महत्त्वाचा अंक आहे. कुंभमेळा हा भारताच्या अमूल्य आध्यात्मिक वारश्याचे एक चिरंतन प्रतीक आहे.